अॅक्सिस बँकेच्या कॅश व्हॅनवर दरोडा घालणाऱ्या आणखी तीन आरोपींना गिट्टीखदान पोलिसांनी सोमवारी सकाळी ताब्यात घेऊन कारंजा पोलिसांच्या स्वाधीन केले. आरोपींची संख्या आता एकूण सहा झाली आहे. या सहाही आरोपींकडून एकूण सुमारे ७० लाख रुपये जप्त झाले आहेत.
शैलेश भास्कर मसराम (रा. दुर्गानगर एमआयडीसी), सचिन चंद्रप्रकाश श्रीवास्तव (रा. दाभा) व तुषार देवीदास अर्जुने (रा. उत्कर्षनगर) ही पकडल्या गेलेल्या आरोपींची नावे आहेत. अमरावती मार्गावरील ठाणेगाव ते सोनपूर दरम्यान दरोडा घातल्यानंतर सर्व आरोपी काटोलजवळील आरोपी मसरामच्या शेतात गेले. पेटय़ांमधून रक्कम काढली. ती सोयाबीनच्या पोत्यात भरली आणि कामठीजवळील एका फार्म हाऊसवर गेले. तेथे पोलिसांची कुणकुण लागताच आरोपी हातात येईल तेवढी रक्कम घेऊन पळून गेले. हे तिघे काटोलजवळ लपले असल्याचे समजल्यानंतर  वरिष्ठ पोलीस निरीक्षक चक्षुपाल बहादुरे, उपनिरीक्षक चौघरी, हवालदार चिखले, रामकृष्ण हलबे, रवींद्र गावंडे, नायक शिपाई चंद्रशेखर गभणे, अंकुश राठोड, योगीराज कोकाटे, विनोद गायकवाड, रामगणेश त्रिपाठी हे गिट्टीखदान पोलीस ठाण्याचे पथक तेथे गेले आणि झोपलेल्या आरोपींना सकाळी पकडले.
शैलेश व सचिन या दोघांजवळून ३० लाख ४० हजार रुपये तसेच पजेरो वाहन (एमएच/३१/ई/०७७७) जप्त करण्यात आले.
यातील शैलेश मसराम हा पोलीस शिपाई असून तो नागपूर मुख्यालयात आहे. तो गेल्या काही दिवसांपासून कामावर येत नव्हता. त्याचा दरोडा प्रकरणात सहभाग असल्याचे उघड झाल्यानंतर पोलीस दलात खळबळ उडाली. दरोडा प्रकरणात या आधी चंद्रशेखर सुब्रमण्यम मुदलियार (रा. वॉक्स कूलरमागे, कोराडी मार्ग), सेल्वाकुमार मुदलियार (उस्मान लेआऊट,  गोपालनगर), वसीम शेख (रा. मानकापूर), शैलेश भास्कर मसराम (रा. दुर्गानगर एमआयडीसी), सचिन चंद्रप्रकाश श्रीवास्तव (रा. दाभा) व तुषार देवीदास अर्जुने (रा. उत्कर्षनगर) या सहाही आरोपींकडून एकूण सुमारे ७० लाख रुपये जप्त करण्यात आले आहेत.
 इतर आरोपींची नावे पोलिसांना समजली असली तरी ते फरार असल्याने पोलीस त्यांच्या शोध घेत आहेत.