* टोळक्याची महापौरांच्या वाहनावर दगडफेक
* महापौरांच्या भावासह पाच जणांविरूद्ध गुन्हा
वेळोवेळी विविध राजकीय मंडळींचा वरदहस्त लाभलेला सराईत गुन्हेगार मोहन चांगले आणि त्याचा साथीदार दीपक सोनवणे यांच्या हत्येनंतर चांगले समर्थकांनी मंगळवारी मध्यरात्रीपासून धुडगूस घालण्यास सुरूवात केल्यामुळे शहरात निर्माण झालेले तणावाचे वातावरण सलग दुसऱ्या दिवशी कायम होते. महापौरांच्या वाहनासह शहर वाहतुकीच्या बसवरही कारण नसताना दगडफेक करण्यात आली. जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या आवारात जमलेल्या जमावाने या प्रकरणातील आरोपींना अटक करा, अशी मागणी करीत चांगलेचा मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला. या पाश्र्वभूमीवर, पोलीस आयुक्तांनी सर्व आरोपींना चोवीस तासात अटक करण्याचे आश्वासन दिल्यानंतर नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेतला आणि शासकीय रुग्णालयातील तणाव निवळला. या प्रकरणी पोलिसांनी महापौरांच्या भावासह पाच जणांविरुद्ध खूनाचा गुन्हा गंगापूर पोलीस ठाण्यात दाखल केला आहे. या घटनेमुळे नाशिकमध्ये टोळीयुध्द भडकण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
गंगापूर रोडवरील एका हॉटेलमध्ये मंगळवारी रात्री अकराच्या सुमारास अंतर्गत वादातून ही घटना घडली. आपल्या काही मित्रांसह मोहन चांगले या ठिकाणी भोजनासाठी गेला होता. त्यावेळी अंतर्गत वादातून परस्परांमध्ये बाचाबाची होऊन त्याचे पर्यावसन प्राणघातक हल्ल्यात झाले. या हल्ल्यात चांगलेसह दीपक सोनवणे हे दोघे गंभीर जखमी झाले. दोघांना कॉलेजरोडवरील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरू असताना प्रथम चांगले व नंतर सोनवणे यांचा मृत्यू झाला. चांगलेवरील प्राणघातक हल्ल्याची माहिती समजल्यानंतर त्याचे समर्थक, काही आजी-माजी नगरसेवक व राजकीय पदाधिकाऱ्यांनी रुग्णालयात धाव घेतली. अशोक स्तंभ, आनंदवल्ली, रामवाडी, गंगावाडी, कॉलेजरोड भागात तणावाचे वातावरण निर्माण झाले. पोलिसांनी लागलीच ठिकठिकाणी बंदोबस्त तैनात करीत कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही, याची दक्षता घेतली. तथापि, एका टोळक्याने मध्यरात्री दीड ते दोनच्या सुमारास महापौरांच्या टिळकवाडीतील ‘रामायण’ या निवासस्थानाजवळ गोंधळ घातला. यावेळी महापौरांच्या वाहनाच्या काचा फोडण्यात आल्या व दगडफेक करण्यात आली.
बुधवारी सकाळी चांगलेचा मृतदेह जिल्हा शासकीय रुग्णालयात विच्छेदनासाठी आणण्यात आला. रूग्णालयाच्या आवारात काही वेळातच ५०० ते ६०० जण जमा झाले. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन परिसरात पोलीस बंदोबस्तही वाढविण्यात आला. चांगलेच्या नातेवाईकांनी व जमावाने हल्लेखोरांना त्वरीत अटक करण्याची मागणी केली.
चांगलेची नियोजनपूर्वक हत्या करण्यात आली असून त्यात महापौर अ‍ॅड. यतिन वाघ यांचा भाऊ दादा वाघ याचाही सहभाग असल्याचा आरोप संबंधितांनी केला. सर्व हल्लेखोरांना अटक होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याची भूमिका चांगले समर्थकांनी घेतली. यामुळे निर्माण झालेला पेच सोडविण्यासाठी पोलीस अधिकाऱ्यांनी केलेले प्रयत्न निष्फळ ठरले. याच सुमारास काही जणांनी त्र्यंबक रस्त्यावरून जाणाऱ्या शहर बसवर दगडफेक केली. अखेर पोलीस आयुक्त कुलवंतकुमार सरंगल हे या ठिकाणी धडकले. या प्रकरणातील संशयितांना चोवीस तासात अटक केली जाईल, असे आश्वासन त्यांनी संबंधितांना दिले. त्यानंतर चांगलेच्या नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेण्यास संमती दिली. रुग्णालयातील तणावाचे वातावरणही यामुळे निवळले. दरम्यान, या हत्येप्रकरणी अ‍ॅड. राजेंद्र रघुनाथ वाघ उर्फ दादा वाघ, गिरीश अप्पू शेट्टी, अर्जुन संपत पगारे, राकेश कोष्टी व व्यंकटेश मोरे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अंतर्गत वादातून काटा काढल्याचा संशय
मोहन चांगलेवर खंडणी, प्राणघातक हल्ले, दरोडा असे अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. त्याच्यावर दोन ते तीन वेळा तडिपारीची कारवाईही करण्यात आल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. रिक्षाचालक संघटनेचा पदाधिकारी असणारा चांगले आता जमीन खरेदी-विक्रीचे व्यवहार करू लागला होता. टोळीतील काही जुन्या सहकाऱ्यांशी असणाऱ्या वादातून त्याची हत्याचा झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. चांगलेने जय बजरंग ग्रुपच्या नावाने गट सक्रिय केला होता. अनेक नामचीन गुन्हेगारांसोबत चांगले कार्यरत असल्याचे सांगितले जाते. परस्परांमध्ये काही कारणास्तव वितुष्ट झाल्यामुळे बाहेर पडलेल्यांच्या टोळ्या निर्माण झाल्या. त्याच्यातील अंतर्गत वादातून हा प्रकार घडल्याचे बोलले जाते. अशाच वादातून दीड वर्षांपूर्वी चांगलेच्या चूलत भावाचीही हत्या झाली होती. चांगलेच्या हत्या प्रकरणात अर्जुन पगारे या तडिपार गुंडाचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले आहे.