कोपरगावसाठी ४० कोटी रुपये खर्चाच्या सुधारित पाणीपुरवठा योजनेचा सुरुवातीपासून मंजुरीपर्यंत आपणच पाठपुरावा केला, त्यामुळेच ही योजना मंजूर झाली असा दावा खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी केला. आपण कधीही खोटे बोलत नाही किंवा दुस-यांच्या कामाचे श्रेय लाटत नाही. बिपीन कोल्हे यांनी मात्र खोटेनाटे सांगून जनतेची दिशाभूल करू नये, असे आवाहन त्यांनी पत्रकारांशी बोलताना केले.  
या योजनेसाठी केलेल्या पाठपुराव्याची कागदपत्रेच वाकचौरे यांनी पत्रकारांसमोर सादर केली. ते म्हणाले, येसगाव साठवण तलावातील पाणी दूषित झाले होते, त्या वेळी आपण सदरची पाणीपुरवठा योजना केंद्र शासनाकडे प्रलंबित असल्याचे निर्दशनास आणून दिले होते. मात्र श्रेय लाटण्यासाठी ही योजना मंजूर असल्याचे बिपीन कोल्हे यांनी सांगून त्या वेळीही दिशाभूल केली होती. आपण जर खोटे बोलत असल्यास राजकारण सोडून देऊ. मुळात या योजनेची संकल्पनाच आमची आहे. त्यामुळे माझा व शिवसेना नगरसेवकांचा त्यास विरोध करण्याचे कारण नाही.
कोपरगाव शहरासाठी ही योजना आता मंजूर झाली आहे. त्याची तातडीने अंमलबजावणी करून शहरवासीयांना पिण्याचे शुद्ध पाणी पुरवावे अन्यथा शिवसेना आंदोलन करील असा इशारा वाकचौरे यांनी दिला. या योजनेचे श्रेय घेण्याचे राजकारण कोल्हेंनी करू नये असा सल्लाही त्यांनी दिला. आपण पाठपुरावा केलेल्या कामाची कोल्हे कुटुंबीय सवंग लोकप्रियतेसाठी अपप्रचार करीत आहेत असे गटनेते डॉ. अजेय गर्जे यांनीही या वेळी सांगितले. कोल्हे पिता-पुत्र वैफल्यग्रस्त झाले आहेत. पालिकेत त्यांचे नगरसेवक पैसे खाण्याव्यतिरिक्त कोणतीही कामे करीत नाहीत अशी टीका माजी नगराध्यक्ष राजेंद्र झावरे यांनी केली. कोपरगाव शहरासाठी मंजूर झालेल्या १२५ कोटी रुपयांच्या झोपडपट्टी विकास योजनेत कोल्हे पितापुत्रांनीच खोडा घातला असे माजी नगरसेवक रमेश गवळी यांनी सांगितले. नगरसेवक दिनार कुदळे, भरत मोरे, मेहमूद सय्यद, असलम शेख, जितेंद्र रणशूर, काका शेखो, रंजन जाधव यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी या वेळी उपस्थित होते.