राष्ट्रीय एकता कवि संमेलनातून एकात्मतेच्या संदेशाचा प्रसार होत असल्याने कौमी एकता मुशायरा सारखे कार्यक्रम वारंवार व्हावेत, असे प्रतिपादन अतिरिक्त पोलीस अधीक्षक सुनिता ठाकरे-साळुंके यांनी केले.
मुशायरा कमेटीतर्फे आयोजित १२ व्या ऑल इंडिया कौमी एकता मुशायरा कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून त्या बोलत होत्या. व्यासपीठावर नगराध्यक्षा राजश्री ससाणे, पक्षप्रतोद संजय फंड, ज्येष्ठ नेते जलील खान पठाण, नगरसेवक संजय छल्लारे, हाजी अंजूम शेख, रिवद्र गुलाटी, अॅड. विजय बनकर, डॉ. रिवद्र कुटे, जावेद काझी, रंजना पाटील आदी उपस्थित होते.
प्रास्तविकात मुशायरा कमेटीचे संस्थापक व संयोजक सलीमखान पठाण यांनी गेल्या १२ वर्षांत या कार्यक्रमाने मोठी लोकप्रियता मिळविल्याचे सांगून सर्व जातीधर्माच्या मित्रांनी एकत्र येवून स्थापन केलेली मुशायरा कमेटी ही खऱ्या अर्थाने राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतिक असल्याचे सांगितले. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दिप प्रज्वलन करुन मुशायराचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी मुशायरा कमेटीतर्फे दिला जाणारा ‘रफअते परवाज नॅशनल अवॉर्ड २०१३’ हा मालेगावचे ज्येष्ठ उर्दू कवी डॉ. नईम अख्तर यांना ससाणे व ठाकरे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
हास्यकवी लक्ष्मण नेपाली (भोपाळ) तसेच उर्दू कवी हामीद भुसावली, अज्म शाकिरी, टिपीकल जदतियासी, डॉ. नईम अख्तर, आनंदा साळवे, ओम तिवारी यांनी आपल्या रचना सादर करुन प्रेक्षकांची पसंती मिळविली. नांदेडचे प्रसिध्द उर्दू कवी फिरोज रशीद यांनी निवेदन आपल्या नेहमीच्या खुमासदार शैलीत केले. कार्यक्रमास जिल्हाभरातून अनेक मान्यवर उपस्थित होते. स्वागताध्यक्ष रिवद्र गुलाटी यांनी स्वागत केले. कार्याध्यक्ष विजयराव बनकर यांनी सर्वाचे आभार मानले.