24 February 2021

News Flash

महापालिकेच्या रुग्णालयामध्येच अग्निशमन यंत्रणेची बोंब दुसऱ्यास सांगे ज्ञान, स्वत: कोरडे पाषाण

शहरातील खासगी रुग्णालयांमध्ये अग्निशमन यंत्रणा असली पाहिजे, असा नियम करणाऱ्या शहरातील महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये आग लागली

| March 17, 2015 07:15 am

शहरातील खासगी रुग्णालयांमध्ये अग्निशमन यंत्रणा असली पाहिजे, असा नियम करणाऱ्या शहरातील महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये आग लागली तर ती विझविण्यासाठी किंवा कुठलीही घटना घडली तर अग्निशमन विभागाची यंत्रणा उपलब्ध नसल्याचे समोर आले आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागाने गेल्या वर्षभरात शहरातील ३०० पेक्षा अधिक खासगी रुग्णांना यासंदर्भात नोटीस देऊन त्यांना तात्काळ यंत्रणा बसविण्यास सांगितले असताना महापालिकेच्या रुग्णालयांना मात्र नोटीस देण्यात आली नसल्याची बाब समोर आली आहे.
शहरात महापालिकेची पाच ते सहा मोठी रुग्णालये असून त्यापैकी गांधीनगर भागात असलेल्या इंदिरा गांधी रुग्णालयाची अवस्था फारच वाईट असून त्याठिकाणी एकीकडे वैद्यकीय सुविधा नागरिकांना मिळत नसताना आता अग्निशमन यंत्रणा नसल्याची बाब समोर आली आहे. रुग्णालयात आग लागली किंवा कुठलीही घटना घडली तर अशावेळी अग्निशमन यंत्रणा असावी, असा महापालिकेच्या अग्निशमन विभागाचा नियम असून त्याप्रमाणे दरवर्षी शहरातील विविध खासगी रुग्णालयाचे सर्वेक्षण करीत असतात. मात्र, महापालिका रुग्णालयाचे सर्वेक्षण केले जात नाही. दहा आणि बारा खाटाच्या रुग्णालयामध्ये स्वतंत्र अग्निशमन यंत्रणा असणे गरजेचे आहे. मात्र, त्याचे पालन होताना दिसत नाही. सदर भागातील महापालिकेच्या रुग्णालयात मोठय़ा प्रमाणात रुग्ण उपचारासाठी येत असतात. मात्र, त्या ठिकाणी आग विझविण्यासाठी यंत्रणा नाही. महापालिकेत प्रत्येक रुग्णालयासाठी स्वतंत्र निधी असतो. त्या निधीतून रुग्णालयात व्यवस्था करणे गरजेचे असताना हा निधी जातो कुठे? असा प्रश्न उपस्थित होतो.
महापालिका प्रशासनाने प्रत्येक सरकारी कार्यालयात अग्निशमन यंत्रणा असावी, असा आदेश काढला होता. त्याबाबत सर्वेक्षण करण्यात आले होते. मात्र, त्याबाबत पुढे काहीच झाले नाही. महापालिकेच्या रुग्णालयाची अशीच अवस्था असून त्याकडे महापालिका प्रशासन दुर्लक्ष करीत आहे.
खासगी रुग्णालयात अग्निशमन यंत्रणा नसली की रुग्णालयाला नोटीस पाठविली जात असून त्यांच्यावर दंड आकारण्यात येतो. मात्र, महापालिकेच्या रुग्णालयात सोयी सुविधा आणि अग्निशमन यंत्रणा नसताना त्या रुग्णालयांवर मात्र कुठलीच कारवाई केली जात नाही, असा भेदभाव का केला जातो, असा प्रश्न इंडियन मेडिकल असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थित केला. या संदर्भात अग्निशमन विभाग समितीचे सभापती किशोर डोरले यांना विचारणा करण्यात आली असता त्यांनी सांगितले. महापालिकेच्या रुग्णालयात अग्निशमन यंत्रणा असली पाहिजे आणि नसली तर संबंधीत अधिकाऱ्याला त्या संदर्भात प्रशासनाने जाब विचारला पाहिजे. उन्हाळ्याच्या दिवसात आगीच्या घटना मोठय़ा प्रमाणात घडत असतात. त्यासाठी संबंधीत विभागाने सुरक्षेच्या दृष्टीने आपापल्या कार्यालयात अग्निशमन यंत्रणा बसविणे आवश्यक आहे. पालिकेच्या रुग्णालयात यंत्रणा आहे की नाही याबाबत चौकशी करावी लागेल, असेही डोरले यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 17, 2015 7:15 am

Web Title: nagpur news 17
टॅग Nagpur,Nagpur News
Next Stories
1 रसायनमुक्त सेंद्रीय शेतमाल थेट ग्राहकांना देणारे पहिले केंद्र विदर्भात
2 लोककलांची श्रीमंती जगासमोर येण्यासाठी नागपुरात ‘शिल्पग्राम’चा केंद्राकडे प्रस्ताव
3 आताची उपचार पद्धत सोपी, बालक केंद्रित
Just Now!
X