News Flash

नागपूरच्या महापौरपदी प्रवीण दटके

नागपूर महापालिकेचे ५१ वे महापौर म्हणून दक्षिणामूर्ती प्रभागाचे युवा नगरसेवक प्रवीण दटके यांची तर महाराजबाग प्रभागाचे अपक्ष उमेदवार मुन्ना पोकुलवार यांची उपमहापौरपदी निवड झाली.

| September 6, 2014 02:21 am

नागपूर महापालिकेचे ५१ वे महापौर म्हणून दक्षिणामूर्ती प्रभागाचे युवा नगरसेवक प्रवीण दटके यांची तर महाराजबाग प्रभागाचे अपक्ष उमेदवार मुन्ना पोकुलवार यांची उपमहापौरपदी निवड झाली. दटके सर्वात युवा महापौर ठरले आहेत.
विद्यमान महापौर अनिल सोले यांचा अडीच वर्षांचा कार्यकाळ संपल्यानंतर नव्या महापौर आणि उपमहापौरपदासाठी नावे आधीच जाहीर करण्यात आली होती. महापालिकेतील नागपूर विकास आघाडीचे संख्याबळ बघता दटके आणि पोकुलवार यांचा विजय निश्चित मानला जात असला तरी काँग्रेस, राष्ट्रवादी आणि बहुजन समाज पक्षाने दोन्ही पदासाठी उमेदवार उभे केल्याने निवडणूक घेण्यात आली. महापालिकेच्या टाऊन हॉलमध्ये प्रारंभी महापौरांच्या निवड प्रक्रियेला प्रारंभ करण्यात आला. महापौरपदासाठी काँग्रेसकडून अरुण डवरे, नागपूर विकास आघाडीकडून प्रवीण दटके तर बहुजन समाज पक्षाकडून हर्षला जयस्वाल हे उमेदवार होते. यावेळी हात उंचावून मतदान घेण्यात आले असता त्यात प्रवीण दटके यांना ८०, अरुण डवरे ३९ व हर्षला जयस्वाल यांना ९ मते पडली. प्रवीण दटके यांना सर्वाधिक मते मिळाल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी दटके यांचे नाव महापौर म्हणून जाहीर केले.
उपमहापौरपदासाठी काँग्रेसच्या सुजाता कोंबाडे यांनी नाव मागे घेतल्याने नागपूर विकास आघाडीकडून मुन्ना पोकुलवार, काँग्रेस आघाडीकडून राजू नागुलवार आणि बसपाकडून शबाना परवीन मो. जमाल निवडणूक रिंगणात होते. पोकुलवार यांना सर्वाधिक ८४, त्या खालोखाल नागुलवार यांना ४४ तर शबाना परवीन यांना १२ मते मिळाल्यामुळे पोकुलवार यांची उपमहापौरपदी निवड झाल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केले.
महापौरपदी प्रवीण दटके तर उपमहापौरपदी मुन्ना पोकुलवार यांची निवड झाल्यानंतर महालातील महापालिकेच्या कार्यालयाबाहेर कार्यकत्यार्ंनी भाजपचा विजय असो.. प्रवीण दटके आगे बढो अशा घोषणा देत गुलालाची उधळण करीत ढोल ताशांच्या गजरात जल्लोष केला. विद्यमान महापौर अनिल सोले आणि उपमहापौर जैतुनबी पटेल यांच्यासह शहर अध्यक्ष कृष्णा खोपडे, सुधाकरराव देशमुख, विकास कुंभारे, प्रमोद पेंडके  आदी भाजप पदाधिकाऱ्यांनी आणि नगरसेवकांनी दटके आणि पोकुलवार यांचे स्वागत केले.
दटके आणि पोकुलवार महापालिकेतून वाडय़ावर गेले. केंद्रीय मंत्री आणि पक्षाचे राष्ट्रीय नेते नितीन गडकरी दिल्लीला असल्यामुळे कांचन गडकरी यांनी स्वागत करून अभिनंदन केले. वाडय़ाबाहेर कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. भारतीय जनता पक्षाच्या टिळक पुतळ्याजवळील कार्यालयासमोर आणि दटके यांच्या दक्षिणामूर्तीमधील निवासस्थानी कार्यकत्यार्ंनी गुलाल उधळीत, फटाक्याची आतषबाजी आणि ढोल ताशांच्या निनादात जल्लोष केला.
सदस्यांची बेशिस्ती
निवडणूक प्रक्रियेला सकाळी १० वाजता सुरुवात झाली. अनेक सदस्य उशिरा आल्यामुळे महापौरांच्या निवडणुकीच्यावेळी मतदानात त्यांना सहभागी होता आले नाही. काँग्रेसचे सुरेश जग्यासी, वासुदेव ढोके, देवा उसरे, आभा पांडे, नागपूर विकास आघाडीच्या सरोज बहादुरे, अनिल धावडे, सुमित्रा जाधव, जगदीश ग्वालबंशी, शिवसेनेच्या अल्का दलाल, बसपाच्या मनिषा घोडेस्वार, ललिता पाटील, किरण पाटणकर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे दुनेश्वर पेठे उशिरा आल्यामुळे त्यांना मतदान करता आले नाही. नागपूर विकास आघाडीने वेळेवर उपस्थित राहण्यासंदर्भात व्हीप काढल्यानंतर चार सदस्य उशिरा आले. दोन सदस्य आलेच नाहीत, त्यामुळे त्यांना कारणे दाखवा नोटीस देण्यात येणार असल्याचे शहर अध्यक्ष कृष्णा खोपडे यांनी सांगितले.
‘अच्छे दिन आएंगे..’
महापौरपदी निवड झाल्यानंतर प्रवीण दटके म्हणाले, पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांनी माझ्यावर विश्वास टाकून मला शहराचा विकास करण्याची संधी दिली असून त्या संधीचा पूर्ण फायदा घेऊन शहराचा विकास करेल. अनिल सोले यांनी केलेली विकास कामे समोर नेत ती पूर्ण करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणार आहे. महापालिका किंवा भाजप बदनाम होणार नाही याची काळजी घेण्यात येईल. प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी, सर्व पक्षाचे सदस्य, गटनेते यांच्या सहकार्यातून शहराचा विकास करण्याकडे अधिक लक्ष देण्यात येईल. विधानसभा निवडणुका असल्यामुळे शहराचे काम प्रभावीपणे कसे चालेल त्यासाठी प्रयत्न करणार आहे. स्थानिक स्वराज्य करासंदर्भात राज्य सरकारकडे महापालिकेने भूमिका स्पष्ट केली आहे. त्यामुळे निर्णय राज्य सरकारला घ्यायचा आहे. येणाऱ्या काळात राज्यात महायुतीची सत्ता येणार असल्यामुळे महापालिकेला चांगले दिवस येतील, असा विश्वास दटके यांनी व्यक्त केला.
उपमहापौर मुन्ना पोकुलवार म्हणाले, नागपूर विकास आघाडीच्या सर्व सदस्यांमुळे आणि पक्षातील सर्व नेत्यामुळे उपमहापौर म्हणून काम करण्याची संधी मिळाली. उपमहापौर म्हणून महापालिकेत प्रभावीपणे शहराचा विकास कसा करता येईल या दृष्टीने पुढची वाटचाल करणार आहे.
महापौरांकडून अपेक्षा
विरोधी पक्ष नेते विकास ठाकरे म्हणाले, महापालिकेत नागपूर विकास आघाडीचे संख्याबळ असल्यामुळे भाजपचा महापौर होणे निश्चित होते. नवे महापौर प्रवीण दटके यांनी शहरातील मूलभूत समस्यांकडे लक्ष दिले पाहिजे. महापालिकेत जनतेची होणारी पिळवणूक आणि भ्रष्ट अधिकाऱ्यांना पाठीशी घालण्याचे प्रकार थांबविले पाहिजे, अशी अपेक्षा ठाकरे यांनी व्यक्त केली.
नव्यांची पाश्र्वभूमी
महापौर प्रवीण दटके यांचे अभियांत्रिकीचे शिक्षण सुरू आहे. शेती हा त्यांचा प्रमुख व्यवसाय आहे. भारतीय जनता युवा मोर्चा महासचिव, त्यानंतर शहर अध्यक्ष, प्रदेश उपाध्यक्ष आणि महापालिकेत सत्ता पक्ष नेता म्हणून त्यांनी काम केले. नगरसेवक  म्हणून तीन वेळा महापालिकेत प्रतिनिधित्व केले असून विविध पदांवर कामे केली आहेत.
उपमहापौर मुन्ना पोकुलवार यांनी महाविद्यालयीन जीवनापासून राजकीय क्षेत्रात पदार्पण केल्यानंतर महापालिकेत नगरसेवक, अपक्ष गटनेता आणि आता उपमहापौर म्हणून निवड झाली आहे. महाराजबाग प्रभागाचे प्रतिनिधित्व करताना विविध सामाजिक संघटनेत ते सक्रिय आहेत शहरातील बर्डी पॅनल म्हणून ख्याती असलेल्या संस्थेचे ते प्रमुख पदाधिकारी आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 6, 2014 2:21 am

Web Title: nagpur new mayor pravin datake
Next Stories
1 जिल्ह्य़ातील लाखो विद्यार्थ्यांनी ऐकले पंतप्रधानांचे भाषण
2 ‘प्रोस्टेट कॅन्सरबाबत जनजागृती आवश्यक’
3 ग्राहकांना स्वस्त व उत्कृष्ट मोसंबी मिळणार
Just Now!
X