मध्य रेल्वेच्या नागपूर मंडळाला गेल्या १ एप्रिल ते ३१ मेदरम्यान ४७० कोटी ७३ लाख रुपये एकूण महसूल प्राप्त झाला असून तो गेल्यावर्षीच्या तुलनेत नऊ टक्के वाढला आहे.
गेल्यावर्षी ४३१ कोटी ७३ लाख रुपये महसूल मिळाला होता. यंदा तो ४७० कोटी ७३ लाख रुपये मिळाला. त्यापैकी केवळ मे महिन्यात  २३४ कोटी ३७ लाख रुपये उत्पन्न झाले, हे विशेष. गेल्यावर्षी केवळ मे महिन्यात २०८ कोटी ९ लाख रुपये उत्पन्न मिळाले होते. ते यंदा १२.६ टक्के वाढले. सिमेंट वाहतुकीतून यंदा २८ कोटी १३ लाख रुपये नागपूर मंडळास मिळाले. गेल्यावर्षी १९ कोटी १७ लाख रुपये मिळाले होते. त्यात ४६.१७ टक्के वाढ झाली. केवळ मे महिन्यात सिमेंट वाहतुकीतून १० कोटी ७१ लाख रुपये मिळाले. गेल्यावर्षी ८ कोटी ७९ लाख रुपये मिळाले होते. ते यंदा २१.९ टक्के वाढले.
एप्रिल-मे महिन्यात प्रवासी वाहतुकीतून ७३. ९० कोटी रुपये महसूल मध्य रेल्वेच्या नागपूर मंडळाला मिळाला. गेल्यावर्षी ६२ कोटी ५ लाख रुपये मिळाले होते. १९.१ टक्के उत्पन्न यंदा वाढले. केवळ मे महिन्यात ३६ कोटी ७६ लाख रुपये उत्पन्न मिळाले. गेल्यावर्षी ३१ कोटी ५७ लाख रुपये मिळाले होते. १६.४ टक्के ते यंदा वाढले. यावर्षी रेल्वेने उन्हाळ्याची सुटी व प्रवाशांची गर्दी लक्षात घेता विशेष गाडय़ांची संख्या वाढविली. शिवाय या गाडय़ा लांब पल्ल्याच्या होत्या. इतर वाहनांच्या भाडय़ात मोठय़ा प्रमाणात भाडेवाढ झाली असून तसेच प्रवासादरम्यानची सुरक्षितता लक्षात घेता प्रवाशांनी प्रवासासाठी रेल्वेला पसंती दिल्याचे यावरून निदर्शनास येते. असे असले तरी अनेक रेल्वे गाडय़ांमधून विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या कमी नाही. त्यावर आळा घालायलाच हवा. रेल्वे गाडय़ांची तसेच डब्यांची संख्या वाढविण्याची गरज आहे, असे झाल्यास रेल्वेच्या उत्पन्नात बऱ्यापैकी वाढ होऊ शकते, असे नागरिकांना वाटते.