कशाळकर पिता-पुत्राच्या मैफलीने रसिक मंत्रमुग्ध

आर्य संगीत प्रसारक मंडळातर्फे आयोजित या महोत्सवाचा ‘लोकसत्ता’ माध्यम प्रायोजक आहे. संजीव चिमलगी यांच्या गायनाने गुरुवारच्या सत्राची सुरुवात झाली. ‘किराणा’, ‘ग्वाल्हेर’ आणि ‘आग्रा’ अशा तीन घराण्यांच्या गायकीचे प्रतििबब त्यांच्या गायनातून उमटले. ‘भीमपलास’ रागातील विलंबित एकताल, मध्य लय त्रिताल आणि द्रुत एकताल अशा तीन बंदिशी त्यांनी सादर केल्या. आपल्या प्रभावी गायनाने त्यांनी श्रोत्यांना खिळवून ठेवले. माधव गुडी यांना समर्पित केलेल्या या मैफलीमध्ये संजीव चिमलगी यांनी ‘सौभाग्यदा लक्ष्मी बारम्मा’ हे संत पुरंदरदासांचे कन्नड भजन सादर केले. त्यांच्या गायनाबरोबरच माउली टाकळकर यांच्या टाळवादनाच्या साथीला रसिकांनी टाळ्यांचा कडकडाट करून दाद दिली. त्यानंतर मंडळाचे कार्याध्यक्ष श्रीनिवास जोशी यांच्या आग्रहास्तव त्यांनी ‘गुरुजी मै तो एक निरंजन’ हे पं. कुमार गंधर्व यांनी अजरामर केलेले निर्गुणी भजन गाऊन मैफल संपविली.
पं. कुमार गंधर्व यांच्या कन्या कलापिनी कोमकली यांचे स्वरमंचावर आगमन झाले. ‘मुलतानी’ रागातील तीन बंदिशी त्यांनी सादर केल्या. स्वरांचा पाठलाग करणाऱ्या सुयोग कुंडलकर यांच्या संवादिनीवादनाला उत्स्फूर्त दाद मिळाली. या रागानंतर कलापिनी यांनी ‘हमीर’ रागातील पं. कुमारजींच्या दोन बंदिशी सादर केल्या. त्यांच्या प्रभावी गायनाने श्रोते मंत्रमुग्ध झाले. पहिल्या मैफलीपासूनच अभिजात संगीत श्रवणाचा लाभ झालेल्या रसिकांनी दोन कलाकारांच्या मैफलीदरम्यान आपली जागा सोडली ती उस्ताद अब्दुल करीम खाँसाहेबांच्या चित्र प्रदर्शन पाहण्यासाठीच.
फारुख लतिफ खान आणि सरवार हुसेन या काका-पुतण्याच्या सारंगीवादनाने श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. या दोघांनी आपल्या वादनातून ‘श्री’ या सायंकालीन रागाचे सौंदर्य उलगडले. त्यांना अखिलेश गुंदेचा यांनी पखवाजची समर्पक साथसंगत केली. कधी सहवादन, तर कधी जुगलबंदी अशा सुरांच्या अनोख्या मेजवानीचा लाभ श्रोत्यांना घडला.
पं. उल्हास कशाळकर आणि समीहन या पिता-पुत्राच्या मैफलीपूर्वी समीहन यांचे स्वतंत्र गायन झाले. या स्वरमंचावर प्रथमच कलाविष्कार सादर करणाऱ्या समीहन यांनी राग ‘केदार’मधील दोन बंदिशींनंतर त्याला जोडूनच द्रुत त्रितालातील ‘तराणा’ सादर केला. पं. उल्हास कशाळकर यांच्या रससिद्ध गायकीतून ‘बिहागडा’ रागाचे सौंदर्य उलगडले. या दोघांनाही डॉ. अरिवद थत्ते यांनी संवादिनीची आणि तालयोगी पं. सुरेश तळवलकर यांनी तबल्याची साथ केली. त्यानंतर ‘सोहनी’ रागातील बंदिश आणि ‘जमुना के तीर’ या रंगलेल्या ‘भैरवी’ने मैफलीची सांगता झाली.