हिवाळे शिक्षण संस्थेच्या आयएमएससीडीआर या व्यवस्थापन संस्थेत आयोजित करण्यात आलेल्या व्यवस्थापनावरील आंतरराष्ट्रीय परिसंवादात सहभागी पाहुण्यांना पाहिल्या दिवशी ‘राज कपूर ते राजेश खन्ना’ या हिंदी चित्रपटसृष्टीच्या सुवर्णकाळातील बहारदार आठवणींची मेजवानी मिळाली. संस्थेतीलच विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या या सांस्कृतिक कार्यक्रमाने सर्वाची मने जिंकली.
आंतरराष्ट्रीय परिषदेचे उदघाटन आणि विविध विषयांच्या सत्रानंतर सायंकाळी या पाहुण्यांसाठी मनोरंजनाचा हा कार्यक्रम सादर करण्यात आला. प्रा. ज्ञानेश कुलकर्णी यांची संकल्पना आणि दिग्दर्शन असलेल्या या सांस्कृतिक कार्यक्रमात हिंदी चित्रपटाचा सांगितिक आढावा घेण्यात आला. राज कपुर यांच्या श्री ४२० मधील ‘प्यार हुआ, इकरार हुआ..’ या गाण्यापासुन सुरू झालेला हा संगीत प्रवास राजेश खन्ना यांच्या आराधनामधील ‘गुन गुना रहे है भवरे..’ या गाण्यापाशी येऊन थांबला. जॉनी वॉकर, देवानंद, राजेंद्रकुमार, मीनाकुमारी, शम्मी कपूर, किशोरकुमार, महेमूद यांच्या सिनेमा कारकिर्दीचा पट ऑडिओ-व्हिज्युअल तंत्राने उलगडत विद्यार्थ्यांनी त्या, त्या काळातील या कलाकरांच्या तत्कालीन वेषभुषेसह नृत्याद्वारे सादर करत त्यांना आदरोजली वाहिली.
हे या सांगितिक प्रवासाचे वैशिष्ठय़ ठरले. त्याला उपस्थितांची टाळ्यांच्या गजरात दाद मिळाली.
अंजली खोकर व स्वप्नील साळवे यांनी या मैफलीचे निवेदन केले. राजेंद्र मनवेलीकर यांच्या आकर्षक प्रकाशयोजनेने मैफल आणखी फुलवली.
प्रा. विक्रम बार्नबस व अभिजित क्षिरसागर यांचे या कार्यक्रमाला सहकार्य लाभले. संस्थेतील २५ विद्यार्थी, विद्यार्थिनी या मैफलीत सहभागी झाले होते. संस्थेचे सरसंचालक डॉ. शरद कोलते, संचालक डॉ. एम. बी. मेहता यांच्यासह उपस्थितांनी सर्व कलाकारांचे अभिनंदन केले.