निवडणुकीचा प्रचार संपला
नागपूर पदवीधर मतदारसंघाची उद्या निवडणूक
भारतीय जनता पक्षाचे वर्चस्व असलेल्या नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघात गेल्या पंचवीस दिवसांपासून सुरू असलेली रणधुमाळी बुधवारी सायंकाळी शांत झाली. २० जूनला होणाऱ्या या निवडणुकीत १४ उमेदवार निवडणूक रिंगणात असले तरी भाजप-शिवसेना-आरपीआय महायुतीचे प्रा. अनिल सोले, काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे उमेदवार प्राचार्य डॉ. बबनराव तायवाडे यांच्यात खरी लढत आहे. दोन्ही उमेदवारांसह अपक्ष उमेदवार किशोर गजभिये यांनी जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला आहे.
लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला अपयश आल्यानंतर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीतकाँग्रेस पक्षातील नेते तायवाडे यांच्या प्रचारार्थ फारसे दिसले नसले तरी तायवाडे यांनी शिक्षणक्षेत्रातील लोकांना हाताशी धरून प्रचार सुरू केला. त्या तुलनेत भाजपतर्फे उशिरा का होईना महापौर अनिल सोले यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांनी एकही दिवस न सोडता गेल्या वीस दिवसांपासून विविध जिल्ह्य़ात बैठका घेऊन मतदारांशी संपर्क केला. भाजपचे राष्ट्रीय नेते आणि केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी सोले यांच्या प्रचारार्थ एकाच दिवसात प्राध्यापक, सहकार आघाडी, पदवीधर व विद्यार्थी यांच्या सभा घेऊन मतदारांना मतदान करण्याचे आवाहन केले. शिवाय, नागपुरात विधानसभा मतदारसंघनिहाय सव्वा लाख मतदार असून त्यांच्यापर्यंत पोहोचण्याची जबाबदारी त्या त्या भागातील नगरसेवकांना देण्यात आली आहे. महापालिकेत महापौरपदाच्या कार्यकाळात त्यांनी केलेली विकास कामे जनतेपर्यंत पोहोचली आहे.
बबनराव तायवाडे यांच्या प्रचारार्थ काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या सभा झाल्या. मात्र, नेत्यांच्या अनुपस्थितीमुळे कार्यकर्त्यांंमध्ये नाराजीचा सूर आहे. मंगळवारी आयोजित करण्यात आलेल्या जाहीरसभेला मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव उपस्थित राहणार होते. मात्र, तीनही नेते आलेच नाहीत. प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्यासह स्थानिक नेत्यांनी हजेरी लावली असली तरी कार्यकर्त्यांंमध्ये विशेष उत्साह दिसून आला नाही. नितीन गडकरी यांचे वर्चस्व असलेल्या पदवीधर मतदारसंघावर ताबा मिळविण्यासाठी तायवाडे मेहनत घेत आहेत. गेल्या निवडणुकीत त्यांनी गडकरी यांना चांगली लढत दिली होती. यावेळी त्यांनी नवीन मतदार केले असून गेल्या पाच वर्षांत त्यांनी शैक्षणिक क्षेत्रात काम केले आहे. तायवाडे यांच्या प्रचारार्थ शेवटच्या दिवशी नेत्यांनी कार्यकर्त्यांंच्या बैठकी घेऊन सूचना दिल्या आहेत. लोकसभेचा पराभव विसरून कार्यकर्त्यांंनी एकदिलाने काम करावे, असे आवाहन काँग्रेसच्या नेत्यांनी केले आहे, तर गडकरी यांचे वर्चस्व असलेला मतदारसंघ शाबूत ठेवण्यासाठी मतदारांनी मतदान करावे, असे आवाहन भाजपने केले आहे.