‘हिरवे नागपूर’ उपक्रमांतर्गत गेल्यावर्षी महापालिकेने शहरभर १ लाख २७ हजार रोपांची लागवड केली. परंतु, त्यापैकी फक्त ४८ हजार रोपे जगविण्यात यश आले असून महापालिकेच्या वृक्षारोपण अभियानाचा फज्जा उडाला आहे.
या अपयशाचे खापर महापौर अनिल सोले यांनी झोन अधिकाऱ्यांच्या बेफिकीर वृत्तीवर फोडले आहे. शहराचे प्रत्येक नागरिकामागे एक झाड असे स्वप्न आहे. नागपूर शहराची लोकसंख्या २५ लाख ५ हजार ४२१ असून वृक्षांची संख्या २१ लाख ४३ हजार ८३८ आहे. सरासरी प्रत्येकी १० व्यक्तीमागे ९ वृक्ष असे हे प्रमाण आहे. ग्रीन सिटी म्हणून शहराची ओळख असली तरी नेमकी कोणत्या वृक्षांची लागवड करावी याबाबतही महापालिकेच्या उद्यान विभागाला फारशी माहिती नाही, असेही चित्र यानिमित्ताने समोर आले आहे. महापालिया आयुक्त श्याम वर्धने यांनी वृक्षारोपण अभियानाला जनतेने दिलेल्या पाठिंब्याबद्दल समाधान व्यक्त केले तर अवघी ३७ टक्के रोपे जगल्याने महापौर मात्र निराश झाले आहेत.
महापालिकेने वृक्ष लागवड करण्यापूर्वी तज्ज्ञांशी कोणताही विचारविमर्श केला नसल्याने शहराच्या गरजेच्या दृष्टीने कोणती रोपे लावावी याचचे नियोजन महापालिकेजवळ नाही. नागपूर शहरातील पूर्व आणि उत्तर नागपूरच्या पट्टय़ातही वृक्षारोपणाची गरज आहे. त्याकडे आतापर्यंत लक्ष पुरविण्यात आलेले नाही. त्याची झळ नागरिकांना बसत आहे. नागपूर शहरात दुचाकींची संख्या प्रमाणाबाहेर गेली असून अन्य चारचाकी आणि तीन चाकी वाहनेही प्रचंड प्रमाणात वाढल्याने प्रदूषणाचा स्तर वाढत चालला आहे. नुसते हिरवे शहर म्हणून शहराची ओळख कायम ठेवण्यासाठी शोभिवंत झाडांची लागवड उपयुक्त ठरणारी नाही. तरीही रस्त्याच्या मधोमध अशी झाडे लावून ठेवण्यात आली आहे. इस्रालय सरकारने त्यांच्या देशात शोभिवंत झाडांपेक्षा भरपूर ऑक्सिजन देणाऱ्या आणि पक्ष्यांचे जीवन तोलून धरणाऱ्या वृक्षांची लागवड करून जगात नवा आदर्श निर्माण केला असताना भारतातील शहरांमध्ये त्याचा फारसा विचार केला जात नाही, अशी खंत ज्येष्ठ पक्षीतज्ज्ञ मारुती चितमपल्ली यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना व्यक्त केली.
प्रदूषण रोखण्याच्या दृष्टीने आणि पक्ष्यांसाठीही काही झाडांची लागवड अनिवार्य झाली आहे. शहरात धूळीचे प्रमाण वाढले असले तरी धूळ शोषून घेणाऱ्या वृक्षांची संख्या त्या तुलनेत अत्यंत नगण्य आहे. भरपूर ऑक्सिजन देणाऱ्या वृक्षांमध्ये जीवनदायी वड, उंबर, पिंपळ, नांद्रुक आणि पाखर यांची लागवड महत्त्वाची आहे. देवालये किंवा मंदिराभोवताल वड, उंबर, पाखर, पिंपळ, बेल, कदंब, शमी, आपटा, चिंच, चाफा, कडूनिंब, कांचन या झाडांची लागवड योग्य ठरू शकते, असेही चितमपल्ली यांनी सांगितले. पूर्वीच्या काळी अशा वृक्षांची संख्या शहरात मोठय़ा प्रमाणात होती. त्यामुळे प्रदूषणाचे प्रश्न एवढे भेडसावत नव्हते. परंतु, अलीकडच्या काही वर्षांपासून वातावरण दूषित झाले असून धूळदेखील मोठय़ा प्रमाणात रस्त्यांवर साचत आहे, याकडे चितमपल्ली यांनी लक्ष वेधले. वातावरणातील प्रदूषणाचा स्तर कमी करण्यासाठी कडूनिंब, सप्तपर्णी, करंज, वरवंटा (सॉसेज ट्री), जारुळ, वड, शिरीष अमलतास, उंबर, पाखर, नांद्रुक, पिंपळ, चिंच किंवा शिसव या वृक्षांची लागवड योग्य आहे. परंतु, त्याकडे फारसे गांभीर्याने पाहिले जात नाही. केवळ शोभेच्या झाडांची लागवड करण्यावर भर दिला जातो. उद्यानातही पारिजातक, बकुळ, आवळा, उंबर, अमलतास, बांबू (पिवळा), जारुळ, चाफा, रक्तचंदन, सिल्वर ओक, आंबा, कुसुंब, सप्तपर्णी, बदाम, सीता, अशोक, कदंब यांची लागवड महत्त्वाची आहे. मात्र, उद्याने नावालाच राहिली आहेत. वृक्षांची लागवड करण्याकडे प्रशासनाला वेळ नाही. महापालिकेच्या वृक्ष लागवड अभियानाचे स्वागत आहे. परंतु, त्यांनी कोणत्या झाडांची रोपे निवडली आणि त्यांची निगा राखण्यासाठी कोणत्या सूचना देण्यात आल्या आणि रोपे मेली याची जबाबदारी कोण घेणार, असा सवाल चितमपल्ली यांनी केला.
महापालिकेने गेल्यावर्षी पश्चिम नागपूर, विमानतळ मार्ग या वृक्षांची संख्या मोठय़ा प्रमाणात असलेल्या भागात वृक्षारोपण मोहीम राबविली. शहरातील मनीष नगर, मानेवाडा रोड, हुडकेश्वर रोड या भागात झाडेच नाहीत. हा विरोधाभास आहे. लागवड केलेल्या रोपांची काळजी घेतली असती तर किमान ५० टक्के रोपे जगली असती, असे पर्यावरण कार्यकर्ते श्रीकांत देशपांडे यांनी म्हटले आहे. महापालिकेच्या उद्यान विभागाजवळ पुरेसा स्टाफ नाही, हे प्रमुख कारण यामागे आहे. परंतु, नुसता महापालिकेला दोष देण्यापेक्षा आपण लावलेल्या वृक्षांचे जोपासना करण्याचे काम आपण कितपत गांभीर्याने घेतले हा भागदेखील महत्त्वाचा असल्याचे देशपांडे यांनी सांगितले.