शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रात योग्य तो समन्वय साधणे तसेच विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करण्याच्या दृष्टीने येथील डॉ. मुंजे इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंट अ‍ॅण्ड कॉम्प्युटर स्टडीजमध्ये एक ते तीन ऑगस्ट या कालावधीत ‘जैन नेक्स्ट आयटी अ‍ॅण्ड बिझिनेस इंटिलिजन्स’ या राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे.
चर्चासत्राच्या अध्यक्षपदी वसंत बेडेकर हे राहणार असून प्रमुख पाहुणे म्हणून आंतरराष्ट्रीय कीर्तीचे संगणकतज्ज्ञ व लेखक अच्युत गोडबोले यांचे बीजभाषण होईल. माहितीचे संकलन, त्याचा माहिती तंत्रज्ञानाच्या सहाय्याने योग्य तो वापर करणे हे कोणताही व्यवसाय अथवा संस्थेच्या हितावह असते. चर्चासत्रातंर्गत माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात अनेक वर्ष कार्यरत असणारे मुंबईचे निनाद देसाई, आनंद कौल, राहुल बनसोडे आदींचे विचार व अनुभव ऐकण्याची सुवर्णसंधी चर्चासत्राव्दारे उपलब्ध होणार असल्याची माहिती डॉ. मुंजे इन्स्टिटय़ूटचे अध्यक्ष सुधीर येवलेकर व संचालक डॉ. अशोक अग्रवाल यांनी दिली. शैक्षणिक, व्यावसायिक, माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या व्यक्तींना चर्चासत्रात संशोधनपर प्रबंध सादर करता येणार आहेत. तसेच देशभरातील माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्यांना सन्मानित करण्यात येणार आहे.
बेकायदेशीर शुल्क वसुलीची तक्रार
नाशिक जिल्ह्य़ातील विविध कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयांमध्ये बेकायदेशीररीत्या शुल्क वसूल केले जात आहे. त्याची चौकशी करून प्राचार्याविरुद्ध तसेच संस्था चालकांविरुद्ध गुन्हे दाखल करण्याची मागणी समाजकल्याण विभागाकडे करण्यात आली आहे.
जिल्ह्य़ातील सर्वच प्रसिद्ध महाविद्यालयांमध्ये शुल्क बेकायदेशीररीत्या घेतले जात आहे. भारत सरकार शिष्यवृत्ती योजनेंतर्गत मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून महाविद्यालयीन प्रवेशावेळी कोणत्याही स्वरुपाचे शुल्क वसूल करू नये, असा शासन नियम असताना तसेच सदर शुल्क घेणे हा दंडनीय गुन्हा आहे. अनुदानित, विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित शिक्षण संस्थांमध्ये इयत्ता १२ वीपर्यंत मुलींना मोफत शिक्षण देण्याची तरतूद असतानाही मुलींकडून मोठय़ा प्रमाणावर बेकायदेशीररीत्या शुल्क आकारले जात असल्याची तक्रार सुनील मोंढे, प्रबुद्ध खरे व आकाश बकुरे यांनी केली आहे.
‘नाशिप्रमं’तर्फे गुणगौरव सोहळा
नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने विद्यार्थी गुणगौरव सोहळा माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी नवनाथ औताडे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. यावेळी औताडे यांनी विद्यार्थ्यांना शिक्षणासह कला व क्रीडा क्षेत्रातही कौशल्य आत्मसात करण्याचा सल्ला दिला. शिक्षकांनीही गुणवंत विद्यार्थी घडविण्यापेक्षा विद्यार्थी हा माणूस म्हणून घडवावा. सध्या सुरू असलेल्या र्सवकष मूल्यमापन शिक्षण पद्धतीतून विद्यार्थ्यांना नापास करणे हा हेतू नसून विद्यार्थ्यांचा सर्वागीण विकास होणे हा शासनाचा मूळ हेतू आहे. परंतु मुले नापास करायची नाहीत हा चुकीचा संदेश समाजात पसरविला जात आहे. यासाठी शासनाने अंतर्गत मूल्यमापन योजना राबविली आहे, असे त्यांनी नमूद केले. नाशिकरोड येथील र. ज. चौहाण गर्ल्स हायस्कूलमध्ये आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे कार्यकारी मंडळ अध्यक्ष महेश दाबक होते. व्यासपीठावर खजिनदार मदन शिंदे व कार्यक्रम प्रमुख दिलीप वाणी उपस्थित होते.
प्रास्ताविकात संस्थेचे सचिव अरुण पैठणकर यांनी संस्थेच्या विविध शाळांमध्ये राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली. महेश दाबक यांनी संस्थेच्या वतीने शैक्षणिक विकासाबरोबर क्रीडा स्पर्धा व पुरोहित एकांकिका स्पर्धेच्या माध्यमातून कलाकार तयार झाल्याची माहिती दिली. पाहुण्यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थी निकिता पाटील, वसुधा महाजन, गौरव अहिरे, प्रज्ज्वल पडळकर, तेजराज भाबड यांच्यासह शिष्यवृत्ती व महाराष्ट्र प्रज्ञा शोध परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांना स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देवून गौरविण्यात आले. सूत्रसंचालन वृषाली भट व मेखला रास्वलकर यांनी केले. पाहुण्यांचा परिचय सहसचिव सुधीर फडके यांनी करून दिला. कार्यक्रम प्रमुख दिलीप वाणी यांनी आभार मानले.

उन्नती विद्यालयाचा वर्धापन दिन उत्साहात
तळेगाव येथील उन्नती माध्यमिक विद्यालयाचा वर्धापन दिन उत्साहात साजरा झाला. अध्यक्षस्थानी अण्णासाहेब तांबडे हे होते.
विद्यालयाच्या आवारात वृक्षारोपण करण्यात आले. नाशिक येथील आधार बहुउद्देशीय संस्थेव्दारे गरजू व होतकरू ५० विद्यार्थ्यांना वह्य़ा वाटप करण्यात आले. याप्रसंगी मुख्याध्यापक डी. डी. नेरकर यांनी संस्थेच्या विकासाबाबत माहिती दिली. शालेय समिती अध्यक्ष दिलीप पाटकर, सतीश सोनजे, चिंतामण उगले, निवृत्ती कथार, साहेबराव ढाकणे आदींनी आभार मानले.
फ्रावशी अकॅडमीत कार्यशाळा
आजच्या असुरक्षित जीवनात प्रत्येक गोष्टीचे ज्ञान आणि जागरूकता विद्यार्थ्यांना असणे ही गरज झाली असून याच उद्देशाने नाशिक येथील फ्रावशी अकॅडमीत बनावट नोटांविषयी कार्यशाळा घेण्यात आली. आयसीआयसीआय बँकेशी संलग्न असलेले तुषार महाजन यांनी बनावट नोटा कशा ओळखाव्यात याविषयी माहिती दिली. संस्थेचे अध्यक्ष रतन लथ, उपाध्यक्ष शर्वरी लथ, व्यवस्थापिका संचालिका रोझारिओ हेही उपस्थित होते.
एक्सपिडीशन २०१३
विद्यार्थ्यांमधील सृजनशीलता, शास्त्रीय दृष्टिकोन, वैज्ञानिक कल व संवाद कौशल्ये विकसित करण्याच्या हेतूने नाशिक येथे ‘एक्सपिडीशन २०१३’ हा कार्यक्रम झाला. आंतरशालेय वादविवाद, शोध पेपर प्रस्तुती तसेच शास्त्रीय प्रश्नमंजुषा स्पर्धाचे याअंतर्गत आयोजन करण्यात आले होते.
अशोक कटारिया यांचे यावेळी लेझीम व ताशाच्या गजरात स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाचे उद्घाटन पालक शिक्षक संघाच्या ज्योत्स्ना काकड यांच्या हस्ते करण्यात आले. ‘कार्बन इज वंडरफुल’ विषयावरील शोध निबंध प्रस्तुती स्पर्धेत आर्यमान भुसरेड्डीने (फ्रावशी) वरिष्ठ गटात तर, कनिष्ठ गटात धनिका जोशी (सॅक्रेड हार्ट) यांनी प्रथम क्रमांक मिळविला. वादविवाद स्पर्धेत वरिष्ठ गटात आर्शिया सिद्दिकी व शरॉन ट्रेसायलडो (सॅक्रेड हार्ट) तर, मंदार कोळांगे व अमनदिप सुलान (गुरूगोविंद सिंग) यांनी कनिष्ठ गटात प्रथम बक्षीस मिळविले. आर्शिया सिद्दिकी व अमनदिप सुलान हे सर्वोत्तम वक्ते ठरले.
प्रश्नमंच स्पर्धेत कनिष्ठ गटात पार्थ शिंपी व वरुणा चोप्रा (फ्रावशी) यांनी प्रथम क्रमांक मिळविला. वरिष्ठ गटात आर्यन सोहाने व सौरभ दत्ता (रॅहन) तसेच ध्रुवा चोप्रा व सुनील राठी (फ्रावशी) यांना प्रथम पारितोषिक विभागून देण्यात आले. डॉ. होमी भाभा राष्ट्रीय संस्थेचे प्रा. शरद काळे व यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे डॉ. जयदीप निकम, सम्राट समुहाचे अध्यक्ष सुजॉय गुप्ता पुरस्कार वितरणास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
वाणिज्यच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या जागा वाढविण्याची मागणी
वाणिज्य शाखेत पदव्युत्तर पदवीच्या जागा गुरुदक्षिणा म्हणून वाढवून देण्याची मागणी करीत युवा सेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी येथील एसएव्हीपीएस महाविद्यालयाचे प्राचार्य जी. डी. पाटील यांना घेराव घातला.
युवा सेनेचे प्रमुख पंकज गोरे यांनी यासंदर्भात माहिती दिली. शहरात वाणिज्य पदवीधरांची संख्या मोठी आहे. परंतु पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम असलेले दोनच महाविद्यालये आहेत. विद्यावर्धिनी महाविद्यालयात ६० तर एसएसव्हीपीएस महाविद्यालयात ८० जागा आहेत. एकूण १४० जागा उपलब्ध असल्याने विद्यार्थ्यांना नाइलाजाने गर्दी करावी लागते. ही परिस्थिती लक्षात घेऊन गुरुदक्षिणा म्हणून पदव्युत्तर पदवीच्या जागा वाढविण्यासाठी प्रयत्न करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. यावेळी पंकज गोरे यांच्यासह उप महानगरप्रमुख भय्या मराठे, सचिन जाधव, लक्ष्मीकांत बेडसे, कुणाल कानकाटे, नसिर शाह यांसह अन्य विद्यार्थी उपस्थित होते.