पंढरपूर तालुक्यातील शेगाव दुमाला येथे सुमारे एक महिन्यापूर्वी संकेत आटकळे (वय ५ वर्षे) याचा जमिनीच्या वादातून खून झाला, अशी शक्यता पोलीस तपासातून समोर आल्याने रविवारी रात्री महेश व गणेश आटकळे या दोघांना तालुका पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
संकेत आटकळे हा दि. ३ सप्टें. १३ रोजी दुपारी घरासमोर खेळत असताना त्याचे अपहरण करून खून करण्यात येऊन त्याचे शव दि. ६ सप्टें. रोजी घराजवळच असलेल्या उसाच्या शेतात सापडले होते.
परंतु पोलिसांना कोणतेच धागेदोरे हाती लागले नव्हते. एक महिन्यानंतर संशयित व्यक्तीपर्यंत पोलिसांनी पोहोचून संकेत याच्या भावकीतील दोघांना ताब्यात घेतले.
संकेत आटकळे याचा खून हा भावकीतील जुने वाद-भांडणे यातून झाला असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला असून तो कशा प्रकारे अन् नेमक्या कोणत्या कारणावरून हाखून केला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
६ सप्टेंबर रोजी संकेतचे पंढरपूर येथे प्रथम शवविच्छेदन करण्यात आले. त्यात कारण स्पष्ट न निघाल्याने सोलापूर येथे परत शवविच्छेदन करण्यात आले अन् शवविच्छेदनातील काही भाग मुंबई येथे प्रयोगशाळेत पाठवण्यात आला होता. त्याचा अहवाल अद्यापपर्यंत पोलिसांना प्राप्त झाला नाही. तो आल्यावरही त्यावर बरेच अवलंबून आहे.
संकेतचे जेव्हा अपहरण करण्यात आले त्या वेळी त्याला शोधून देणाऱ्यास पाच लाखांचे बक्षीस ठेवले होते. संकेतच्या खुन्याचा तपास जोपर्यंत लागत नाही तोपर्यंत गावात सण साजरे न करण्याचा निर्णय सर्वानी घेतला. त्याप्रमाणे गणपती गौरी सणही साजरा केला नाही. संकेत आटकळे संदर्भात पालकमंत्री दिलीप सोपल यांनीही दोन दिवसांपूर्वी तपासाबाबत पोलिसांना सूचना दिल्या होत्या. पोलीस संशयितांपर्यंत पोहोचले अन् त्यांना ताब्यात घेतले.