कुऱ्हाडीने वार केल्यामुळे पत्नीचा मृत्यू झाल्याप्रकरणी खुनाचा गुन्हा सिध्द झाल्याने व्यसनाधीन पतीस आठ वष्रे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. बुलढाणा जिल्हा व सत्र न्यायाधीश अश्विनीकुमार यांनी हा निकाल दिला.
 मेहकर तालुक्यातील लोणी गवळी येथील रहिवासी मारुती हरिभाऊ कदम (४५) याला गांजाचे व्यसन जडले होते. पत्नी इंदू  (४०) त्याला व्यसनापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न करीत होती. विरोध करते म्हणून मारुती तिला मारहाण करीत असे. २० डिसेंबर २०१२ रोजी सकाळी दहा वाजता मारुतीसह मुले अजिंक्य व विजय यांनी दुपापर्यंत शेतात काम केले. नंतर पती-पत्नी घरी परतले. अजिंक्य मात्र शेतातच थांबला. विजय दोन वाजेपर्यंत घरी थांबून मित्राकडे निघून गेला. तासाभराने परत आल्यानंतर त्याला घराचे दार आतून बंद असल्याचे आढळून आले. वडील मारुती यांना आवाज दिला असता त्यांनी दार उघडले तेव्हा त्याला वडिलांच्या कपाळाला जखम झाल्याचे दिसले तसेच खोलीत आई मृतावस्थेत रक्ताच्या थारोळयात पडलेली दिसली. बाजूलाच रक्ताने माखलेली कुऱ्हाड पडलेली होती. वडिलांना विचारले असता मी तुझ्या आईला रागाच्या भरात कुऱ्हाडीने मारले, असे सांगितले.
याप्रकरणी विजयने भाऊ अजिंक्यला माहिती दिली. घटनेनंतर डोणगाव पोलिस ठाण्याचे ठाणेदार राजेंद्र सहाने यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. अजिंक्य कदम यांच्या फिर्यादीवरून खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपासाअंती ठाणेदारांनी आरोपीविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. न्यायालयात आरोपीची दोन्ही मुले, वैद्यकीय अधिकारी डॉ. बोराळकर तसेच तपास अधिकारी सहाने यांच्यासह अन्य साक्षीदारांच्या साक्षी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश अश्विनीकुमार देवरे यांच्यापुढे नोंदविण्यात आल्या. दोन्ही बाजूच्या वकिलांचा युक्तिवाद न्यायालयाने ऐकून घेतला. सरकारी वकील आर.एम. काकडे यांनी सादर केलेला पुरावा व युक्तिवादामध्ये उपस्थित केलेल्या मुद्दय़ांच्या आधारे आरोपी मारुती याने पत्नीचा खून केल्याचे सिध्द झाले. त्यामुळे त्याला आठ वष्रे सक्षम कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली. सरकारी पक्षातर्फे सरकारी वकील आर.एम. काकडे यांनी बाजू मांडली.