महानगरपालिकेच्या मालकीच्या खुल्या जागेची परस्पर खरेदी-विक्री झाल्याचा आरोप काँगेसचे शहराध्यक्ष बाळासाहेब भुजबळ यांनी केला आहे. शहराच्या मध्यवर्ती नालेगाव परिसरातील किमती मूल्य असलेला दोन एकरांपेक्षा मोठय़ा क्षेत्रफळाचा हा भूखंड मनपाने तातडीने ताब्यात घेऊन हा व्यवहार रद्द करण्याच्या दृष्टीने तातडीने कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे. या बेकायदेशीर व्यवहारात मनपाचे अधिकारी गुंतले असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
भुजबळ यांनी कायदेशीर कागदपत्र व पुराव्यानिशी ही बाब निदर्शनास आणून दिली आहे. मनपाने संबंधितांवर फौजदारी कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे. यासंदर्भात माहिती देताना त्यांनी सांगितले, की सात-बाराच्या उता-यावर नाव लावण्यात मनपाचे दुर्लक्ष झाल्याने हा प्रकार घटला आहे. त्याचा गैरफायदा घेऊन संबंधितांनी हा मोक्याच्या ठिकाणचा मोठा भूखंड लाटण्याचा प्रयत्न केला आहे.
विशेष म्हणजे मनपा आयुक्तांना निवेदन देऊन या प्रकाराकडे लक्षे वेधण्यात आले होते. मात्र तरीही त्याकडे गांभीर्याने पाहिले गेले नाही.
शहराच्या दुस-या सुधारित मंजूर विकास आराखडय़ामध्ये ही जागा मंजूर रेखांकनात ‘खुली जागा’ (ओपन स्पेस) म्हणून आरक्षित आहे. नालेगाव हद्दीतील सर्व्हे क्रमांक २४९ मधील सिटी सर्व्हे क्रमांक ७३९७ अ या जागेचे क्षेत्रफळ ७ हजार ८३९.१६ चौरस मीटर (८४ हजार स्क्वेअर फूट- २ एकर ४ गुंठे) आहे. ही जागा मूळ भीमराव यादव वाघ (राहणार नालेगाव) यांच्या मालकीची होती. मात्र मनपाने शहराच्या दुस-या सुधारित मंजूर आराखडय़ात ती आरक्षित केली. त्याचवेळी जागेला मनपाचे नाव लागणे गरजेचे होते. मात्र तशी नोंदच संबंधित विभागाने केली नाही. त्याचाच गैरफायदा घेऊन पुढे या जागेचे खरेदी-विक्रीचे व्यवहार सुरू आहेत.
मूळ मालक भीमराज यादव यांनी सन ८२ मध्ये नोंदणीकृत मृत्युपत्राद्वारे ही जागा गंगाधर मारुती जाधव यांच्या करून दिली. तेव्हापासून या जागेला त्यांचे नाव लागले आहे. जाधव यांनी अलीकडे म्हणजे मागच्या वर्षी हा भूखंड मनोज आसाराम कचरे यांना ५१ लाख ८० हजार रुपयांना विकला आहे. तशा खरेदीखताची नोंद आहे. या व्यवहारानंतर या भूखंडावर कचरे यांचे नाव लागले. या व्यवहारात कागदोपत्री वरील रकमेची नोंद असली तरी प्रत्यक्षात काही कोटी रुपयांना हा व्यवहार झाल्याचा संशय भुजबळ यांनी व्यक्त केला आहे.
या सगळ्या प्रकारात मनपाचे संबंधित विभागाचे अधिकारीही सामील असल्याचा आरोप भुजबळ यांनी केला आहे. त्यांनी जाणीवपूर्वक या भूखंडावर मनपाच्या नावाची नोंद केली नाही, की जेणेकरून बेकायदेशीर व्यवहाराला संधी दिली आहे. असे प्रकार अन्य जागांबाबतही झाले असण्याची शक्यता व्यक्त करून संबंधितांवर फौजदारी स्वरूपाची कारवाई करतानाच या भूखंडाचा बेकायदेशीर व्यवहार रद्द करून त्याला मनपाचे नाव लावावे, अशी मागणी भुजबळ यांनी केली असून तसे न झाल्यास न्यायालयात दाद मादण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.