प्लास्टिक भंगार व्यावसायिक मुकेश चव्हाण यांची दगडाने ठेचून व गळा दाबून हत्या करण्यात आली. यात दोन आरोपींना एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे. सुभाष अमरिक पासवान आणि दुर्गाप्रसाद बंसी यादव अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींचा नावे आहेत.
गजानन नगरातील रहिवासी मुकेश रमेशकुमार चव्हाण (४२) हा मूळचा दिल्लीचा असून व्यवसायाच्यानिमित्ताने नागपुरात आला होता. आरोपी सुभाष पासवान, दुर्गाप्रसाद यादव आणि मुकेश चव्हाण यांच्यासह पाच ते सहाजण जुगार खेळत होते. जुगार पैशावरून वाद झाल्याने सुभाष, दुर्गाप्रसाद आणि त्याच्या साथीदारांनी  मुकेशच्या डोक्यावर दगडाने वार केल्यानंतर त्याची गळ दाबून हत्या करण्यात आली. त्याचा मृतदेह एका झुडपात फेकून ते पसार झाले. मृतदेह लपवून ठेवलेल्या झाडांची पाने परिसरातील बकऱ्यांनी खाऊन घेतल्याने एका गुराख्याला मृतदेह दिसला. त्याने एमआयडीसी पोलिसांना माहिती दिली. मुकेशचा भाऊ राकेशकुमार घटनास्थळी आल्यानंतर त्याची ओळख पटली. त्याने दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी या घटनेत दोन आरोपींना अटक केली. अन्य साथीदार फरार असून त्यांचा शोध घेतला जात आहे.
दिल्ली आणि उत्तरप्रदेशमधून मोठय़ा प्रमाणात हे युवक रोजगार करण्यासाठी एमआयडीसीत आले. या परिसरात गेल्या काही दिवसांपासून त्याची गुंडगिरी सुरू आहे. ते  कंपन्यासमोर जुगार खेळत असतात. मुकेशचा खून केल्यानंतर त्यातील अनेक आरोपी गावी फरार झाले असण्याची शक्यता वर्तविण्यात आली. पोलिसांचे एक पथक उत्तरप्रदेशमध्ये रवाना करण्यात आले आहे.