संगीत नाटय़चळवळीला गती देता यावी, यासाठी चित्पावन ब्राम्हण मंडळातर्फे दि. ७ व ८ डिसेंबर रोजी दोन संगीत नाटकांचे आयोजन करण्यात आले आहे. संगीत ‘मानापमान’ व संगीत ‘संशयकल्लोळ’चे प्रयोग होणार असल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष विकास गोंधळेकर यांनी रविवारी दिली. नव्या पिढीला आवडतील असे बदल या नाटकात करण्यात आले असून, नाटय़संगीतात स्वत:चा ठसा उमटविणारे गायक राहुल देशपांडे या दोन्ही नाटकांत काम करणार आहेत. सिडको येथील संत तुकाराम नाटय़गृहात या दोन्ही नाटकांचे प्रयोग रात्री नऊ वाजता होणार आहेत.
  गेल्या वर्षी अशाच प्रकारे आयोजित करण्यात आलेल्या संगीत नाटकाच्या प्रयोगास उत्तम प्रतिसाद मिळाल्याने पुन्हा दोन संगीत नाटकांची मेजवानी रसिकांना मिळणार आहे. या नाटकाच्या उत्पन्नातून मिळणारा काही भाग अनाथ मुलांसाठी काम करणाऱ्या ‘साकार’ या संस्थेला दिला जाणार आहे.
 संगीत ‘मानापमान’ हे संगीत नाटक १९११ साली रंगभूमीवर आले. यातील नाटय़गीते आजही ऐकली जातात. शुरा मी वंदिले, नाही मी बोलत या नाटय़गीतांमुळे तसेच केशवराव भोसले, बालगंधर्व, दीनानाथ मंगेशकर यांच्या अदाकारीने ही कलाकृती अजरामर झाली. या नाटकानंतर पाच वर्षांनी रंगभूमीवर आलेल्या संगीत ‘संशयकल्लोळ’ या नाटकाचे गारुड तर आजही आहे. वसंतराव देशपांडे यांच्या आवाजातील मृगनयना रसिक मोहिनी, हे नाटय़गीत असो वा संशय का मनी आला हे नाटय़गीत असो वसंतराव देशपांडे आणि जयमाला शिलेदार यांनी केलेल्या ताकदीच्या स्वराभिनयामुळे ही कलाकृती गाजली होती. मूळ पाचअंकी आणि ६५ नाटय़गीत असणारे हे नाटक आता दोन अंकात व १६ नाटय़गीतांसह सादर होणार आहे. राहुल देशपांडे यांच्या ‘राही या संस्थेच्या वतीने हे नाटय़निर्मिती करण्यात आली आहे. या कार्यक्रमाच्या आयोजनात अरिवद जोशी, सुभाष आपटे, सचिन ओक, श्रीकर घाणेकर यांचा सहभाग आहे.