बँकांच्या खात्यातून ग्राहकांचे पैसे गायब होण्याचे प्रकार वाढत आहेत. हे पैसे परतही मिळत नाही. पोलिसांनाही त्याचा शोध लागत नाही. पण पोलिसांनी कार्यक्षमतेने केलेल्या तपासामुळे आता एका शिक्षकाला त्याच्या खात्यातून गायब केलेले १ लाख १४ हजार रुपये परत मिळाले आहेत.
बँकांच्या खात्यावर ऑनलाइन व्यवहार केले जातात. ग्राहकांना हे व्यवहार करणे सुलभ जाते. बँकेत जाऊन रांगेत उभे राहून व्यवहार करण्यापेक्षा आता ग्राहक एटीएमचा वापर करून पैसे काढतो. ऑनलाइन व्यवहार करतो, घरबसल्या जगभरात मालाची खरेदी त्याला करता येते. ऑनलाइन व्यवहाराला बँका पैसे आकारत नाहीत. उलट प्रोत्साहन देतात पण काही गुन्हेगार ऑनलाइन बँकिंगच्या व्यवहारावर डल्ला मारतात. त्याचा ग्राहकांना मनस्ताप होतो.
गायकवाड यांचे एचडीएफसी बँकेच्या शहरातील शाखेत खाते आहे. या खात्यातून शनिवार दि. ९ रोजी १ लाख १७ हजार रुपये गायब झाले. हे पैसे कुणीतरी अज्ञात व्यक्तीने काढले होते. पोलीस निरीक्षक प्रकाश सपकाळे यांची त्यांनी भेट घेऊन घडलेला प्रकार सांगितला. सायबर क्राइमचा अभ्यास असलेले उपनिरीक्षक पाटील यांच्याकडे हे प्रकरण सोपविण्यात आले. सायबर गुन्हा लगेच नोंदवला जात नाही. आधी प्राथमिक चौकशी करून पोलीस अधीक्षकांची परवानगी घेतल्यानंतरच फिर्याद घेऊन गुन्हा नोंदविला जातो. त्यामुळे पाटील यांनी प्राथमिक चौकशी सुरू केली. त्यांनी बँकेचे शाखा व्यवस्थापक मनोज लोया यांची भेट घेतली. लोया यांनी तपासाला मोठी मदत केली. ऑनलाइन खरेदी-विक्री करणाऱ्या कंपनीशी अज्ञात गुन्हेगाराने केलेले व्यवहार त्यांनी थांबविले. पोलीस व बँकेच्या अधिकाऱ्यांनी एकत्रित केलेल्या प्रयत्नामुळे आता १ लाख १७ हजार रुपये पुन्हा गायकवाड यांच्या खात्यात जमा झाले आहेत. या प्रकरणाचा तपास अंतिम टप्प्यात आला आहे. उपनिरीक्षक पाटील यांनी गुन्हा दाखल होण्यापूर्वीच केलेल्या तपासामुळे गायकवाड यांचे गेलेले पैसे पुन्हा मिळाले आहेत.