लाकडाचे सरण रचून मानवी मृतदेहावर केलेल्या अंत्यसंस्कारानंतरच त्या मृत व्यक्तीच्या आत्म्याला शांती मिळते, हा गैरसमज पर्यावरणासाठी किती घातक आहे, हे कुणाच्याच लक्षात येत नाही. मात्र, ही सत्यता अलिकडच्या एक वर्षांत नागपूरकरांनी स्वीकारली आहे. एलपीजी विद्युत दाहिनीवर बोटावर मोजता येणारे अंत्यसंस्कार होत होते, पण २०१४ या वर्षांत तब्बल २०० अंत्यसंस्कार एलपीजी विद्युत दाहिनीत पार पडले. एवढेच नव्हे, तर गोवरीवरसुद्धा २३ अंत्यसंस्कार पार पडले.
नागपुरात दररोज ७० मानवी मृतदेहांवर अंत्यसंस्कार पार पडतात आणि प्रत्येक वेळी त्यासाठी १५ ते १८ वर्षांच्या दोन झाडांचा बळी दिला जातो. शहरात अंबाझरी आणि मोक्षधाम या दोनच स्मशानभूमीत एलपीजी विद्युत दाहिनी आहेत. त्यातही मोक्षधाममधील एलपीजी विद्युत दाहिनी मृतावस्थेत आहे. पर्यावरण रक्षणासाठी अग्रेसर असणाऱ्या विजय लिमये यांनी यासंदर्भात अनेकदा नगरपालिका प्रशासनाला जागे करण्याचा प्रयत्न केला. एवढेच नव्हे, तर घाटावर उपस्थित राहून त्यांना लाकडामुळे होणाऱ्या पर्यावरण प्रदूषणाविषयी नागरिकांना जागृत करण्याबरोबरच एलपीजी विद्युत दाहिनीत अंत्यसंस्कार करण्यासाठी मानसिकदृष्टय़ा तयार केले. त्याच वेळी गेल्या दोन वर्षांपासून त्यांनी गोवरीवरील अंत्यसंस्काराचे महत्त्व नागरिकांना पटवून देण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. त्यांच्या या प्रयत्नांना आता यश येऊ लागले आहे. २०१३ या वर्षांत एलपीजी विद्युत दाहिनीत केवळ ३४ अंत्यसंस्कार पार पडले. त्यात आता तब्बल १६६ अंत्यसंस्कारांची भर पडली आहे.
जनावरांना चारा मिळत नाही म्हणून किंवा गाईम्हशींनी दूध देणे बंद केल्यानंतर त्यांची रवानगी कत्तलखान्याकडे होत होती. त्याच गाईम्हशींच्या शेणापासून बनलेल्या गोवऱ्यांवर अंत्यसंस्कार पार पाडले जाऊ शकतात, याकडे कुणाचेच लक्ष नव्हते. मृत व्यक्तीला अग्नी देऊन पंचतत्त्वात विलीन करण्याची प्रथा असली तरीही त्यासाठी लाकूडच वापरले पाहिजे, याबद्दल कोणत्याही पौराणिक ग्रंथात उल्लेख नाही. गोवरीवरही अंत्यसंस्कार पार पाडले जाऊ शकतात आणि ते लाकडावरील अंत्यसंस्कारापेक्षा अधिक पवित्र आहे. कारण, हजारो वर्षांपूर्वी गोवऱ्यांवरच अंत्यसंस्कार केले जात होते, हे लिमये यांनी नागरिकांना पटवून दिले. ३० गाईम्हशींच्या शेणापासून तयार होणाऱ्या गोवऱ्यांवर एक अंत्यसंस्कार पार पडतो. त्यामुळे गाईम्हशींनी दूध देणे बंद केले असले तरीही त्यांच्या शेणापासून गोवऱ्या तयार केल्या जाऊ शकतात आणि गोवरीचा रोजगार उपलब्ध होऊन त्यांची कत्तलखान्याकडे होणारी रवानगी थांबवली जाऊ शकते.
महापालिकेच्या लक्षात त्यांनी ही बाब आणून दिल्यानंतर आता महापालिकेनेसुद्धा त्यादृष्टीने सकारात्मक पाऊल उचलण्यास सुरुवात केली आहे. गोवरीवरील अंत्यसंस्कारासाठी नागरिकांचे मिळणारे सहकार्य बघता २४ डिसेंबरला महापालिकेने स्वत:हून अंबाझरी घाटावर गोवरींचे दोन पिंजरे लावून दिले. ज्या नागपुरात गेल्या २५ वर्षांत तरी गोवरीवरील अंत्यसंस्काराची एकही घटना ऐकिवात नव्हती, त्या नागपुरात २०१४ मध्ये तब्बल २३ अंत्यसंस्कार गोवरीवर पार पडले. त्यामुळे अंबाझरी घाटावर फक्त एलपीजी विद्युत दाहिनी आणि लाकडावरच अंत्यसंस्कार व्हावेत. अंबाझरी घाट संपूर्णपणे लाकुडमुक्त करावा, असे पत्र लिमये यांनी महापौर आणि महापालिकेच्या सहाय्यक आयुक्तांना दिले आहे. या मागणीची गांभीर्याने दखल घेतल्यास विदर्भातील हा पहिला हिरवा घाट होईल, अशी भावना त्यांनी लोकसत्ताजवळ बोलताना व्यक्त केली.