तुषार याने कोणाचे काय बिघडवले होते, की अशी वेळ त्याच्यावर यावी. आज घणसोली रेल्वे स्थानकावर त्याच्या रक्ताचे डाग पाहिल्यावर कंप सुटतो. त्याला वेळीच रुग्णालयात दाखल केले असते तर त्याचे प्राण वाचले असते. तुषार याच्या खुन्यांना मृत्युदंडापेक्षाही कठोरातील कठोर शिक्षा द्या असा टाहो तुषार याची मावशी सविता होनमुख यांनी वाशी रेल्वे पोलिसांसमोर फोडला होता. हे आर्जव ऐकून वर्दीतील त्या माणसाचेही मन हेलावले होते.
बुधवारी दुपारी वाशी रेल्वे पोलिसांनी तुषार याच्या खूनप्रकरणी अटक केलेल्या जयंता बाबुल सोम ऊर्फ राजा हिन्दू आणि माधव नकुल सरकार या दोन आरोपींना न्यायालयात घेऊन जात असताना भावना अनावर झालेल्या सविता यांनी त्यातील एका आरोपीला पकडून तुषारला का मारलेत असा सवाल त्याला विचारला. घराचा एकमेव आधार असलेला तुषार याच्या जाण्याने त्याचे आई-वडील आणि बहीण या दु:खाने कोलमडले असून वडिलांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. आजही तुषार याचा आवाज आमच्या कानात घुमत असल्याचे त्यांनी सांगितले. तुषार याला ठाण्यापेक्षा घणसोलीमधील कोणत्याही रुग्णालयात दाखल केले असते तर त्याचे प्राण वाचले असते. त्याचा खून चोरीच्या उद्देशाने झाला नसून त्यामागे दुसरे काही कारण असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला. महत्त्वाचे म्हणजे तुषार याचा खून केल्यानंतर आरोपी वाशी-सानपाडा रेल्वे स्थानकात गेल्या सहा दिवसापासून वावरत असल्याचे उघड झाले आहे. अटक करण्यात आलेल्या जयंता सोम सानपाडा रेल्वे स्थानक परिसरातून दुसरा आरोपी माधव नकुल सरकार याला त्याच रात्री वाशी रेल्वे स्थानकाबाहेरील बुकिंग हॉलच्या कोपऱ्यामध्ये झोपलेला असताना ताब्यात घेण्यात आले आहे. यामुळे रेल्वे स्थानकामधील प्रवाशांची सुरक्षा ऐरणीवर आली असून एखाद्याचा खून केल्यानंतर खुनी असे मुक्त वावरत असतील आणि रेल्वे पोलीस यंत्रणा काय करते असा सवाल प्रवाशांकडून उपस्थित केला जात आहे.
ऐरोली येथे राहणारा तुषार जाधव रत्नागिरी येथील एका आभियांत्रिकी महाविद्यालयात शेवटच्या वर्षांत शिकायला होता. परीक्षा संपल्यानंतर १२ जून रोजी पहाटे पनवेल येथे उतरून ठाणे लोकलने तुषार घरी परत येत असताना त्याच्यासोबत माल डब्यात बसलेले जयंता बाबुल सोम ऊर्फ राजा हिन्दू आणि माधव नकुल सरकार या दोघा तरुणांनी कोपरखैरणे आणि घणसोली स्थानकादरम्यान चाकूचा धाक दाखवत लुटण्याचा प्रयत्न केला होता. मात्र तुषार याने त्यांना प्रतिकार करीत मदतीसाठी आरडाओरड केल्याने त्यांनी गळ्यावर चाकूने त्याच्यावर हल्ला चढवीत, घणसोली स्थानकातून पळ काढला. तुषार याचा आवाज ऐकून घणसोली रेल्वे स्थानकात लोकल थांबताच पोलीस हवालदार बाळकृष्ण मोडक यांनी मालडब्याकडे धाव घेतली होती. यावेळी रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या तुषारला त्यांनी ठाण्यातील सरकारी रुग्णालयात दाखल केले, मात्र त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले. या प्रकरणातील आरोपींच्या सीसी टीव्ही फुटेजच्या माध्यमातून मिळालेल्या छायाचित्राद्वारे वाशी रेल्वे पोलीस शोध घेत होते. मंगळवारी रात्री तुषार याची क्रूरपणे हत्या करणारे जयंता बाबुल सोम ऊर्फ राजा हिन्दू आणि माधव नकुल सरकार या दोघांना अटक करण्यात आली.