मात्र सध्या हिवाळ्याच्या तीन महिन्यांमध्ये या मैफिली जास्त रंगतात. पूर्वी समाजातील धनिकांच्या आश्रयाने चालणाऱ्या या मैफिलींचे स्वरूप आता बदलत्या काळाबरोबर ‘कॉर्पोरेट’ झाले आहे. आता या मैफिली पुरस्कर्त्यांच्या जोरावर चालतात.
मुंबईत १९७७ पासून गुणीदास संगीत संमेलन आयोजित करणारे ज्येष्ठ संतूरवादक पं. सतीश व्यास यांच्या म्हणण्याप्रमाणे गेल्या १५ वर्षांत शास्त्रीय संगीताच्या प्रांतातही ‘इव्हेंट मॅनेजर’ ही संकल्पना मोठय़ा प्रमाणात रुजली आहे. पूर्वी प्रत्येक उपनगरात एक म्युझिक सर्कल होते. या सर्कलचे काही ठरावीक सदस्य असायचे. या सदस्यांकडून गोळा केलेल्या वर्गणीतून वर्षभरात होणारे कार्यक्रम बसवले जायचे. त्यानंतर काही कलाकारांनीच पुढे येऊन महोत्सव आयोजित करण्यास सुरुवात केली. पुण्यात होणारा सवाई गंधर्व किंवा मुंबईत होणारे गुणीदास संगीत संमेलन ही याची ठळक उदाहरणे म्हणता येतील.
जागतिकीकरणाच्या प्रक्रियेमुळे अनेक क्षेत्रांचे व्यापारीकरण झाले. शास्त्रीय संगीतही याला अपवाद नाही. मात्र या क्षेत्रातील कलाकारांसाठी हे व्यापारीकरण फायद्याचे ठरले, असे मत पं. व्यास यांनी व्यक्त केले. विशेष म्हणजे या व्यापारीकरणाच्या प्रक्रियेमुळे अधिकाधिक बँका, कंपन्या शास्त्रीय संगीताच्या मैफिलींना पुरस्कर्ते म्हणून आश्रय देऊ लागल्या. यातच इव्हेंट मॅनेजर्सनी शास्त्रीय संगीताच्या मैफिली आयोजित करायला सुरुवात केली. त्यानंतरच मैफिलींची संख्या वाढली.
त्यातच गेल्या काही वर्षांमध्ये कलाकारच आयोजनात उतरलेले दिसतात. सध्या होणाऱ्या मैफिलींपैकी ७० टक्के मैफिली आयोजित करण्यामागे कलाकारांचाच हात असतो. याचा फायदा म्हणजे एक कलाकारच आयोजक असल्याने त्याला शास्त्रीय संगीतातील कलाकारांच्या गरजा माहीत असतात. त्याचप्रमाणे त्याच्या शब्दाखातर अनेक दिग्गज कलाकार एकाच महोत्सवात ऐकण्याची संधी लोकांना मिळू शकते.
याचप्रमाणे कार्यक्रमाच्या प्रसिद्धी तंत्रातही खूप बदल झाल्याचे पं. व्यास यांनी सांगितले. १९७५ ते १९९५ या काळात पब्लिक रिलेशन ही संस्था आकाराला आली नव्हती. त्या वेळी वर्तमानपत्रेही फारशी व्यावसायिक झाली नव्हती. त्यामुळे शास्त्रीय संगीताच्या अनेक संमेलनांचे वृत्तांत विनासायास छापून यायचे. मात्र आता परिस्थिती बदलली आहे. ‘पब्लिक रिलेशन’च्या एखाद्या माणसाला नेमण्याची गरज आता आयोजकांना वाटू लागली आहे.
कलाकार व वातावरण
नोव्हेंबर ते फेब्रुवारी या कालावधीत आपले अनेक कलाकार भारतातच असल्याने आणि हा काळ वातावरण, हवामान या दृष्टीने अत्यंत चांगला असल्याने जास्तीत जास्त मैफिलींचे आयोजन या तीन महिन्यांत केले जाते. यंदा या तीन महिन्यांत तब्बल ५० ते ५५ मैफिली मुंबईत होत आहेत.  
वैभव पाटील. (माध्यम इव्हेंट्स)
महोत्सव आयोजनाचा खर्च किती?
शास्त्रीय संगीताचा महोत्सव आयोजित करायचा असल्यास त्याचा खर्च तीन गोष्टींवर अवलंबून असतो. महोत्सवाचे आयोजक कोण आहेत? महोत्सव कुठे आयोजित केला जात आहे? आणि महोत्सवात कोण कोण कलाकार आहेत? मात्र साधारपणे महोत्सवाच्या आयोजनासाठी किमान १५ लाख रुपये खर्च येतो. यात एखादा दिग्गज कलाकार, इतर दोन तीन उगवते कलाकार यांचे मानधन, सभागृह भाडे, प्रसिद्धी व जाहिरात खर्च यांचा समावेश असतो. षण्मुखानंद, नेहरू सेंटर किंवा एनसीपीए या सभागृहांचे भाडेच दोन-तीन लाख रुपये असते. एनसीपीए वगळता इतर दोन सभागृहांमध्ये तिकिटांची किंमत कमीत कमी पाचशे रुपयांपासून जास्तीत जास्त दीड हजार एवढी असते.