जयपूर-अत्रौली घराण्याचे ज्येष्ठ गायक पं. निवृत्तीबुवा सरनाईक यांच्या स्मृतीनिमित्त दरवर्षीप्रमाणे संगीत महोत्सव शनिवारी (दि. २९) सायंकाळी केशवराव भोसले नाटय़गृहात आयोजित केला आहे. या मैफलीत पद्मश्री पं. उल्हास कशाळकर व डॉ. भारती वैशंपायन आपली कला सादर करणार आहेत, अशी माहिती पं. निवृत्तीबुवा सरनाईक संगीत महोत्सव समितीचे सदस्य विनोद डिग्रजकर व राजेंद्र सरनाईक यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. डिग्रजकर म्हणाले, पं. निवृत्तीबुवांचा जन्म ४ जुलै, १९१२ रोजी कोल्हापुरात झाला. महाराष्ट्र कोकीळ शंकरराव सरनाईक हे त्यांचे काका. शंकरराव सरनाईक व त्यांची यशवंत नाटक कंपनी यांचा बुवांच्या जडणघडणीत फार मोठा वाटा आहे. बुवांना महाराष्ट्र गौरव पुरस्कार, मध्य प्रदेश शासनाचा तानसेन पुरस्कार केंद्र सरकारतर्फे संगीत नाटक अॅकॅडमी पुरस्कार असे विविध पुरस्कार त्यांना मिळाले आहेत. पद्मश्री कशाळकर यांच्या गाण्यामध्ये ५० वर्षांपूर्वीच्या गायकांचे विचार व खुशबू अनुभवास मिळते. तरीही आधुनिक काळाचे भान राखले जाते. त्यांनी ग्वाल्हेर, आग्रा आणि जयपूर गायकी आत्मसात केली आहे. डॉ. वैशंपायन या सध्या शिवाजी विद्यापीठात संगीत विभागप्रमुख म्हणून कार्यरत आहेत. सुरुवातीचे त्यांचे गाण्याचे शिक्षण पं. चिंतूबुवा म्हैसकर, त्यानंतर पं. सुधाकरबुवा डिग्रजकर यांच्याकडे झाले. तसेच त्यांना जयपूर घराण्याचे ख्यातनाम गायक पं. निवृत्तीबुवा सरनाईक यांच्याकडूनही शिकायला मिळाले.