वाठोडा परिसरात कौशल्य विकास व व्यवस्थापन केंद्र आणि क्रीडा प्राधिकरणाच्या जागेच्या प्रस्तावाला महापालिकेच्या सभागृहात मंजुरी देण्यात आली. मात्र, दोन वर्षांपूर्वी याच परिसरातील चांदमारी भागात मोकळ्या जागेवर महापालिकेने जाहीर केलेला नंदग्राम प्रकल्प मात्र थंड बस्त्यात आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात शहरातील विविध भागात गोठय़ांची संख्या वाढण्याची चिन्हे आहेत.  
शहरातील गोठय़ांची वाढती संख्या बघता आणि पशुधन संगोपनाला महत्त्व देऊन महापालिकेने दोन वर्षांपूर्वी ‘नंदग्राम’ या अभिनव योजनेची संकल्पना मांडली. वाठोडा परिसरातील ४८ एकरात नंदग्राम प्रकल्प साकरला जाणार असल्याचे जाहीर केले होते. या योजनेला नगररचना विभागाने नाहरकत प्रमाणपत्र दिल्यानंतर प्रस्ताव शासनाकडे परवानगीसाठी पाठवण्यात आला होता. तत्कालीन आघाडी सरकारने त्याला परवानगी दिली नाही. आता हा प्रकल्प थंड बस्त्यात पडून आहे. चहुबाजूने विकास होत असतानाच शहरात जनावरांसाठी गोठे निर्माण झाले आहेत. ते हटवण्यासाठी त्या त्या भागातील नागरिकांकडून दबाव वाढत आहे. विशेषत: पावसाळ्यात  गोठय़ांमुळे परिसर अस्वच्छ राहत असल्यामुळे त्याचा दुष्परिणाम परिसरातील लोकांच्या आरोग्यवर होत आहे. शहरातील गोठे हटवण्यासाठी महापालिकेला निवेदने देण्यात आली होती. मात्र, त्याला भाजप सदस्यांनी विरोध केला होता. शहरातील गोठे हटवल्यास जनावरे ठेवायची कुठे? हा प्रश्न गोपालकांना पडला. स्थायी समितीचे तत्कालीन अध्यक्ष दयाशंकर तिवारी यांनी नंदग्रामची संकल्पना मांडली आणि वाठोडामध्ये चांदमारी परिसरात हा प्रकल्प साकरण्याला मंजुरी मिळाली. नंदग्रामध्ये ५ हजारांवर जनावरांचे संगोपन करण्यात येऊ शकते, अशी व्यवस्था राहणार होती आणि त्यासाठी अर्थसंकल्पात भरीव तरतूदही करण्यात आली होती.
वाठोडा परिसरात महापालिकेची मोठी जमीन असून सांडपाणी प्रकल्पासाठी ती राखीव आहे.  गोठय़ात निर्माण होणाऱ्या घाणीची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावण्यात येणार होती. मात्र, त्यासाठी राज्य सरकारच्या परवानगीची गरज असल्यामुळे तो प्रस्ताव सरकारकडे पाठवण्यात आला होता.  मात्र, आता भाजपचे सरकार असताना हा प्रस्ताव सध्या सरकारकडे पडून असून त्यावर कुठलीच कारवाई करण्यात आली नसल्यामुळे या प्रकल्पाबाबत प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे.
दरम्यान, गेल्या काही दिवसात शहरातील विविध भागात जनावरांचा सुळसुळाट वाढल्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. शहरातील विविध भागातील वर्दळीच्या रस्त्यांवर ही जनावरे मधोमध उभी असतात. त्यामुळे नागरिकांना वाहन चालवताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. जनावरांना पकडण्याची जबाबदारी महापालिकेच्या आरोग्य विभागाची आहे. मात्र, गेल्या चार महिन्यांपासून कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे गोठय़ांचे मालक दिवसभर जनावरे शहरात सोडून देतात आणि त्यावर कुणाचेही नियंत्रण नाही. नंदग्राम प्रकल्प साकरला गेला असता तर गोठे शहराबाहेर गेले असते आणि जनावरांचा प्रश्न सुटला असता. महापालिका प्रशासन आणि पदाधिकारी याबाबत फारसे गंभीर नसल्यामुळे नागरिकांना गोठय़ांचा आणि रस्त्यांवरील जनावरांचा त्रास सहन करावा लागत आहे.

प्रकल्पाची लवकरच निर्मिती -तिवारी
या संदर्भात सत्ता पक्षनेते दयाशंकर तिवारी यांनी सांगितले, नंदग्राम प्रकल्पाला राज्य सरकारकडून मान्यता मिळाली असून त्या संदर्भात एप्रिल महिन्यात निविदा निघण्याची शक्यता आहे. एका ठिकाणी १० पेक्षा जास्त जनावरे ठेवता येत नसल्यामुळे आधीच्या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली नव्हती. मात्र, आता राज्य सरकारकडून या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली असून  लवकरच या प्रकल्पाची निर्मिती होणार आहे.