News Flash

मेट्रो आराखडय़ातून हरवला वन्य प्राण्यांचा ‘कॉरिडॉर’

प्रस्तावित नागपूर मेट्रोला लागून असलेल्या पेंच व बोर यासारख्या संरक्षित जंगलातील वन्यजीवांच्या हालचालींकरिता आवश्यक असणाऱ्या जंगल

| February 27, 2015 08:30 am

प्रस्तावित नागपूर मेट्रोला लागून असलेल्या पेंच व बोर यासारख्या संरक्षित जंगलातील वन्यजीवांच्या हालचालींकरिता आवश्यक असणाऱ्या जंगल ‘कॉरिडॉर’चा कोणताही विस्तृत विचार मेट्रो क्षेत्र विकास आराखडय़ात करण्यात आलेला नाही. त्यामुळे येणाऱ्या काळात या भागात होणाऱ्या विकासामुळे मानव-वन्यप्राणी संघर्षांची बीजे रोवली जाणार आहेत.
२०१२ ते २०३२ या काळात विकसित होत जाणाऱ्या नागपूर मेट्रोच्या एकूण क्षेत्रापैकी १४.२५ टक्के क्षेत्र हे वनाच्छादित असून वन विभागाच्या अखत्यारित राहणार आहे. या क्षेत्रात कोणत्याही प्रकारची विकास कामे मंजूर करण्यात येणार नसल्याचे आराखडय़ात नमूद करण्यात आलेले आहे. मात्र त्याच वेळी वन्य प्राण्यांचे स्थलांतर, मानवी वस्तीशी येणारा त्यांचा संपर्क व त्या संबंधी करावयाच्या योजना याचा विचार आराखडय़ात करण्यात आलेला नाही.
पेंच व बोर या दोन्ही व्याघ्र प्रकल्पांचा काही भागांचा मेट्रो आराखडय़ात समावेश आहे व या दोन्ही ठिकाणी वन्य जीवांचे अस्तित्व आहे. बोर व्याघ्र प्रकल्प हा एकीकडे बुटीबोरीमार्गे ताडोबा तर दुसरीकडे बाजारगाव, वरूडमार्गे मेळघाटशी जोडलेला आहे. त्याचप्रमाणे पेंच व्याघ्र प्रकल्प देखील नवेगाव-नागझिरा संरक्षित जंगल क्षेत्राशी जोडले गेले आहे. हे सगळे मार्ग वन्यप्राण्यांच्या स्थलांतराचे नित्याचे मार्ग आहेत व त्यावर अनेकवेळा वाघ व इतर प्राण्यांच्या अस्तित्वाचे पुरावे सापडले आहेत. नुकत्याच झालेल्या वन्यप्राणी गणनेनुसार या क्षेत्रात वाघासह सर्व प्राण्यांची संख्या वाढली असल्याचे निदर्शनास आले आहे.
प्रस्तावित मेट्रो आराखडय़ानुसार, या कॉरिडॉरला लागून रहिवासी तसेच औद्योगिक क्षेत्र भविष्यात उभे राहणार आहे व त्याचा अडथळा निश्चितपणे या प्राण्यांच्या हालचालींवर होणार आहे. प्राण्यांच्या हालचालींकरिता जंगल कारिडॉर आवश्यक असल्याचे विकास आराखडय़ात म्हटले असले तरी त्याबाबत विस्ताराने कोणतीही योजना आखण्यात आलेली नाही. त्यामुळे, एकदा विकास कामांना सुरुवात झाल्यानंतर मोठय़ा प्रमाणावर बांधकामांची परवानगी या भागात दिली जाईल व त्यातून भविष्यातील मानव-वन्यप्राणी संघर्षांला आपसूकच आमंत्रण दिले जाणार आहे.
हुडकेश्वर सारख्या भागात रहिवासी वस्त्यांमध्ये बिबटय़ा येऊन गेल्याची उदाहरणे ताजी आहेत. राष्ट्रीय महामार्गामुळे वन्य प्राण्यांच्या हालचालींना होणारा अडथळयांच्या संदर्भातील लढाई सुरूच आहे. त्या पाश्र्वभूमीवर मेट्रो आराखडय़ाला अंतिम स्वरूप देताना याचा अगोदरच विचार होणे गरजेचे आहे. आजच्या घडीला वन्य प्राण्यांच्या कॉरिडॉरचा विचार झाल्याचे दिसत नाही. एकतर यामुळे मानव-वन्यजीव संघर्ष निश्चितपणे होईल व दुसरीकडे वन्यजीव मर्यादित क्षेत्रात कोंडले जाऊन कमजोर पिढीची निर्मिती त्यातून होईल. मानव विकासाचा विचार करतानाच थोडा तरी वन्य प्राण्यांचा विचार केला जावा, असे मानद वन्य जीवरक्षक कुंदन हाते यांनी सांगितले.
नागपूर जिल्ह्य़ातील वनसंपदेचे गुणगान या आराखडय़ात गाताना शहरी भागात उद्भवणाऱ्या मानव-वन्यजीव संघर्षांचा विचार आराखडा तयार करताना झालेला नाही. जंगलसंबंधित विषय थोडक्यात आटोपून गांभीर्याचा अभाव नागपूर सुधार प्रन्यासने दाखवला असल्याचे पर्यावरण क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थांनी म्हटले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 27, 2015 8:30 am

Web Title: nagpur news 13
टॅग : Nagpur,Nagpur News
Next Stories
1 ग्रंथालयांच्या दूरवस्थेमुळे हजारो ग्रंथांचा अनमोल ठेवा अडगळीत
2 मराठी नव्हे तर, अमराठींनीच जपला मराठी भाषेचा ठेवा!
3 होळीनिमित्त नागपूर-मुंबईदरम्यान दोन विशेष रेल्वे गाडय़ा
Just Now!
X