कांदिवलीतील एका व्यावसायिकाच्या घरात एक विचित्र घटना घडली. घराच्या कपाटात ठेवलेल्या नोटांच्या बंडलातील सुमारे दोन लाख रुपयांच्या नोटा गायब झाल्या होत्या. घरात चोरी झालेली नव्हती. काही संशयास्पद घडलं नव्हतं. तरी या नोटा गायब कशा झाल्या याचे गूढ निर्माण झालं होतं. चारकोप पोलिसांनी जंग जंग पछाडलं. पण पोलिसांनी जुन्या नोकर-मोलकरणीबाबत चौकशी केली आणि सहज मारलेल्या या बाणाने चोरीच्या रहस्यावरचा पडदा उठला.

कांदिवलीच्या महावीरनगरमध्ये राहणारे अवधूत नार्वेकर (३७) हे खासगी क्लासेस चालवतात. त्यांनी घरातील कपाटाच्या लॉकरमध्ये १० लाख रुपये नोटांची बंडले बांधून ठेवली होती. २ नोव्हेंबरला त्यांनी हे पैसे एका व्यवहारानंतर एका व्यक्तीस दिले. ज्या व्यक्तीला १० लाख रुपये दिले, त्याने या नोटांच्या बंडलातून एक लाख ९० हजार रुपये कमी असल्याचे सांगितले. हे ऐकल्यानंतर नार्वेकर यांची झोप उडाली. कारण अनेक दिवासांपासून कपाटात हे पैसे होते. घरात चोरी झालेली नव्हती. मग पैसे कसे गायब झाले, हा प्रश्न त्यांना पडला. त्यांनी चारकोप पोलिसांमध्ये तक्रार दिली. पोलिसांनी घरातील सर्व नोकर, सुरक्षारक्षकापासून दूधवाला, केबलवाला आदी सर्वाची चौकशी केली. इमारतीत सीसीटीव्ही चित्रण नेमके कुठल्या दिवशी तपासायचे हे मोठे जिकिरीचे काम असते. घरात नार्वेकर, त्यांच्या पत्नी आणि वडील असे तिघे जण होते. त्यांच्या वडिलांवरही पोलिसांनी संशय घेऊन तपास केला, पण काहीच निष्पन्न झालं नाही. वरिष्ठ पोलीस निरीक्षक आनंद कोळी यांनी गुन्हे प्रकटीकरणाचे सहायक पोलीस निरीक्षक प्रदीप रावराणे यांना या चोरीचा तपास सोपविला. सहज त्यांनी जुन्या नोकरांची माहिती काढली. अर्चना कारंडे (२०) नावाची महिला त्यांच्याकडे काही महिन्यांपूर्वी काम करत होती. नार्वेकर कुटुंबीयांचे तिच्याबाबत चांगले मत होते. तिच्या पगारातील तीन हजार रुपये देणे बाकी होते. नार्वेकरांच्या पत्नी तिला पैसे घ्यायला बोलवत होत्या, पण तिला यायला जमत नव्हते. रावराणे यांनी अर्चनाचा मोबाइलचा सीडीआर (मोबाइलच्या लोकेशनची माहिती काढली) ज्या दिवशी चोरी झाली, त्या दिवशी तिचे लोकेशन नार्वेकरांच्या घराजवळ सापडले. पोलिसांनी सीसीटीव्ही तपासले. अर्चना इमारतीत जाताना दिसली. रहस्यमय चोराचा उलगडा झाला. नालासोपारा येथील अर्चना गर्भवती होती. त्या दिवशी उरलेला पगार घ्यायला आली होती. नवऱ्याला इमारतीजवळ थांबवून ती नार्वेकरांच्या घरी गेली, पण घर बंद होतं. काम करत असताना बनविलेल्या घराच्या बनावट चावीने अर्चनाने दार उघडलं आणि घरात गेली. सगळेच पैसे चोरले तर संशय येईल. म्हणून तिने प्रत्येक नोटांच्या बंडलातील काही पैसे काढले. त्यामुळे चोरी झाली तेव्हा कुणालाच समजलं नव्हतं. ती आठ महिन्यांची गर्भवती असल्याने पोलिसांनी तिला अटक न करता थेट दोषारोपपत्र (चार्जशिट) न्यायालयात सादर केली. घरकाम करणाऱ्या महिला बदलत असतात. त्यांच्याकडे घरांच्या चाव्या असतात. त्यामुळे त्या देणे टाळावे किंवा घराचे कुलूप बदलत राहावे, असे आवाहन वरिष्ठ पोलीस निरीक्षक आनंद कोळी यांनी केले आहे.