एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या आवारात आज दुपारी लागलेल्या आगीत, विविध गुन्ह्य़ात जप्त केलेली अनेक वाहने जळून खाक झाली. प्राथमिक अंदाजानुसार सुमारे २४ लाख रुपयांचे नुकसान झाले. आग सुमारे अडीच तीन तासांच्या प्रयत्नानंतर आटोक्यात आली. सुदैवाने कोणी जखमी झाले नाही. या आगीने औद्योगिक क्षेत्रात अग्निशमनयंत्रणेची उणीव पुन्हा एकदा दाखवून दिली आहे.
पोलीस ठाणे औद्योगिक क्षेत्रात मनमाड रस्त्यालगत आहे. त्यामागेच औद्योगिक विकास महामंडळाचा पाणी पुरवठा विभाग आहे. दोन्हीचे आवार विस्तृत आहे, मध्ये भिंत आहे व आवारात बेसुमार गवत वाढलेले आहे. पोलीसांकडुन मिळालेल्या माहितीनुसार पाणी पुरवठा विभागाच्या आवारातील गवताने अचानकपणे पेट घेतला. याठिकाणी जमिनीखालून वीज तारा गेल्या आहेत, त्याच्या शॉर्ट सर्किटमुळे कदाचित आग लागली असावी, असा अंदाज सहायक पोलीस निरीक्षक चंद्रसेखर सावंत यांनी व्यक्त केला.
वाळलेल्या गवतामुळे ज्वाळा उसळल्या व ती लगेच परिसरात भडकली, त्यामुळे पोलीस ठाण्याच्या आवारातील गवतही पेटले, त्याच ठिकाणी पोलीसांनी विविध गुन्ह्य़ांचा मुद्देमाल म्हणुन जप्त केलली वाहने इतस्तत: पडलेली आहेत. सुमारे दिडशे ते दोनशे वाहने आहेत. या आगीच्या विळख्यात ही वाहने सापडली व जळून खाक झाली. पोलिसांच्या माहितीनुसार ३ रिक्षा, ३ मारुती कार, तीन व्हॅन, ४ इंडिका, १ स्कॉर्पिओ, ३ फियाट, १ टेंपो व १० ते १५ वाहने जळाली. सुमारे २४ लाख रुपये किंमतीची ही वाहने आहेत. यापेक्षा अधिक वाहने जळून अधिक नुकसान झाल्याचा अंदाज आहे.
दुपारी पावणे तीनच्या सुमारास लागलेली आग सायंकाळी साडेपाचच्या सुमारास आटोक्यात आली. महापालिकेच्या अग्नीशमन दलाचे तीन बंब व राहुरी पालिकेचा एक बंब आग विझवण्यासाठी आला. दलाचे जवान, पोलीस यांनी आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले. पाणी पुरवठा विभागाचा रखवालदार चांगदेव धनवटे यांनी दिलेल्या माहितीनुसार पोलीसांनी अकस्मित आगीची नोंद केली आहे.
औद्योगिक क्षेत्रात अग्नीशमन दलाची इमारत उभी आहे, वाहने व कर्मचारीही मंजुर झाले आहेत. मात्र कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणा अभावी यंत्रणा कार्यान्वित होणे खोळंबले आहे. त्यासाठी ऑक्टोबर उजाडावा लागणार आहे. त्यानंतर कर्मचाऱ्यांच्या नियुक्तया होणार आहेत.