शहरातील विविध भागातील रस्त्यांवर प्रत्यक्षात खड्डय़ाचे साम्राज्य असताना महापालिका प्रशासनाने मात्र १४९५८ चौ.मी. क्षेत्रफळाच्या रस्त्यांवरील ७१४ खड्डे बुजविल्याचा दावा केला आहे. शहरात अजून म्हणावा तसा दमदार पाऊस झालेला नसला तरी शहरातील राष्ट्रीय महामार्ग, राज्य महामार्ग, रिंग रोड, महापालिका आणि नागपूर सुधार प्रन्यासच्या रस्त्यांवर खड्डय़ांचे प्रमाण जास्त आहे.
महापालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष बाल्या बोरकर आणि आयुक्त श्याम वर्धने यांनी सात दिवस शहरातील विविध भागात जाऊन महापालिकेच्या रस्त्यांची पाहणी केली असून ज्या ठिकाणी खड्डे आहेत, ते बुजविण्याचे आदेश दिले. महापालिका प्रशासनाने शहरातील सर्व रस्त्यांवरील खड्डे बुजविले असल्याचा दावा केला. सतरंजीपुरा झोनमधील रस्त्यावर एकही खड्डा नसल्याचे महापालिका प्रशासनाने म्हटले आहे. मात्र, सर्वात जास्त खड्डे नेहरुनगर झोनमध्ये असल्याची माहिती मिळाली. लक्ष्मीनगर झोनमध्ये १०८, धरमपेठ ८३, हनुमाननगर १४, धंतोली ७१, नेहरूनगर २४३, गांधीबाग २८, लकडगंज ४, आशीनगर ७९ आणि मंगळवारी झोनमध्ये ४९ असे एकूण ६६५ खड्डे आहेत. सदर पोलीस ठाणे ते उच्च न्यायालय रस्त्यावर ७, राजीव नगर ते वर्धा रोड मार्गावर १९ आणि सुभाष नगर ते माटे चौक व हिलटॉप मार्गावर २३ खड्डे बुजविण्यात आल्याचा दावा महापालिका प्रशासनाने केला आहे. शहरातील जनतेच्या हिताचा विचार करता महापालिकेच्या हॉटनिक्स प्लॅटद्वारे सर्व रस्त्यांची दुरस्ती करण्यात आली.