एखाद्या विशिष्ट आजारावर त्याविषयी माहिती देता देता रुग्णाचे मनोविश्लेषण करणारे चित्रपट आले आहेत. ‘तारे जमीं पर’मध्ये डिसलेक्सिया या विकाराविषयी दाखविण्यात आले होते. ‘माय डियर यश’ या सिनेमात अतिशय हळुवार पण थेट पद्धतीने ‘स्वमग्नता’ यावर प्रकाशझोत टाकला आहे. उत्कृष्ट छायालेखन असलेल्या या सिनेमात दिग्दर्शकाने भाष्य करण्याचाही चांगला प्रयत्न केला आहे. स्वमग्नता हा आजार नाही हे संवेदनशील पद्धतीने आणि सकारात्मकदृष्टय़ा प्रेक्षकांच्या मनावर बिंबविण्यात दिग्दर्शक यशस्वी ठरला आहे, हे या सिनेमाचे यश म्हणता येईल.
कोणत्याही विकार अथवा व्यंग असलेल्या व्यक्तीची नाना प्रकारे खिल्ली उडविली जाते. तो अमुकतमुक ना, तो म्हणजे विचारलेल्या प्रश्नाचे धड उत्तर देत नाही म्हणजे खरे तर तो वेडा आहे, असे सहजपणे म्हणून लोक मोकळे होतात. आतापर्यंत विशिष्ट आजारांविषयी जागृतीपर असे चित्रपट येऊन गेले आहेत किंवा हिंदीच्या रूपेरी पडद्यावर सगळा मसालापट तयार करून त्यामध्ये हलकेच एखाद्या आजाराच्या रुग्णाची मनोवस्था जाता जाता टिपण्याचा प्रयत्न झालेला आहे. ‘माय डिअर यश’ या चित्रपटात स्वमग्न मुलाची जडणघडण आणि त्या मुलाच्या आई-वडिलांची कोंडी असा विषय हाताळला आहे.
चार-पाच वर्षांच्या यश या आपल्या मुलाकडे कायम ‘इन्व्हेस्टमेंट’ म्हणून पाहणारा त्याचा बाबा समीर देसाई आपल्या कुटुंबाच्या हुशार परंपरेप्रमाणेच आपला मुलगा यशही हुशार होईल, नव्हे तो तसा झालाच पाहिजे, सगळ्या गोष्टी त्याला जमल्याच पाहिजेत, आपण त्याला अमुकतमुक घडवू अशा अपेक्षा बाळगणारा आहे; परंतु छोटा यश चौकस नाही, विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे धड देत नाही. काही विचारले की नुसता इकडेतिकडे पाहतो, कधी घडाघडा बोलत नाही, यामुळे समीर वैतागला आहे. फॅमिली डॉक्टरच्या सल्ल्यानुसार डॉ. कामत यांना भेटल्यानंतर यशच्या आईला म्हणजे वैदेहीला समजते की यशला ऑटिझम आहे, म्हणजेच स्वमग्नता हा विकार आहे. डॉक्टर हेही सांगतात की, स्वमग्नता हा आजार म्हणून गणता येणार नाही. परंतु त्यावर निश्चित असा उपायही नाही. चिंतेत पडलेली वैदेही नोकरीनिमित्त दौऱ्यावर असलेल्या समीरला स्वमग्नता याविषयी सांगण्याचा प्रयत्न करते. कोवळ्या यशला समजून घेऊन पुढची पावले उचलायला हवीत असे सांगते; परंतु आपला मुलगा आपल्यासारखा हुशार नाही, त्याला ऑटिझम  झालाय म्हणजे आता सगळे संपले, असा ग्रह समीर करून घेतो. त्यामुळे वैदेही-समीर यांच्यात ताणतणाव निर्माण होतात. स्वत:त रमलेल्या यशला यातले काहीच कळत नाही. शाळेतूनही तो ‘स्पेशल चाइल्ड’ आहे असे सांगून काढून टाकतात. समीरला मुलापेक्षा करिअर महत्त्वाचे वाटते, तर वैदेहीला करिअरपेक्षा मुलाकडे लक्ष देणे महत्त्वाचे वाटते. या संघर्षांत ती करिअरला तिलांजली देऊन पूर्णवेळ यशकडे लक्ष देते आणि त्याला घडविते.
स्वमग्नता या विषयाकडे आणि त्यावरील उपाय यावर चित्रपटाचा भर असला तरी लेखक-दिग्दर्शकाने छायालेखकाच्या मदतीने अतिशय सरळ, थेट तरीही कथानकाची मांडणी परिणामकारक केली आहे. वैदेहीच्या भूमिकेतील सुखदा, मोठा झालेला यश साकारणारा विभव बोरकर, समीर देसाईच्या व्यक्तिरेखेतील लोकेश गुप्ते आणि यशच्या मार्गदर्शकाच्या अंशुमान कर्णिकच्या भूमिकेतील उमेश कामत यांच्या भूमिकेबरहुकूम केलेल्या अभिनयामुळेही चित्रपट लक्षणीय ठरतो. अथर्व बेडेकर या बालकलाकाराकडूनही दिग्दर्शकाने चांगले काम करवून घेतले आहे. मध्यंतरापर्यंत माहितीपटाच्या अंगाने जाणारा चित्रपट मध्यंतरानंतर प्रेक्षकाची पकड घेतो. स्वमग्नता हा आजार नाही हे सकारात्मकदृष्टय़ा पटवून देण्यात दिग्दर्शक यशस्वी ठरला आहे.

माय डियर यश
ऋतुराज एण्टरटेन्मेंट
निर्माता- जगदिशसिंग राव
दिग्दर्शक- शेखर सरतांडेल
पटकथा- सुनील सातवळेकर
कथा- शेखर सरतांडेल, रोहन सामंत
संवाद- शशांक कांदळगावकर
छायालेखन- राजदत्त रेवणकर
संगीत- रवींद्र शिंदे
गीते- मंदार चोळकर
संकलन- कुणाल देशपांडे
कलावंत – लोकेश गुप्ते, उमेश कामत, बालकलाकार अथर्व बेडेकर, विभव बोरकर, प्रदीप वेलणकर, चंदनगौरी नवलकर, विवेक लागू, ज्योती जोशी व अन्य.