नागपूरसह राज्यातील एकूण तीन मध्यवर्ती कारागृहांमध्ये राज्यातील आधीच्या आघाडी आणि आता युती सरकारने बॅगेज स्कॅनर लावण्यासाठी कोटय़वधी रुपयांची तरतूद करूनही प्रत्यक्षात ‘स्कॅनर’ आणि ‘जामर’चाही पत्ता नाही. गतिमानतेचा गवागवा करणाऱ्या दोन्ही शासनांची ही कासवगती पाहता ‘स्कॅनर’ व ‘जामर’ लागणार केव्हा, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
उपलब्ध माहितीनुसार, ‘स्कॅनर’ व ‘जामर’ची गरज लक्षात घेता २०१४-१५ या वित्तीय वर्षांत तळोजा, कोल्हापूर, नाशिक, औरंगाबाद, अमरावती व नागपूर या सहा मध्यवर्ती कारागृहांत ‘बॅगेज स्कॅनर’साठी १ कोटी ८१ लाख २० हजार रुपये व १ कोटी ८ लाख ७८ हजार रुपये इतका निधी वितरित करण्यात आला. सुरक्षा व्यवस्थांचे आधुनिकीकरण करण्यासाठी २७ लाख १९ हजार ५०० रुपये इतका निधी वितरित करण्यास मान्यता दर्शविण्यात आली. प्रत्यक्षात वितरित १ कोटी ३५ लाख ९७ हजार ५०० रुपये तरतुदींमधून २९ लाख ९९ हजार ६३० रुपये या प्रमाणे ८९ लाख ९८ हजार ८८९ रुपये रकमेचे तीन ‘बॅगेज स्कॅनर’ तळोजा, नाशिक व नागपूर कारागृहासाठी खरेदी करण्यात आले आहेत.
उर्वरित ४५ लाख ९८ हजार ६११ रुपयातून साठ ‘जामर’ खरेदी करण्यास प्रशासकीय मान्यता देण्याची विनंती कारागृहाच्या अतिरिक्त महासंचालकांनी १६ मार्चला शासनास केली होती. आता नव्याने तळोजा, नाशिक व नागपूर कारागृहासाठी ‘बॅगेज स्कॅनर’ खरेदीसाठी ८९ कोटी ९८ लाख ८८९ व ‘जामर’साठी ४५ लाख ८७ हजार १२०, असे एकूण १ कोटी ३५ लाख ८६ हजार ९ रुपये खर्चास ३१ मार्चला प्रशासकीय मान्यता दिली असल्याचे ३१ मार्चच्या शासन निर्णयात नमूद आहे. प्रत्यक्षात या कारागृहांमध्ये ‘स्कॅनर’ लागले आहे ना जामर. गतिमानतेचा गवगवा करणाऱ्या आघाडी व युती शासनाची गती कासवाचीच असल्याचे यावरून निदर्शनास येते.
राज्याच्या उपराजधानीतील आणि खुद्द मुख्यमंत्री व गृहमंत्र्यांच्या मतदारसंघातल्या मध्यवर्ती कारागृहातून ३१ मार्चला पाच कुख्यात न्यायाधीन कैदी पळून गेले. भरपूर रकमेच्या मोबदल्यात अंमली पदार्थ व वाट्टेल त्या सुखसोयी येथील कैद्यांना पुरविल्या जात असल्याचे उघड झाले. कैद्यांच्या पलायनानंतरच्या झाडाझडतीत कारागृहात सत्तर भ्रमणध्वनी, मेमरी कार्ड, सीम कार्ड, बॅटऱ्या चार्जर, पेन ड्राईव्ह सापडले. अधीक्षक व इतर असे एकूण दहा कर्मचारी निलंबित करण्यात आले. कारागृहात याआधीही अनेकदा भ्रमणध्वनी सापडले आहेत. तरीही कारागृह प्रशासनाने ‘जामर’ लावण्यास टाळाटाळ केली. शासन व कारागृह प्रशासन या दोघांच्याही उदासीनतेमुळे गैरप्रकार मात्र फोफावत असल्याचे कैदी पलायनाने दाखवून दिले आहे.