एन मार्ट मॉलची साखळी उभी करून ग्राहक सभासदांकडून प्रत्येकी साडेपाच हजार रुपये घेऊन कोटय़वधींचा गंडा घालणारा एन मार्टचा व्यवस्थापकीय संचालक गोपाळ शेखावत याला शनिवापर्यंत (दि. ७) पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी डी. बी. गवारे यांनी गुरुवारी दिले.
गेल्या २३ नोव्हेंबरला मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार औरंगाबादमध्ये शेखावतविरोधात गुन्हा दाखल झाला होता. अनिलकुमार सोनकांबळे, सुभाष पाटील यांनी तक्रार दिली होती. प्रत्येक सभासदाकडून साडेपाच हजार रुपये घेऊन सुमारे २५ हजार लोकांना ‘टोपी’ घातल्यानंतर एन मार्ट अचानक बंद करण्यात आले. औरंगाबादमध्येच नाही, तर मराठवाडय़ात अनेक ठिकाणी फसवणूक झाल्याचे उघडकीस आले. आंध्र प्रदेशात शेखावतविरोधात १० गुन्हे दाखल आहेत.
औरंगाबादला दिलेल्या तक्रारीनुसार एन मार्ट रिटेल डिव्हिजन, सुरत या कंपनीसह १३ जणांवर गुन्हे दाखल केले होते. या प्रकरणातील ९ आरोपी अजूनही फरारी आहेत. त्यांना अटक करण्यास शेखावतच्या पोलीस कोठडीची मागणी सरकारी वकील रुपाली येनकेवार यांनी केली. त्यानुसार शनिवापर्यंत कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले.
एन मार्टमधून खरेदी करण्यासाठी सभासद बनवताना साडेपाच हजार रुपये कंपनीत भरल्यास ज्या व्यक्तीने सभासद बनविले, त्याला प्रत्येकी ३०० रुपये व काही सामान देण्याचे आमिष दाखविले होते. पहिली काही वर्षे काहीजणांना रोख रक्कमही मिळत गेली आणि मॉलमधून बक्षीस स्वरूपात सामानही मिळाले. त्यामुळे लोकांचा विश्वास वाढला. सभासदांची संख्या वाढत गेली आणि एके दिवशी अचानक एन मार्ट बंद झाल्याचे लक्षात आले. तक्रार कोणाकडे करावी, हेही समजत नव्हते. काहींनी पोलीस ठाण्यात तक्रारी दिल्या. गुन्हा दाखल झाला. मात्र, शेखावत फरारी होता. आंध्रातल्या प्रकाशम जिल्ह्य़ात ओंगल येथे त्याला पोलिसांनी अटक केली. आंध्रातून त्याचे औरंगाबाद येथील गुन्ह्य़ात हस्तांतरण करण्यात आले. न्यायालयासमोर शेखावतला उभे केले असता त्याला कोठडी देण्यात आली.