देऊळगावराजा शहरातील कायमस्वरूपी पाणीटंचाई संपुष्टात आणण्यासाठी खडकपूर्णा प्रकल्पावरून नळ योजनेला मंजुरी देण्यात यावी, शहराला तिसऱ्या दिवशी पाणीपुरवठा करण्यात यावा, यासह इतर मागण्यांसाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीने नगरपालिकेवर डफडे मोर्चा काढण्यात आला.
हा मोर्चा जुनी नगरपालिका चौक, जुना जालना रोड, संत चौक, बसस्थानक चौक मार्गे नगरपालिकेवर काढण्यात आला. मोर्चात शहर व परिसरातील नागरिक मोठय़ा संख्येने सहभागी झाले होते. विशेष म्हणजे, या मोर्चात महिलांची लक्षणीय उपस्थिती होती. मोर्चादरम्यान पाणी द्या, अन्यथा खुच्र्या खाली करा, अशा घोषणा देऊन मोर्चेकऱ्यांनी शहर दणाणून सोडले होते. नगरपालिकेवर येताच मोर्चाचे जाहीर सभेत रूपांतर करण्यात आले. त्यानंतर मोर्चाच्या शिष्टमंडळाच्या वतीने नगरपालिको प्रशासनाला मागण्यांचे निवेदन देण्यात आले. गेल्या अनेक वर्षांंपासून राज्यात आणि केंद्रात कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसची सत्ता आहे. शिवाय, येथील नगरपालिकेतही राष्ट्रवादीची सत्ता आहे, परंतु गेल्या काही दिवसांपासून नगरपालिकेचा कारभार पूर्णता ढेपाळला आहे. नगरपालिकेच्या नियोजनशून्य कारभारामुळे शहराला भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. तीस दिवसाआड शहराला पाणीपुरवठा करण्यात येत आहे. यापूर्वी शहराला खडकपूर्णा धरणातून २३ टॅंकर्सच्या माध्यमातून पाणीपुरवठा करण्यात येत होता. शिवाय, अधिक पाच टॅंकर सुध्दा मंजूर झाले आहेत. असे असतानादेखील नागरिकांना महिन्याआड पाणी मिळत आहे.
शहराची कायमस्वरूपी पाणीटंचाई संपुष्टात आणण्यासाठी खडकपूर्णावरून नळ योजना मंजूर केली असती तर आज शहराला पाणीटंचाईचा सामना करावा लागला नसता, असा आरोपही मोर्चेकऱ्यांनी केला. पाण्यासाठी नागरिकांची हेळसांड थांबविण्यासाठी शहराला तिसऱ्या दिवशी पाणीपुरवठा करून खडकपूर्णावरून नळ योजनेला मंजुरात देण्यात यावी, यासह इतर मागण्या करण्यात आल्या आहेत. या मोर्चात डॉ.गणेश माटे, भगवान नागरे, सुदर्शन गिते, प्रा.गबाजी कुटे, दादा व्यवहारे, उदय छाजेड, राजेश भुतडा, शंकर तलबे, सचिन बनसोड, विनोद लहाने, खंडू माटे, सुनिता आंधळे, प्रतिक्षा उपाध्ये, नंदा पवार, शुभदा कुळकर्णी यांच्यासह असंख्य भाजपा कार्यकर्ते सहभागी झाले होते.