काही महिन्यापूर्वीच घोषणा झालेली भारतीय व्यवस्थापन संस्था (आयआयएम) या शैक्षणिक वर्षांपासून सुरू होत असून गेल्या चार वर्षांपासून शहरातील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय मात्र, पैशाअभावी अडकले असून ते सुरू होण्याच्या प्रतीक्षेत विद्यार्थी आहेत. नागपूर सुधार प्रन्यासने जागेसाठी २६ कोटी रुपये किमत सांगितली असून वर्षांला ५३ लाख रुपये भाडे आकारले असल्याने महाविद्यालयाचा प्रस्ताव अडगळीला पडला आहे. गेल्या २५ डिसेंबरलाच ही रक्कम भरायची होती. त्यानंतर दोन टक्के व्याज त्यावर आकारण्यात येणार आहे. मात्र, अद्याप शासनाने त्यावर कोणताच निर्णय घेतलेला नाही.

गेल्या १० वर्षांपासून राज्य शासनाचे शासकीय किंवा शासन अनुदानित एकही अभियांत्रिकी महाविद्यालय नागपुरात नसताना उपराजधानीसाठी भूषणावह असलेल्या या महाविद्यालयाने पैशाअभावी अद्याप गती घेतलेली नाही. माजी मंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या प्रयत्नांतून चार वर्षांपूर्वी नागपुरात शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय स्थापण्याचा निर्णय झाला. तेव्हापासून कोणत्या ना कोणत्या कारणास्तव हे महाविद्यालय अडगळीला पडले. वांजरी येथे ७.४७ एकर जागा या महाविद्यालयाला गेल्या वर्षी मिळाली. मध्यंतरी हे महाविद्यालय दुसऱ्या मतदारासंघात पळवून नेण्याचे प्रयत्न फसले.
स्थापत्य अभियांत्रिकी, यंत्र अभियांत्रिकी, विद्युत अभियांत्रिकी, अणूविद्युत अभियांत्रिकी आणि संगणक अभियांत्रिकी अशा एकूण पाच शाखांसाठी प्रत्येकी ६० जागा अशा एकूण ३०० प्रवेश क्षमतेचे हे महाविद्यालय राज्य आणि राज्याबाहेरील विद्यार्थ्यांसाठी पर्वणी ठरेल.
अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेच्या मानकानुसार शिक्षक व शिक्षकेतर अशा एकूण २४४ पदांच्या मंजुरीची शिफारस करण्यात आली असून त्यासाठी अंदाजित बजेट ७२ कोटींचे आहे. येत्या पाच वर्षांसाठी एकूण ८९ कोटी एवढा खर्च अपेक्षित आहे.
गेल्या वर्षी ३ जूनला उच्च व तंत्रशिक्षण विभागामार्फत शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय नागपूर येथे सुरू करण्यास मान्यता प्रदान करण्यात आली. सार्वजनिक बांधकाम विभागाकडे इमारती बांधकामाबाबत नकाशे व खर्चाचे अंदाजपत्रक तयार करण्याची विनंती करण्यात आली.
केंद्रातील अर्थमंत्र्यांनी विदर्भासाठी ‘आयआयएम’ची घोषणा केली. त्यास याच महिन्यात केंद्रातील मनुष्यबळ विकास मंत्र्यांनी मान्यता दिली. ‘आयआयएम’साठी मिहानमधील २९३ एकर जागा मुख्यमंत्र्यांनी देऊ केली. ‘व्हीएनआयटी’मध्ये ‘आयआयएम’साठी कॅम्पसचीही सोय झाली. मात्र, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू व्हायला गती मिळत नसल्याने हे महाविद्यालय सध्या अडगळीला पडल्याची स्थिती आहे.