दिवाळीच्या मंगलमय वातावरणात पूजेसाठी व सजावटीसाठी ग्राहकांकडून फुलांची खरेदी सुरू आहे. शहराच्या बाजारपेठेत फुलांची मागणी वाढली असून आवश्यक ती आवक होत असल्याने फुलांचे भाव सामान्यांच्या आवाक्यात आहेत. मध्यप्रदेश आणि अहमदनगर यंदा उपराजधानीची फुलांची गरज भागवत आहे.
सण आणि उत्सवांचा हंगाम सुरू असल्याने फुलांचे रंग बहरात आले आहेत. सर्वत्र फुलांचा सुगंध दरवळू लागला आहे. दीपोत्सवात झेंडू, शेवंती, नवरंग व कमळ या फुलांना मोठय़ा प्रमाणात मागणी आहे. उपराजधानीतील फुलांच्या नेताजी मार्केटमध्ये अहमदनगर, रामटेक, बैतूल व मध्य प्रदेशातून फुलांची आवक होत आहे. बाजारपेठेत दररोज ६० ते ७० मोठय़ा गाडय़ा आणि ४०० ते ५०० छोटय़ा गाडय़ा माल येत आहे. शेवंतीचा भाव १०० रुपये किलो, झेंडू ४० ते ५० रुपये किलो, कृष्ण कमळ  १५ रुपयाला एकनग आणि  साधे कमळ १०० नगाचा भाव ५०० रुपये, जरबेरा ३० ते ४० रुपये १० नगासाठी, नवरंग ८० रुपये, डच २० नगाचा भाव १२० रुपये आहे. उपराजधानीत कमळ रामटेक व मध्यप्रदेशातून येत आहे.
 यंदा पाऊस कमी असल्याने स्थानिक पातळीवर फुलांची आवकही कमी आहे. उत्सवाच्या निमित्ताने मागणी मात्र जास्त आहे. रजनीगंधाच्या एका बंडलाचा भाव २०० रुपये आहे. विदर्भात पारंपरिक पद्धतीने फूलशेती केली जात असून झेंडू, गुलाब, निशीगंध, मोगरा, शेवंती, जरबेरा या फुलांचे उत्पादन घेतले आहे. हवामान, पाण्याची उपलब्धता व लागवडीस उपयुक्त असलेली उपलब्ध जमीन यावर या शेतीचे उत्पादन अवलंबून आहे. राज्यात आतापर्यंत काही निवडक जिल्ह्य़ांमधील शेतकरीच फूलशेती करीत होते. विदर्भात नागपूर व अकोला जिल्ह्य़ांतील शेतकरी फूलशेतीतून उत्पादन घेत आहेत. हरितगृहांमुळे आता इतर जिल्ह्य़ांतील शेतकऱ्यांनाही हा पर्याय खुला झाला आहे. नागपूर जिल्ह्य़ात जवळपास अडीचशे हेक्टर क्षेत्रात फूलशेती केली जात आहे. यात नागपूर, कामठी, हिंगणा, भिवापूर, काटोल व कुही या सहा तालुक्यांचा प्रामुख्याने समावेश आहे. मोठय़ा शहराला लागून असलेल्या क्षेत्रांमध्ये फूलशेती करणे शेतक ऱ्यांना फायदेशीर ठरत आहे. पावसाअभावी विदर्भात फुलांची लागवड उशिरा झाली. त्यामुळे स्थानिक मालाची आवक कमी आहे. जिल्ह्य़ाबाहेरून आलेल्या मालाचा पुरवठा ग्राहकांना केला जात आहे. दोन ते तीन कोटींची उलाढाल उपराजधानीची फुलांची गरज  मध्यप्रदेश, अहमदनगर भागवित आहे. दिवाळीच्या निमित्ताने प्रामुख्याने शेवंती, झेंडू, नवरंग व कमळ या फुलांची मागणी वाढली आहे. नेताजी फूल मार्केटमध्ये स्थानिक तसेच बाहेरून फुलांची आवक होत आहे. शहराच्या बाजारपेठेत दररोज दोन ते तीन कोटी रुपयांची उलाढाल होत असल्याचे नेताजी फूल मार्केटमधील ठोक व किरकोळ फूल विक्रेता संघाचे अध्यक्ष विजय वंजारी यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले.