जैन साध्वींवर हल्ले गांभीर्याने घेऊन त्यावर शासनाने योग्य उपाययोजना करावी, या मागणीसाठी शहर परिसरातील जैन बांधवांनी कराड तहसीलदार कार्यालयावर मूक मोर्चा काढून निवेदन सादर केले.
शहरातील मुख्य रस्त्याने तहसील कचेरीवर मूक मोर्चा नेण्यात आला. त्यामध्ये सुमतिनाथ महाराज ट्रस्ट, संभवनाथ महाराज ट्रस्ट, महावीर नमीनाथ जैन ट्रस्ट, अभिनंदन स्वामी जैन मंदिर, स्थानकवासी जैन संघ, राजराजेंद्र जैन मंदिर, पद्मप्रभू जैन मंदिर, दिगंबर जैन संघ, विमलनाथ जैन ट्रस्ट, मल्हारपेठ जैन ट्रस्ट, कुंथनाथ जैन ट्रस्ट आदींच्या सभासदांनी व जैन बांधवांनी सहभाग घेतला.
मोर्चेकऱ्यांनी दिलेल्या निवेदनात विविध मागण्या करण्यात आल्या आहेत. हे निवेदन केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या नावे असून, त्याची प्रत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, गृहमंत्री आर. आर. पाटील, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत, गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनाही पाठवण्यात आली आहे. निवेदनात म्हटले आहे की, जैन मुनीवर प्राणघातक हल्ला करणाऱ्यांना अटक करा. जैन तीर्थक्षेत्रावर जाणाऱ्या साध्वींना संरक्षण मिळावे. महामार्गावरून पायी चालत जाणाऱ्या साध्वींसाठी स्वतंत्र रस्ता करावा. त्यासाठी तातडीने तरतूद करावी. जैन मुनींवर हल्ला होणे याची गंभीर दखल घेऊन त्यावर महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान आदी सरकारनी उपाययोजना करावेत, योग्य कारवाई करावी अशा मागण्या करण्यात आल्या आहेत.