07 July 2020

News Flash

महिलेचा विष पाजून खून; चौघांना जन्मठेपेची शिक्षा

पूर्ववैमनस्यातून महिलेला विष पाजवून तिची निर्घृण हत्या करणाऱ्या चौघांना न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. न्या. एस. बी. म्हस्के यांनी गुरुवारी हा निकाल दिला.

| January 3, 2014 01:40 am

पूर्ववैमनस्यातून महिलेला विष पाजवून तिची निर्घृण हत्या करणाऱ्या चौघांना न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. न्या. एस. बी. म्हस्के यांनी गुरुवारी हा निकाल दिला. यातील पुष्पा खोकले या महिलेची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता झाली.
किनवट तालुक्यातील गोंडे महागाव येथील भागोराव वाघमारे व श्यामराव खोकले यांच्यात वैमनस्य होते. यातून दोन्ही कुटुंबांत अनेक वेळा हाणामारीचे प्रकार घडले. गेल्या २२ जूनला क्षुल्लक कारणावरून वाघमारे व खोकले यांचे भांडण झाले. वाघमारे याची तक्रार देण्यास इस्लापूर पोलीस ठाण्यात गेले. याच दरम्यान खोकले, अजय श्यामराव खोकले, गजानन संभाजी खोकले, विश्वनाथ खोकले व पुष्पा विजय खोकले या पाच जणांनी वाघमारे यांच्या घरावर हल्ला केला. घरात वाघमारे यांचे कुटुंबीय होते. तुम्ही शिवीगाळ का करता, आमच्या घराबाहेर येऊन का ओरडता, अशी विचारणा भागोराव यांची बहीण जिजाबाई सुरेश कांबळे (वय ४९) हिने केली. या वेळी आरोपींनी तिला विष पाजले. बेशुद्धावस्थेत तिला शिवणी ग्रामीण रुग्णालयात व तेथून किनवट रुग्णालयात हलविले, मात्र उपचार सुरू असताना तिचा मृत्यू झाला. इस्लापूर पोलिसांनी पाच जणांविरुद्ध खून केल्याच्या आरोपावरून गुन्हा दाखल केला. तत्कालीन सहायक पोलीस निरीक्षक सिद्धार्थ माने यांनी या प्रकरणी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.
न्यायालयाने या प्रकरणात १६ जणांच्या साक्षी नोंदविल्या. दोन्ही बाजूंनी जोरदार युक्तिवाद केला. सरकारी पक्षाचा युक्तिवाद व उपलब्ध पुराव्याच्या आधारे न्या. म्हस्के यांनी श्यामराव, अजय, गजानन व विश्वनाथ खोकले या चौघांना जन्मठेप, तसेच प्रत्येकी एक हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. सबळ पुराव्याअभावी पुष्पा खोकलेची निर्दोष मुक्तता झाली. अॅड. अलका कुर्तडीकर यांनी सरकारी पक्षाची बाजू मांडली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 3, 2014 1:40 am

Web Title: murder of women drink poison 4 imprisonment nanded
टॅग Nanded
Next Stories
1 परभणी लोकसभेसाठी पदाधिकाऱ्यांची बैठक
2 कविवर्य श्री. दि. इनामदार यांचे निधन
3 लातुरातून आता निवडणूक लढविणार नाही – आवळे
Just Now!
X