शनिवारी मध्यरात्री महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या तरुणाचा सांगलीतील माळी चित्र मंदिरानजीक चाकूने भोसकून खून करण्यात आला. या प्रकरणी त्याच्या तीन मित्रांना खुनाच्या घटनेनंतर अवघ्या १२ तासांत पोलिसांनी अटक केली.
    अंकुश साहेबराव पवार (२३) आणि अभिजित अजय कदम (२३) या दोघांमध्ये शनिवारी रात्री १ वाजण्याच्या सुमारास मुलीच्या कारणावरून बाचाबाची झाली. अभिजित कदम याने अंकुश पवार याच्यावर चाकूने गंभीर वार केले. त्याला तात्काळ सांगलीतील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले,  मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला.
    सांगलीतील एका मुलीवरून दोघांमध्ये वाद झाला होता. पंधरा दिवसांपूर्वी अंकुश पवार याने अभिजित कदम याला मुलीचा नाद सोड अन्यथा तुला बघून घेईन अशी धमकी दिली होती. यातूनच शनिवारी रात्री दोघांमध्ये बाचाबाची झाल्यानंतर त्याचे पर्यवसान खुनामध्ये झाले. मृत अंकुश पवार हा एम. कॉम.च्या द्वितीय वर्षांत शिक्षण घेत होता. पोलिसांनी खूनप्रकरणी अटक केलेला अभिजित कदम हा भारती कॉलेजमध्ये इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत होता. या खुनामध्ये सहकार्य केल्याप्रकरणी प्रवीण भोरे (२५) व हेमेंद्र पवार (२२) या दोघांनाही पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, मृत अंकुश पवारचे वडील साहेबराव पवार हे मिरज शहर पोलीस ठाण्याकडे सहायक फौजदार म्हणून कार्यरत आहेत.