मौद्याच्या पावडदौना परिसरात गुरुवारी घडलेल्या सशस्त्र लुटमार प्रकरणात पोलिसांकडे तक्रार करणारा शेतजमीन खरेदीदारच मुख्य आरोपी निघाला त्यांचा बनाव उघडकीस आला आहे. पोलिसांनी वडील, मुलासह सात आरोपींना अटक केल्यानंतर या नाटय़मय दरोडय़ाचा पर्दाफाश झाला. आरोपींनी बनावट नोटांचा वापर करून पोलिसांच्या डोळ्यातही धूळ झोकण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणात मंगेश श्रावण भुसारी (२३), भूषण बावनकर (१९), मंगेश बावनकुळे (१९), बंडू अजाबराव वानखेडे (४०), नितेश वानखेडे (२३), बाळा पेल्ले (२६) आणि अविनाश काळे या सात आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याजवळून चाकू, टाटा सुमो, दुचाकी आणि १ लाख १० हजार रुपये जप्त करण्यात आले आहे.
 कचरू मेश्राम (६०) यांच्या मालकीची नेरला येथे सव्वापाच एकर जमीन असून त्यांनी ती प्रतिएकर १० लाख रुपये प्रमाणे बंडू अजाब वानखेडे यांना ५० लाख ५० हजार रुपयाला विकली. या शेतीची विक्री ८ जुलैला कामठी मधील दुय्यम निबंधक कार्यालयात होणार होती. त्यानुसार खरेदीदार वानखेडे हे मुलाला सोबत घेऊन त्या ठिकाणी गेले. मात्र या ठिकाणी पैसे घेतल्यास काही घातपात होऊ शकतो म्हणून त्या दिवशी हा व्यवहार झाला नाही. त्यामुळ हा व्यवहार गुरुवारी करण्याचे ठरले. बंडू वानखेडे व त्यांचा मुलगा नितेश यांनी कामठीमध्ये जाण्यासाठी एक खाजगी टाटा सुमो भाडय़ाने घेतली. ही सुमो नितेशचा मित्र मंगेश भुसारीने ठरवून दिली. गुरुवारी सकाळी ११ वाजता बंडू वानखेडे, मुलगा नितेश, बाळा रामदास पेल्ले, अविनाश काळे हे टाटा सुमोने निघाले. वाटेतच शेतमालक कचरू मेश्राम, शेतमालकाची मुलगी लक्ष्मीबाई मेंढे व नातू शंकर मेंढे यांना सोबत घेतले आणि कामठीकडे निघाले. दरम्यानच्या काळात ती बॅग बंडूने लक्ष्मीबाई यांच्याकडे सोपविली. मौदाजवळ पावडदौना भागात तीन आरोपींनी गाडी अडविली आणि महिलेच्या हातावर चाकू मारून बनावट नोटा भरलेली ५२ लाख रुपयांची बॅग हिसकावून पळून गेले.
बंडू वानखेडे यांना पाच एकर शेतजमीन खरेदी करायची होती. मात्र, त्यांच्याजवळ इतके पैसे नव्हते त्यामुळे हा नकली दरोडय़ाचा कट घडवून आणला, अशी माहिती ग्रामीण पोलीस अधीक्षक मनोजकुमार शर्मा यांनी पत्रकार परिषदेत दिली. बंडू वानखेडे यांनी १ लाख प्रमाणे ५२ लाख रुपयांचे बनावट नोटांचे बंडल तयार केले. यात सर्वात वर आणि खाली एक हजार रुपयाची नोट ठेवून आतमध्ये कोरे कागद भरले. नितेशचा मित्र मंगेश भुसारीने अविनाश काळे यांची टाटा सुमो ठरवून दिली. अविनाश हा मंगेशचा मित्र असल्यामुळे त्यालाही पैशाचे आमिष दाखवून या कटात सहभागी करून घेण्यात आले. अविनाश हा बंडू कचरू यांच्याकडे सुमो गाडी घेऊन आला. नकली दरोडा घालण्याची जबाबदारी मंगेशकडे देण्यात आल्यामुळे त्याने त्याने घराशेजारी राहणाऱ्या मंगेश बावनकुळे (१९) आणि भूषण बावनकर यांना टाटा सुमोला अडवून ती बॅग हिसकावण्यास सांगितले. मुळात त्यात बनावट नोटा आहेत याची मंगेश आणि भूषणला कल्पना नव्हती.
मंगेश आणि भूषणने लक्ष्मीबाईच्या हातावर चाकू मारून ती बॅग हिसकावून नेली. बंडू वानखेडे यांनी गुंडानी बॅग लुटून नेल्याचे नाटक केले आणि पोलिसांकडे तक्रार केली. या घटनेचा तपास केला असता त्यात पूर्ण ५२ लाख रुपये नव्हते तर केवळ १ लाख १० हजार रुपये असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. कचरू मेश्राम याने शेतजमीन विकण्यासाठी आपल्याला त्रास दिल्याने हा धडा शिकवण्यासाठी नकली दरोडा घालण्यात आला असल्याचे आरोपींनी सांगितले. पोलीस उपनिरीक्षक संतोष वानखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली राजन पाली, अजय मानकर, राजेश खेरडे, दिनेश लबडे, अरविंद सराफ, उमेश ठाकरे, अविनाश राऊत सुरेश गाते, अमोल नागरे यांनी ही कारवाई केली.