गमावलेला जनाधार परत मिळविण्यासाठी राजकीय नेते साजाजिक आणि सांस्कृतिक व्यासपीठांवर मिरविण्यासाठी सक्रिय होतात. त्याचेच प्रत्यंतर आता बहुजनांचे राजकारण करणाऱ्या पक्षनेत्यांकडूनही येत आहे. सामाजिक उपक्रमात राजकीय पक्षांची लुडबूड झाल्यास सर्वसामान्य जनता त्या उपक्रमांपासून दूर जाते. यातून बोध घेत राजकीय नेते स्वतच कूस बदलत सामाजिक कार्यक्रमात सहभागी होताना आपापले झेंडे उतरवून ठेवण्याचा सामंजस्यपणा दाखवित आहेत.
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष खासदार रामदास आठवले, भारिप-बहुजन महासंघाचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर आणि बसपचे सरचिटणीस सुरेश माने यांनी अशा प्रकारचे राजकीय चातुर्याचे दर्शन घडविले आहे. अलीकडे अ‍ॅड. आंबेडकर यांनी जातमुक्त आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला आहे.
यासंदर्भात त्यांनीच खुलासा केला होता. एखादे सामाजिक परिवर्तनाचे काम राजकीय पक्षाच्या व्यासपीठावर करणे सोपे नाही. त्यामुळे राजकीय पक्षाचे बॅनर बाजूला ठेवून सामाजिक चळवळीत जाऊन जनतेशी, विशेषत: तरुणांशी संवाद साधण्याच्या प्रयत्न आहे, असे आंबेडकर म्हणाले.
जनाधार संपल्यावर राजकीय पक्षांचे नेते विविध सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमांना हजेरी लावतात. काही धुर्त राजकारणी हे जाणीवपूर्वक करतात. अशा कार्यक्रमांमधून अधिकाधिक लोकांच्या संपर्कात येऊन गमावलेली पत पुन्हा प्राप्त करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. जनतेच्या सामाजिक, सांस्कृतिक उपक्रमांना मोठय़ा प्रमाणात प्रतिसाद दिसून आल्यावर त्यांच्यातील राजकीय नेता जागा होतो, असा अनुभव आहे. या संदर्भात अ‍ॅड. आंबेडकर यांची भूमिका मात्र स्पष्ट आहे. राजकीय पक्षांमुळेच राजकीय स्वातंत्र अबाधित राहिले आहे आणि राहणार आहे. देशात सर्वच राजकीय पक्षांना उतरती कळा लागली आहे. राजकीय पक्षांनी विश्वास गमावल्याचे हे द्योतक आहे. लोकशाही राष्ट्राला हा धोक्याचा इशारा आहे.
प्रत्येक राजकीय पक्ष जातीचे राजकारण करीत आहे. त्यामुळे एका विशिष्ट कालावधीनंतर त्या पक्षाबद्दल अविश्वसनीयता निर्माण होते, असे त्यांचे म्हणणे आहे.
चर्चासत्रे, परिसंवाद, परिषदा, व्याख्यान यासारख्या कार्यक्रमांमधून राजकीय नेते आपली जनतेशी तुटलेली नाळ जोडण्याचे प्रयत्नात आहेत.

काय आहे चळवळ?
जात, पोटजातींचे साखळदंड गळून पडावेत म्हणून सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या मंडळींनी सामाजिक अन्याय, अत्याचार प्रतिबंध चळवळ सुरू केली असून काही प्रश्न उपस्थित केले आहेत. १) जात ही शिक्षण देते काय, २) जात नोकरी देते काय. ३) जात सुरक्षितता प्रदान करते काय. ४) जातीमुळे विकास होतो काय. ५) जात गरिबी दूर करते काय. ६) जात श्रीमंती प्रदान करते काय. ७) जात बंधुभाव निर्माण करते काय. ८) जात समता नाकारते काय. ९) जात देशाच्या उभारणीला अडसर ठरते काय. १०) जात कशासाठी आहे. ११) राजकीय पक्ष संपण्यास जात कारणीभूत आहे काय, या प्रश्नांची उत्तरे ज्यांना सापडले नाही, त्या संघटना आणि धर्मगुरूंनी या चळवळीत सहभागी व्हावे, असे आवाहनही होत आहे.