दिवाळीत फराळ आणि फटाके यांच्या बरोबरच लहान मुलांसाठी असलेली महत्त्वाची गोष्ट म्हणजे किल्ले बांधणी. दिवाळीनिमित्त शाळेला सुटी असल्याने घरोघरी आणि वस्त्यांमध्ये इतिहासकालीन किंवा काल्पनिक किल्ले तयार केले जात असून ते तयार करण्यासाठी आबालवृद्ध सहभागी होत असतात. दिवाळीचा आनंद द्विगुणित करणारे किल्ले बनवले नाहीत तर दिवाळी दिवाळीसारखी वाटत नाही त्यामुळे संगणकाच्या युगातही किल्ले बनविण्याची ओढ आजही कायम दिसून येत आहे. शहरामध्ये विविध भागात ५० पेक्षा अधिक शिवकालिन आणि काल्पनिक किल्ले तयार करण्यात आले असून ते लोकांना पाहण्यासाठी खुले करण्यात आले आहेत.
पूर्वीच्या काळी मातीचे किल्ले घरोघरी बनवले जायचे. परंतु, ही एक कला आहे आणि या कलेला स्पर्धेमुळे एक योजनाबद्ध स्वरूप आल्यामुळे प्रत्येकाने त्यासाठी मेहनत घेतली आहे. सध्या नागपूर आणि परिसरात ७० पेक्षा अधिक किल्ले तयार करण्यात आले आहेत. त्यातील काही काल्पनिक तर काही शिवकालीन किल्ले आहेत. महाल भागात भोसलेंच्या वाडय़ासमोर रोहित लाडसावंगीकर यांनी राजगडची प्रतिकृती तयार केली आहे. या शिवाय त्रिमूर्ती नगरात धनंजय दिग्वेकर यांच्याकडे शिवनेरी, सुरेंद्रनगर स्वप्नील मूर्ते यांच्याकडे लोहगड, भालदारापुरामध्ये शिवनेरी आणि बाबुळखेडा भागात देवकर यांच्या घरी तोरणा किल्ला तयार करण्यात आला आहे. या शिवाय मॉडर्न स्कूल, भरतनगरला सिद्धेश राऊत यांच्या निवासस्थानी, गांधीनगरमध्ये कापौरेशन शाळेमध्ये, माधवनगरमध्ये गार्गी आणि पारितोष निमदेव, पराजंपे स्कूल, अंध विद्यालय, जरिपटकामध्ये कोमल सलुजा , सुरेंद्रनगरला शिलेदार यांनी काल्पनिक किल्ले तयार केले आहेत.
दिवाळीतील सुटय़ांमध्ये मुलांमधील सुप्त कलागुणांना चालना देण्याचे काम या किल्ल्यांमुळे होते. संगणक किंवा दूरचित्रवाणी संचापुढे बसणाऱ्या पिढीचे किल्ले बनविण्याच्या निमित्ताने माती आणि इतिहासाशी नाते जोडू पाहण्याचा प्रयत्न दिवाळीच्या सुट्टय़ांमध्ये होतो. मुलांना शिवकाळातील किल्ल्यांची माहिती देणे, नकाशे पुरविणे, त्यांना सर्वतोपरी मार्गदर्शन करणे यासाठी आता विदर्भात अनेक संस्था पुढे येऊ लागल्या आहेत. तीन भागात ही स्पर्धा आयोजित करण्यात आली असून शहरातील विविध भागातील त्याचे परीक्षण केले जात आहे.  लक्ष्मीनगर, रामदासपेठ, धंतोली, महाल, मानेवाडा, वाडी या भागात किल्ले तयार करण्यात आले आहे. त्र्यंबक मोकासरे या अंध कलाकाराने किल्ला तयार केल्यानंतर तो लोकांना पाहण्यासाठी ठेवला जातो. दगड, माती, वाळू, प्लास्टर ऑफ पॅरिस, सिमेंट, रंग, पत्रे, थर्माकोल, पाईप, फुटलेले फटाके आदींचा कल्पकतेने वापर करून आबालवृद्ध या स्पर्धेत भाग घेतात. शिवकिल्ल्यांच्या हुबेहूब प्रतिकृती तयार करण्यासाठी चालना देणाऱ्या या स्पर्धेने पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भाची सांस्कृतिक नाळ जोडली आहे, हे मात्र तितकेच खरे.