वारजे माळवाडीच्या उड्डाणपुलाजवळील स्टर्लिग सोसायटीमधील सदनिकेत पती-पत्नीच्या गळय़ावर धारदार शस्त्रांनी वार करून खून केल्याची घटना मंगळवारी पहाटे उघडकीस आली. या दाम्पत्याकडे गेल्या सात वर्षांपासून राहणारे दोन तरुण गायब असून त्यांनीच चोरीच्या उद्देशाने खून केल्याचा पोलिसांचा संशय आहे. त्यांच्या घरातील पंचवीस लाख रुपये व मोटार चोरीला गेली आहे. या प्रकरणी वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांची पाच पथके आरोपींचा शोध घेण्यासाठी रवाना झाली आहेत.
कमलाकर शंकरराव रणगेरी (वय ५५) आणि त्यांची पत्नी शिमला कमलाकर रणगेरी (वय ५०, रा. स्टर्लिग अपार्टमेंट, वारजे माळवाडी, मूळ गाव कर्नाटक) असे खून झालेल्या दाम्पत्याचे नाव आहे. या प्रकरणी सोसायटीचे संचालक अजित मनोहर साळुंके (वय ४६) यांनी फिर्याद दिली आहे. सहायक पोलीस आयुक्त के. सी. लवंगे यांनी दिलेल्या माहितीनुसार, कमलाकर यांचा ट्रॅव्हल एजन्सीचा व्यवसाय आहे. त्यांना मुले नाहीत. गेल्या सात वर्षांपासून ते या ठिकाणी राहतात. तेव्हापासूनच त्यांच्याकडे दीप बहादूर तमांग (वय २२) आणि सनी लामा (वय २१) हे तरुण राहतात. यातील तमांग हा सिंहगड कॉलेजमध्ये अभियांत्रिकीचे शिक्षण घेत आहे, तर लामा हा त्यांच्या घरी स्वयंपाकी म्हणून काम करतो. कमलाकर यांच्या पत्नीचे ते नातेवाईक असून दोघेही नेपाळी आहेत.
कमलाकर यांच्या शेजारी राहणाऱ्या ओमकार गद्रे या तरुणाला मंगळवारी मध्यरात्रीनंतर एक वाजता गाडी पाठीमागे घेण्याचा जोरात आवाज आला. त्याने खाली पाहिले असता तीन तरुण इंडिका मोटार घेऊन जाताना दिसले. ती मोटार कमलाकर यांची असल्याचे त्याला समजल्याने त्याने त्यांच्या सदनिकेजवळ जाऊन पाहिले असता त्याला सदनिकेचा दरवाजा व कपाट उघडे दिसले. त्याने कमलाकर यांच्या वरच्या मजल्यावर राहणारे सोसायटीचे संचालक साळुंके यांना ही माहिती दिली. त्यांनी खाली येऊन सोसायटीत चोरी झाल्याचे पोलीस नियंत्रण कक्षाला कळविले. रात्रीच्या गस्तीवर असणारे सहायक पोलीस निरीक्षक चांदगुडे, फौजदार जाधव हे घटनास्थळी काही मिनिटांमध्ये पोहोचले. त्यांनी सदनिकेच्या हॉलमध्ये जाऊन पाहिले असता कमलाकर यांचा मृतदेह आढळून आला. त्यांच्या गळय़ावर व पोटावर तीक्ष्ण हत्यारांनी वार करण्यात आले होते. आतमध्ये बेडरूमध्ये शिमला यांचा मृतदेह आढळला आणि त्यांच्याही गळय़ावर व पोटावर तीक्ष्ण हत्यारांनी वार केल्याचे आढळून आले. चांदगुडे यांनी घटनेची माहिती पोलीस नियंत्रण कक्ष, वारजे पोलिसांना कळविली. काही वेळात पोलीस घटनास्थळी पोहोचले. चौकशी केली असता त्यांच्याकडे राहणारी दोन मुले व कमलाकर यांची मोटार गायब असल्याचे दिसून आले. गद्रे याने तीन व्यक्ती मोटार घेऊन पळून गेल्याचे सांगितले. त्यानंतर सर्व पोलीस ठाण्यास नाकाबंदी करण्याच्या सूचना देण्यात आल्या. त्याचबरोबर सर्व मार्गावरील टोलनाक्यांवरही सूचना देण्यात आल्या. कमलाकर यांच्याबाबत सोसायटीचे संचालक साळुंके यांनी पोलिसांना सांगितले, की गेल्या सात वर्षांपासून कमलाकर हे या सदनिकेत राहतात. त्यांच्याकडे लामा व तमांग हे दोन तरुण राहतात. १४ डिसेंबर रोजी कमलाकर यांनी राहात असलेली सदनिका विकली होती. त्यातून त्यांना रोख बारा लाख व साडेतेरा लाखांचा डीडी मिळाला होता. ही माहिती मिळताच सदनिकेतील कपाटे पाहिली असता सर्व उघडी दिसून आली. त्यामुळे त्यांच्याकडे राहणाऱ्या दोघांनीच पैशाच्या लालसेपोटी हा खून केला असल्याचा पोलिसांचा संशय आहे. कमलाकर यांची चोरून नेलेली मोटार लोणावळा बसस्थानकाजवळ मंगळवारी सकाळी मिळाली आहे. आरोपींच्या शोधासाठी पाच पथके तयार करण्यात आली आहेत, असे लवंगे यांनी सांगितले. पोलीस उपायुक्त डॉ. संजय शिंदे यांनी घटनास्थळाची पाहणी केली. आरोपींना लवकरच अटक केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.