* मोर्चा, निदर्शनांनी दिवस गाजला  
* सर्वसामान्य नागरिकांना फटका
जकात कराला पर्याय म्हणून शासनाने सुरू केलेल्या स्थानिक स्वराज्य कराला (एलबीटी) विरोध करण्यासाठी आज शहरातील विविध व्यापारी संघटनांनी पुकारलेल्या व्यापार बंदला शंभर टक्के प्रतिसाद मिळाला. नाग विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्ससह शहरातील विविध व्यापारी संघटनानी केलेल्या आव्हानाला प्रतिसाद देत सकाळपासून शहरातील व्यापारांनी मोर्चे आणि निदर्शने करीत सरकारच्या धोरणाचा विरोध केला. या बंदचा सामान्य नागरिकांना फटका बसला. आजच्या बंदमुळे ५०० कोटी रुपयाचे व्यवहार ठप्प झाल्याचा दावा नाग विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्सने केला आहे.
राज्य सरकारने मुंबई वगळता राज्यातील सहा महापालिकांमध्ये आजपासून स्थानिक स्वराज्य संस्था कर लागू केल्याने त्याचा विरोध करण्यासाठी उपराजधानीत व्यापारांनी सकाळपापासून प्रतिष्ठाने बंद ठेवली  होती. इतवारी, गांधीबाग, कपडा मार्केट, सराफा ओळ, महाल, केळीबाग, गोकुळेपेठ, सीताबर्डी, मस्कासाथ,लकडगंज, वर्धमाननगर, सदर, बैरामजी टाऊन, प्रतापनगर, कॉटेनमार्केट, पाचपावली, इंदोरा, सक्करदरा, नंदनवन, मानेवाडा आदी शहरातील विविध भागातील व्यापारी शहीद चौकात संघटीत झाल्यावर सकाळी १० वाजता स्कूटर रॅली काढण्यात आली. शहरातील विविध भागात रॅली फिरत असताना अत्यावश्यक सेवा सोडून जी काही प्रतिष्ठाने सुरू होती ती बंद करण्याचे आवाहन केले जात होते.
सरकारच्या धोरणाचा निषेध करीत मिरवणूक शहरातील विविध भागात फिरल्यावर मिरवणूक सिव्हीललाईन मधील नाग विदर्भ चेंबर ऑप कॉमर्सच्या कार्यालय पोहचली. त्या ठिकाणी सभेचे आयोजन करण्यात आले होते. चेंबरच्या पदाधिकाऱ्यांची यावेळी भाषणे झाली. शहराच्या बाहेरून येणारी आयात बंद करून त्यांचा माल खरेदी करण्यात येणार नसल्याचा इशारा व्यापारांनी दिला.  
 शहरातील मुख्य बाजारपेठ असलेली इतवारी किराणा ओळ, सराफा बाजार, सीताबर्डी, गांधीबाग मार्केट कडकडीत बंद होते. या भागातील चहाच्या टपऱ्या आणि पानठेले सुद्धा आज बंद होते. शहीद चौकात काही व्यापारांनी सरकारचा पुतळा तयार करून तो जाळण्यात आला. कळमना बाजारही काही काळ बंद करण्यात आला होता. व्यापारांच्या बंदला भारतीय जनता पक्ष- शिवसेनेने पाठिंबा दिल्यामुळे पक्षाचे व्यापारी संघटनांचे अनेक पदाधिकारी मिरवणुकीमध्ये सहभागी झाले होते. गजबजलेला व्हेरायटी चौक, गोकुळपेठ मार्केट, धरमपेठ, वेस्ट हायकोर्ट परिसर आज शांत होता. आजच्या बंदमुळे व्यापारांच्या एकजुटीचे प्रदर्शन शहरात दिसून आले. इंडियन मेडिकल असोसिएशने या बंद समर्थन दिले असून शहरातील डॉक्टर आंदोलनात सहभागी झाले होते. स्थानिक स्वराज्य करातंर्गत शहरातील एकही डॉक्टर नोंदणी करणार नसल्याचे असोसिएशचे अध्यक्ष डॉ. हरीश चांडक यांनी सांगितले. नागपूर केमिस्ट अ‍ॅन्ड ड्रग असोसिएशन आणि स्टोन मर्चट असोसिएशनने बंद समर्थन दिले होते.
अवघी १२० व्यापाऱ्यांची नोंदणी
शहरात जवळपास १.२५ लाख व्यापारी असताना महापालिकेत केवळ १२० व्यापारांनी आतापर्यंत एलबीटीसाठी नोंदणी केल्याची धक्कादायक माहिती जकात विभागाचे अधीक्षक महेश धामेचा यांनी दिली. स्थामिक स्वराज्य कर १ एप्रिलपासून लागू होणार असल्याचे राज्य सरकारने सरकारने जाहीर केले होते त्याप्रमाणे महापालिका प्रशासनाने वीस दिवस आधी व्यापारांना नोंदणीसाठी आवाहन केले होते. त्यानुसार सर्व व्यापाऱ्यांपर्यंत महापालिका प्रशासनाने अर्ज पोहचविले मात्र गेल्या वीस दिवसात अवघे १२० अर्ज पोहोचले आहेत. २८ हजार व्यापारांनी व्ॉटमध्ये नोंदणी केली असल्यामुळे त्यांना नोंदणी करण्याची गरज नसली तरी त्यांना अर्ज भरणे आवश्यक आहे मात्र त्यातील अनेक व्यापांरांनी अर्ज भरले नाही. शहरातील ५० हजारच्या जवळपास व्यापारांची नोदणी झालेली नसल्याचे धामेचा यांनी सांगितले. दरम्यान राज्य सरकारने लागू केलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था कराला विरोध करून एकही व्यापारी नोंदणी करणार नाही असा इशारा नाग विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्ससह विविध व्यापारी संघटनांनी दिला.
नाके ओस
जकात कर बंद करून एलबीटी कर लागू करण्यात आल्यामुळे शहरातील विविध भागात असलेले ३९ नाके आज ओस पडले होते. दररोज या नाक्यांवर जकात भरणारे वाहनचालक, ट्रक, आदींमुळे वर्दळ दिसून येत होती मात्र, आज ही वर्दळ कमी झाली होती. व्यापारांना आता बँकेत हा कर भरावयाचा असल्याने शहरातील जकात नाक्याचा यापुढे रहदारी पाससाठी उपयोग होणार आहे. जकात विभागात ३६० कर्मचारी असून यातील सर्व कर्मचाऱ्यांना एलबीटी विभागात विभागात सामावून घेण्यात येणार असल्याचे अधीक्षक महेश धामेचा यांनी स्पष्ट केले.