29 September 2020

News Flash

सहा जिल्ह्य़ात ३१७ मतदान केंद्रे

विधान परिषदेवर नागपूर पदवीधर मतदारसंघातून प्रतिनिधी पाठविण्यासाठी शुक्रवार, २० जूनला नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर व वर्धा या सहाही जिल्ह्य़ांमध्ये मतदान होणार असून प्रशासनाने त्यासाठी

| June 19, 2014 08:58 am

१ हजार ४०८ कर्मचाऱ्यांचा सहभाग
विधान परिषदेवर नागपूर पदवीधर मतदारसंघातून प्रतिनिधी पाठविण्यासाठी शुक्रवार, २० जूनला नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर व वर्धा या सहाही जिल्ह्य़ांमध्ये मतदान होणार असून प्रशासनाने त्यासाठी जय्यत तयारी केली आहे.
राज्याचे मत्स्य व्यवसाय आयुक्त श्यामसुंदर शिंदे हे निवडणूक निरीक्षक तर विभागीय आयुक्त अनुपकुमार हे निवडणूक निर्णय अधिकारी आहेत. यंदा निवडणूक रिंगणात चौदा उमेदवार आहेत. गेल्या निवडणुकीत १ लाख ७ हजार मतदार होते आणि ५६ टक्के मतदान झाले होते. गेल्या महिनाभरात १० हजार ४७ नावे नव्याने समाविष्ट करण्यात आली. यंदा २ लाख ८७ हजार ११८ मतदार आहेत. नागपूर जिल्ह्य़ात १७८, वर्धा जिल्ह्य़ात ३२, भंडारा जिल्ह्य़ात २३, गोंदिया जिल्ह्य़ात २२, चंद्रपूर जिल्ह्य़ात ४४ व गडचिरोली जिल्ह्य़ात १८, असे एकूण ३१७ मतदान केंद्रे नागपूर पदवीधर मतदारसंघात आहेत. विभागीय आयुक्तांच्या तसेच प्रत्येक जिल्हा प्रशासनाच्या संकेतस्थळांवर केंद्रांची यादी उपलब्ध आहे. एका मतदान केंद्रावर ४०० ते ८०० मतदार आहेत. एकूण १ हजार ४०८ कर्मचाऱ्यांच्या नेमणुका करण्यात आल्या आहेत. सहाही जिल्ह्य़ांमध्ये गुरुवारी १९ जूनला अंतिम प्रशिक्षण दिले जाणार आहे.
शुक्रवारी, २० जूनला सकाळी ८ ते ४ या वेळेत मतदान होईल. या दिवशी साप्ताहिक सुटी नसलेल्या मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी त्यांच्या प्रशासनिक प्रमुखांनी अशा मतदारांना मतदान करण्यासाठी सकाळी चार तास कामावर उशिरा येण्याची किंवा सायंकाळी कामावरून चार तास लवकर जाण्याची अथवा मधल्या सोईच्या वेळेमध्ये चार तास अनुपस्थित राहण्याची सवलत द्यावी, असे आवाहन विभागीय आयुक्तांनी केले आहे. मतदाराला ओळखीचा पुरावा म्हणून निवडणूक आयोगाने ठरवून दिलेल्या निकषानुसार एखादा पुरावा सादर करावा लागणार आहे. छायाचित्र असलेले निवडणूक आयोगाचे ओळखपत्र, पासपोर्ट, वाहन परवाना, कार्यालयाने दिलेले ओळखपत्र, बँक अथवा पोष्टाचे पासबुक, पॅन कार्ड, आधार कार्ड, मनरेगा अथवा इतर कुठल्याही शासकीय योजना लाभार्थी असलेले कार्ड यापैकी कुठलाही एखादा पुरावा असल्यासच मतदान करता येणार आहे.   
एका मतदान केंद्रावर उमेदवारांचा एक प्रतिनिधी राहील व त्यांना सकाळी साडेसात वाजताच केंद्रावर हजर राहावे लागणार आहे. प्रतिनिधी नियुक्तीवेळेस सादर अर्जावरील स्वाक्षरी पडताळणी करूनच त्याला केंद्रावर प्रवेश दिला जाईल. मतदान केंद्रापासून १०० मीटर परिघात प्रचार करता येणार नाही. दोनशे मीटर परिघात मतदारांना माहिती देण्यासाठी बूथ ठेवता येतील. निवडणुकीसाठी तैनात अधिकारी व कर्मचारी मतदानापासून वंचित राहणार नाहीत. प्रशिक्षणाच्यावेळी कर्मचाऱ्यांकडून बारा क्रमांकाचा अर्ज भरून घेतला जाणार असून त्यानंतर त्यांना टपाली मतपत्रिका पुरविली जाईल. टपाली मतपत्रिकेसाठी जिल्ह्य़ाच्या ठिकाणी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयामध्ये तसेच सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी (सामान्य प्रशासन उपायुक्त) यांच्या समक्ष मतपेटी ठेवली जाईल. त्यात या टपाली मतपत्रिका टाकल्या जातील. मतमोजणी केंद्रावर या मतपेटय़ा नेल्या जातील.

मतपत्रिका यंदा गुलाबी
मतपत्रिका यंदा गुलाबी रंगाची राहणार आहे. मतदाराला मतपत्रिकेत उमेदवाराच्या नावासमोरील रकान्यात मराठी, हिंदी व रोमन यापैकी कुठल्याही एका लिपीत फक्त आकडय़ात पसंतीक्रम लिहावा लागेल. तो तसा नसेल अथवा दिलाच नसेल तर ते मत अवैध ठरेल. कुठल्याही एकाच लिपीत आकडा लिहावा लागेल. एक हा पसंतीक्रम लिहावाच लागणार आहे. एकदम २ किंवा ३ आकडा दिल्यास ते मत बाद ठरेल. नकाराधिकारासाठी पंधराव्या क्रमांकावरील रकान्यात चूक अथवा बरोबरची खुण करावी लागेल. नकाराधिकाराबरोबरच पसंतीक्रमही दिले असतील तर ते मत बाद ठरविले जाईल. मतदानासाठी केंद्रावर उपलब्ध पेनच वापरता येईल. प्रत्येक खोलीत एक याप्रमाणे मतदान केंद्रांवर व परिसरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. प्रत्येक ठिकाणी सीसी टीव्ही कॅमेऱ्याची नजर राहील.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 19, 2014 8:58 am

Web Title: nagpur graduate constituency
टॅग Nagpur News
Next Stories
1 लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचे संपूर्ण वाङ्मय ग्रंथस्वरूपात प्रकाशित करण्यासाठी समिती
2 ‘समाज कल्याण’ कर्मचाऱ्यांकडून काळ्या फिती लावून कामकाज
3 गेल्या वर्षांत ८० हजार पासपोर्टचे वितरण
Just Now!
X