माढा मतदारसंघातील माझ्या उमेदवारीचा वाढता प्रभाव लक्षात घेऊन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देवकी नंदन दूध संस्थेचा अध्यक्ष म्हणून मला अपहारप्रकरणात गुंतविण्याचे षड्यंत्र रचले आहे. या प्रकरणाची वस्तुस्थिती उघडकीस यावी यासाठी अजित पवार यांच्यासह माझीही नार्को टेस्ट करण्यात यावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी सोमवारी येथे पत्रकार परिषदेत केली. यावेळी स्वाभिमानीचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी सदाभाऊ खोत यांची बदनामी करण्याचा प्रयत्न राष्ट्रवादीकडून सुरू असला तरी पक्ष सदाभाऊ खोत यांच्या पाठीशी ठामपणे उभा असल्याचे स्पष्ट करून आगामी निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचा बिमोड करण्याचा इरादा व्यक्त केला.    
धुळे जिल्ह्यातील साक्री येथे देवकी नंदन दूध संस्थेच्या माध्यमातून अपहार केल्याचा ठपका ठेवून न्यायालयाने सदाभाऊ खोत यांना तीन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला होता. १५ हजार रुपयांच्या वैयक्तिक जामिनावर सुटका झाल्यानंतर सदाभाऊ खोत व राजू शेट्टी यांनी सोमवारी या प्रकरणाची पार्श्र्वभूमी विशद केले. शेट्टी म्हणाले, देवकी नंदन दूध संस्थेचे खोत हे अध्यक्ष होते. त्यांनी गाय खरेदी करणाऱ्या शेतक-यांच्या कर्जाची हमी घेतली होती. यामध्ये खोत यांनी कसलाही गैरव्यवहार केलेला नाही. राजकीय आकसापोटी राष्ट्रवादी काँग्रेसकडून खोत यांना या प्रकरणात गुंतविण्याचे प्रयत्न अजित पवार यांच्याकडून सुरू आहेत. तक्रार करणारा व त्याची वकिली घेणारे हे दोघेही राष्ट्रवादीशी संबंधित आहेत. विरोधकांनी सदाभाऊंना बदनाम करण्याचा कितीही प्रयत्न केला तरी त्यांचे प्रयत्न हाणून पाडून माढा मतदारसंघात स्वाभिमानी विजय मिळवून दाखवेल.
सदाभाऊ खोत म्हणाले, भारतीय स्टेट बँक, शेतकरी, व्यापारी यांच्यात गायी खरेदी-विक्रीचा व्यवहार घडलेला आहे. मी केवळ हमीदार आहे. त्यातील गैरव्यवहाराशी माझा काहीही संबंध नाही. मात्र माढा मतदारसंघातील वाढता पाठिंबा लक्षात घेऊन अजित पवार यांनी माझ्या बदनामीचे षड्यंत्र रचले आहे. मतदारसंघातील प्रतिमा खालावली जावी असा या मागील उद्देश आहे. या प्रकरणात मी निर्दोष आहे हे सिद्ध करण्यासाठी नार्को टेस्ट करण्याची आपली तयारी आहे. याचवेळी अजित पवार यांचीही नार्को टेस्ट व्हावी म्हणजे वस्तुस्थिती उघडकीस येईल.
 टोलचे जनक शरद पवार    
१९९५ मध्ये शरद पवार राज्याचे मुख्यमंत्री असताना त्यांनी सर्वप्रथम जयसिंगपूर येथे टोलची आकारणी सुरू केली होती. जनआंदोलन उभारून ही टोल आकारणी आपण हाणून पाडली आहे. कोल्हापुरातील टोल आकारणीही कायमची बंद केली जाईल. टोलची चर्चा सुरू असताना राज्यात युतीने टोल आणल्याची टीका पालकमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केली होती, पण टोलचे जनक शरद पवार हेच आहेत, असे खासदार राजू शेट्टी यांनी स्पष्ट केले.