पावसाच्या भुरभुरीला नगरकर आता कंटाळले आहेत. खरिपाच्या पिकांनाही आता उघडिपीची नितांत गरज असून ढगाळ हवामान व ही संततधार न थांबल्यास आलेली पिके वाया जाण्याचीच भीती आता व्यक्त होऊ लागली आहे.
मागच्या पंधरा दिवसांपासून जिल्ह्य़ात अधूनमधून संततधार सुरू आहे. नगर शहरात हे प्रमाण अधिक असून या पंधरा दिवसांतच पाच ते सहा दिवस शहरात भुरभुर सुरू आहे. या पावसाचा शहरात आज सहावा किंवा सातवा दिवस आहे. सकाळपासूनच सुरू होणा-या पावसाने जनजीवन तर विस्कळीत झालेच, मात्र साथीच्या आजाराचेही प्रमाण आता चांगलेच वाढले आहे. सोमवारचा काही मिनिटांचा अपवाद वगळता गेल्या आठ-दहा दिवसांत शहरात सूर्यदर्शन झालेले नाही. त्यामुळेच साथीचे आजार व त्वचेचेही आजार डोके वर काढू लागले आहे. सततच्या कुंद वातावरणाला आता कुबट स्वरूप येऊ लागल्याने चिंता व्यक्त होते.
अनेक वर्षांनंतर नगरकरांनी एवढी प्रदीर्घ काळ संततधार अनुभवली. मोठय़ा पावसाची शहरात प्रतीक्षाच आहे. या पावसाने शहरातील रस्त्यांची दाणादाण उडाली असून सर्वच रस्त्यांवर खड्डय़ांचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. वाहनचालक दूर राहिले, यातून मार्ग काढणे पादचा-यांनाही कठीण झाले आहे. शिवाय सततच्या पावसाने घाणीचे साम्राज्य वाढले आहे. शहरातील अनेक गस्ते व गल्ली-बोळातही जागोजागी कुजलेला कचरा व त्याची दुर्गंधी पसरली आहे.
माणसांपेक्षा वेगळी स्थिती पिकांची नाही. किंबहुना खरिपाच्या पिकांची अवस्था आता अधिकच नाजूक झाली आहे. जिल्ह्य़ाच्या दक्षिण भागात ब-याच ठिकाणी मान्सूनपूर्व पाऊस चांगला झाला. त्यामुळेच खरिपाच्या पेरण्यांचे प्रमाण वाढले, मात्र नंतरचा बराच काळ पावसाने ताण दिला. आता सुरू झाला तर तो उघडण्याचे नाव घेईना, त्यामुळेच पिकांची स्थिती नाजूक बनली आहे. विशेषत: या भागात मुगाची चांगली पिके आली आहेत. दोन, तीन वर्षांनी हे पीक चांगले साधेल अशी स्थिती असतानाच गेल्या जवळपास दहा-बारा दिवसांपासून असलेले ढगाळ हवामान व संततधारेमुळे हे पीक आता साधेल की नाही, याचीच शंका व्यक्त होते. मागची दोन, तीन वर्षे पाऊसच झाला नाही, यंदा तो थांबेचना यामुळे पिकाची शाश्वती आता कमी होऊ लागली आहे.