जितेंद्रचा मुलगा आणि एकता क पूरचा भाऊ यापलिकडे तुषारला स्वत:ची ओळख अजून बनवता आलेली नाही. शाळेपासूनचा अभ्यासात हुशार असणारा विद्यार्थी, गणित पक्कं असल्याने आणि आवडीचं असल्याने मिशिगनच्या बिझनेस स्कूलमध्ये दोन वर्ष धडे गिरवणाऱ्या तुषारला आपण एवढे शिकलो तरी चित्रपटांशिवाय तरू शकत नाही, याचा साक्षात्कार झाला. आणि तो मुंबईत किंवा ज्या फिल्मी वातावरणात तो लहानाचा मोठा झाला तिथेच परतला. वडिलांनी आणि बहिणीने या हिंदी चित्रपटसृष्टीत ‘बालाजी टेलीफिल्मस’सारखं एक मोठं प्रॉडक्शन हाऊस उभारलं आहे. मात्र, एकताचा भाऊ आणि बालाजीच्या चित्रपटांचा नायक एवढय़ापुरतीच तुषारचा त्याच्याशी संबंध आहे, असे आपण म्हणतो. प्रत्यक्षात आई-बाबा आणि एकता तिघेही आपल्या बाबतीत तितकेच भावनिक आहेत आणि माझा सल्ला मग तो चित्रपटांच्या बाबतीत का असेना एकतासाठी सगळ्यात महत्त्वाचा आहे, असे तुषार सांगतो. रोहित शेट्टी आणि बालाजीच्या तद्दन व्यावसायिक चित्रपटांतून थोडा बाहेर डोकावू पाहणारा तुषार पहिल्यांदाच विनय पाठक, रणवीर शौरी अशी अभिनयाची वेगळी जातकुळी असलेल्या कलाकारांबरोबर ‘बजाते रहो’ सारखा विनोदी चित्रपट करतो आहे.
‘बजाते रहो’ हा माझ्यासाठी खरोखरच वेगळा चित्रपट ठरणार आहे कारण मी स्वत: विनोदी चित्रपट केले आहेत. तसेच रणवीर शौरी, विनय पाठक, डॉली अहलूवालिया हे कलाकारही विनोदी चित्रपटातून काम करणारे कलाकार आहेत. पण, तरीही आम्ही वेगवेगळ्या सिनेमाच्या प्रवाहातून आलो आहोत. ही मंडळी एकदम उत्तम कलाकार आहेत आणि अभिनयाच्या बाबतीत अतिशय गंभीर, अभ्यासू असे हे कलाकार आहेत. त्यांचे सिनेमाच्या बाबतीतले विचारही वेगळे आहेत. त्यामुळे त्यांच्याबरोबर काम करणे हे मला खूप काही शिकवून गेले आहे, असे तुषारने सांगितले. या चित्रपटाचा दिग्दर्शक शशांत शहा हा खरंतर तुषारचा मित्र. पण, ‘बजाते रहो’च्या चित्रिकरणाच्या वेळी मी फक्त त्याच्यातला दिग्दर्शक अनुभवला. शशांतने चित्रपटांकडे बघण्याचा माझा द्ृष्टिकोनच बदलून टाकला आहे, अशी प्रांजळ कबूली तुषारने दिली.
आत्तापर्यंतच्या कारकिर्दीत तुषारने विनोदी चित्रपट जास्त केले आहेत. ‘हो.. मी विनोदी चित्रपट जास्त के ले असल्याने तसेच चित्रपट मला आवडतात असा लोकांचा गैरसमज होतो. पण, मी ‘शोर इन द सिटी’, ‘खाकी’ सारखे गंभीर आणि वेगळ्या विषयावरचे चित्रपटही केले आहेत. त्यामुळे चित्रपटाचा विषय काय आहे याहीपेक्षा ज्या टीमबरोबर, लोकांबरोबर मी काम करतो आहे ते कसे आहेत. त्यांच्याशी माझ्या विचारांची नाळ जुळते का, हा निकष माझ्यासाठी महत्त्वाचा असतो. कारण, कलाकार-दिग्दर्शक यांच्याशी तुम्ही मनमोकळेपणे वागू शकलात तर त्याचे प्रतिबिंब तुमच्या कामातही उमटते, हा माझा विचार आहे. त्यामुळे रोहित शेट्टीचा ‘गोलमाल’ म्हटला की मी धमालच करणार किंवा ‘शूट आऊट’ची संजय गुप्ताची टीम असते तेव्हाही काम करायला फार मजा येते’, असे तुषारचे म्हणणे आहे.
‘गोलमाल’ चित्रपटातील गुंग्याची भूमिका ही आत्तापर्यंतची सर्वात अवघड आणि म्हणूनच लक्षात राहिलेली भूमिका असल्याचेही तुषारने यावेळी सांगितले. ‘पहिल्यांदा ‘गोलमाल’ चित्रपट करताना मूक माणसाची भूमिका कशी करायची आणि तीही विनोदी.. खूप मोठा प्रश्न होता. त्या भूमिकेसाठी मी रितसर प्रशिक्षण घेतलं, सराव केला आणि त्यानंतर कॅ मेऱ्यासमोर उभा राहिलो. पण, मला आज समाधान आहे की ती भूमिका ही माझी ओळख झाली आहे. मी कुठेही गेलो तरी लोकांना ती भूमिका आठवते आणि ते प्रशंसा करतात. आता रोहित ‘गोलमाल ४’ करणार की नाही हे माहित नाही पण, केलाच तरी त्या भूमिकेसाठी तो माझ्याशिवाय कुणाचा विचार करणार नाही. आणि दुसरे म्हणजे आता माझ्या त्या व्यक्तिरेखेला आवाज देऊन रंगवण्याचा विचारही त्याच्या मनाला शिवणार नाही,’ हेही तो विश्वासाने सांगतो.  
सध्या हिंदी चित्रपटांमध्ये सर्जनशीलतेला कुठलेही बंधन राहिलेले नाही. इथे एकाचेवळी रांझना, यह जवानी है दिवानी, फुकरे अशा तीन वेगवेगळ्या विषयांवरचे, छोट्या-मोठय़ा कलाकारांचे चित्रपट प्रदर्शित होतात आणि चांगली कमाईही करतात. कारण, सिनेमाच्या प्रेक्षकाला कुठलाही विषय अनवट राहिलेला नाही, असे मत तुषार व्यक्त करतो. आणि म्हणून याच काळात कलाकारांना त्यांची क्षमता सिध्द करण्याची जास्तीत जास्त संधी मिळते, असे त्याला वाटते. ‘गोलमाल’ हा जसा त्याच्या कारकिर्दीतला ‘टर्निँग पॉईंट’ होता तसाच सिनेमाच्या या प्रवाहात ‘बजाते रहो’ हा चित्रपटही आपल्याला वेगळ्या वळणावर नेऊ शकेल, अशी आशा तुषारला वाटते आहे.