News Flash

राष्ट्रीय महामार्गाच्या विस्तारीकरणात महापालिकेकडून झाडांचा निष्कारण बळी!

राष्ट्रीय महामार्गाच्या विस्तारीकरणातच नागपूर महापालिकेकडून झाडे लावण्याचा अजब प्रकार अमरावती मार्गावरील विद्यापीठ परिसर ते वाडी दरम्यान सुरू झाला आहे.

| September 23, 2014 07:39 am

राष्ट्रीय महामार्गाच्या विस्तारीकरणात महापालिकेकडून झाडांचा निष्कारण बळी!

राष्ट्रीय महामार्गाच्या विस्तारीकरणातच नागपूर महापालिकेकडून झाडे लावण्याचा अजब प्रकार अमरावती मार्गावरील विद्यापीठ परिसर ते वाडी दरम्यान सुरू झाला आहे. महामार्ग प्राधिकरणाच्या मते आम्ही महापालिकेला याची पूर्वसूचना दिलेली होती, तर आम्हाला अशी कोणतीही सूचना मिळालेली नाही, असे महापालिकेचे म्हणणे आहे. दोघांच्याही या भूमिकेत बळी मात्र निष्कारण झाडांचा जाणार आहे.
अमरावती मार्गावरील विद्यापीठ परिसर ते वाडी नाकादरम्यान राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहाच्या सुमारे अडीच किलोमीटर रस्त्याचे विस्तारीकरण प्राधिकरणाच्यावतीने सुरू आहे. सुरुवातीचे ३६० मीटर दोन्ही बाजूने विस्तारीकरण, तर पुढील २.२ किलोमीटरचे विस्तारीकरण एका बाजूने होणार आहे. सध्या एका बाजूने विस्तारीकरणाचे काम सुरू झाले आहे, पण त्याचवेळी दुसऱ्या बाजूने नागपूर महापालिकेने तीन-चार दिवसांपूर्वी सुमारे १२-१२ फुटाची पिंपळ, कडूनिंब आदी झाडे लावण्यास सुरुवात केली. नागपूर सुधार प्रन्यासच्यावतीने पुण्यातील बीव्हीजी नावाच्या कंपनीसोबत शहरात झाडे लावण्यासाठी करार करण्यात आला आहे. त्यानुसार दोन वर्षे झाडे जगवून दाखवा नंतर रक्कम देण्यात येईल, असेही नमूद आहे. शहरात सध्या अनेक ठिकाणी या कंपनीकडून झाडे लावून घेण्यात आली आहेत. त्यामुळे उर्वरित झाडांचे करायचे काय आणि ती लावण्यासाठी तर राष्ट्रीय महामार्गाची तर निवड करण्यात आली नाही ना, असा प्रश्न माजी पोलिस उपमहासंचालक अरविंद गिरी यांनी उपस्थित केला.
यासंदर्भात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या उपअभियंता ईखार यांच्याशी संपर्क साधला असता, या ठिकाणी झाडे लावण्याचे काम सुरू असल्याचे माहिती झाल्यानंतर प्रत्यक्षात शनिवार, २० सप्टेंबरला प्रन्यासला तातडीने हे काम थांबवण्यास सांगितले. मात्र, तरीही काम सुरूच असेल तर चौकशी करावी लागेल, असे त्यांनी सांगितले. प्रन्यासचे अधीक्षक अभियंता गुज्जलवार यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी प्रन्यासने या ठिकाणी झाडे लावण्यास सांगितलेले नाही. महापालिकेकडून ती लावण्यात आली असावी, असे सांगितले, तर महापालिकेचे उद्यान अधीक्षक श्रीखंडे यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी प्राधिकरणाकडून असे कोणतेही निर्देश आलेले नसल्याचे स्पष्ट केले. मात्र, असे काही असल्यास प्राधिकरणाशी संपर्क साधून चौकशी करण्यात येईल, असे ते म्हणाले.
मुळातच विस्तारीकरण एका बाजूने की दोन्ही बाजूने, हा प्रश्न नाही, पण रस्त्याला अगदी लागून ही झाडे लावण्यात आली आहेत. त्यामुळे या बाजूनेही विस्तारीकरण सुरू झाल्यास नुकत्याच लावलेल्या या झाडांचा बळी जाणे निश्चित आहे. यात नुकसान झाडांचे होणार असले तरीही नागरिकांचेसुद्धा तेवढेच नुकसान होणार आहे.
या संपूर्ण प्रकरणात कुणाचाच पायपोस कुणाच्या पायाखाली नाही. ‘आंधळं दळतंय आणि कुत्रं पीठ खातंय’ अशी अवस्था आहे. झाडे लावायचीच होती तर ज्या ठिकाणी खरोखर झाडे लावण्याची गरज आहे अशी शहरात इतरही ठिकाणे आहेत. राष्ट्रीय महामार्गावर झाडांचा बळी का, असा प्रश्न गिरी यांनी उपस्थित केला. यापूर्वीही अमरावती मार्गावर मोठय़ा प्रमाणावर वृक्षतोड झालेली होती. त्यामुळे महापालिकेकडूनच दिला जात असलेला झाडांचा बळी हा नागरिकांसाठी भरूदड आहेच, पण ‘हिरवे शहर’ या बिरुदावलीला काळीमा फासण्याचाही प्रकार असल्याची प्रतिक्रिया नागपूरकरांकडून उमटत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 23, 2014 7:39 am

Web Title: nagpur news 10
टॅग : Nagpur,Nagpur News
Next Stories
1 जयराज सरमुकद्दमचा विक्रम‘लिम्का बुक ऑफ रेकार्ड’मध्ये
2 मतदारसंघ व निवडणुकीची माहिती देणारी पुस्तिका प्रकाशित
3 जि.प. निवडणुकीतील धुरंधरांचे शक्तीप्रदर्शन म्हणजे आगामी निवडणुकीतील संघर्षांची नांदी
Just Now!
X