नागपूरला २०२०मध्ये जागतिक शहर बनवण्याच्या दृष्टीने ‘नागपूर फर्स्ट’ या धर्मदाय संस्थेच्यावतीने प्रयत्न करण्यात येणार असून त्यासाठी दोन दिवसांची शिखर परिषद आयोजित करण्याचा मानस संस्थेच्यावतीने पत्रकार परिषदेत व्यक्त करण्यात आला. त्यासाठी शिक्षण, व्यवसाय, क्रीडा, विधि आणि चित्रपट इत्यादी क्षेत्रातील जागतिक स्तरावरील मान्यवरांची व्याख्यान मालिका आयोजित करण्यात येणार आहे.
 गट चर्चाचा अवलंब या शिखर परिषदेत करण्यात येणार असून नागपुरातील संघटनांना जागतिक गुंतवणुकीची संधीदेखील उपलब्ध करून देण्याचे बहुआयामी धोरण नागपूर फर्स्टने आखले आहे. शिखर परिषदेच्या दुसऱ्या दिवशी गुंतवणूकदारांशी गुंतवणूक, निधीची मागणी, इक्विटी गुंतवणूक विषयी हितगूज होणार आहे.
या जागतिक शिखर परिषदेला महापौर अनिल सोले, महापालिका आयुक्त डॉ. श्याम वर्धने सल्लागार म्हणून लाभले आहेत. टाटा स्टिलचे माजी व्यवस्थापकीय संचालक डॉ. जे.जे. इराणी, फ्युचरिक सिटीच्या अध्यक्ष करुणा गोपाल, बोईंग इंटरनॅशनलचे अध्यक्ष डॉ. दिनेश केसकर, माजी विधानमंडळ सदस्य स्वाती दांडेकर आणि कुमार बर्वे यांना ही कल्पना
विशेष रुचल्याचे अध्यक्ष दिनेश जैन, कार्यकारी सदस्य शशांक राव यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.