गुन्ह्य़ांच्या वाढत्या घटनांच्या तपासाचे (डिटेक्शन) अत्यल्प प्रमाण पाहता तपासाची गती वाढवा, अशी तंबीच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे कामचुकारांचे धाबे दणाणले आहे.
शंभरावर खून, युग चांडक हत्याकांड, मुख्यमंत्र्यांच्या घराजवळ एका कोल माफियाची गोळ्या झाडून हत्या, सरासरी रोज एक अपघात नि चेन स्नॅचिंग लालगंजमधील आरती बोरकरचा खून, विहिरगाव बायपासवर वाटमारीतून दोघांचा खून, सिरसपेठमध्ये घरात शिरून मजुराचा गोळीबार, हसनबागमध्ये गफ्फारखानची गोळ्या झाडून हत्या, त्याचा बदला म्हणून त्याच ठिकाणी जमील उर्फ कसाई याची हत्या, मध्यवर्ती बस स्थानकासमोर झालेला सूरज जयस्वालचा खून, संग्राम बारमधील खून, मोटारसायकलने घरी परत जाणाऱ्या रशीदखान, अब्दुल बेगसह तीन गुंडांचा विरुद्ध टोळीने स्कार्पिओ वाहन अंगावर घालून केलेला खात्मा, या गेल्या वर्षांतील ठळक घटना. अद्यापही शहरात किमान पंधरा खुनांचे रहस्य पोलीस उलगडू शकलेले नाहीत.
वाढत्या चेन स्नॅचिंगने खुद्द पोलिसांच्याही भुवया उंचावल्या. पोलीस निरीक्षकांसह सर्वच वरिष्ठ अधिकाऱ्यांना गस्त घालावी लागत असतानाही गुन्ह्य़ांवर अंकुश लागलेला नाही. अधून मधून आरोपींना अटक झाली असली चेन स्नॅचिंग थांबलेले नाही. नागरिकांनी सावध असावे, दुकान असो वा घर, सीसी टीव्ही लावा, अलार्म लावा, रखवालदार ठेवा, किमती वस्तू लॉकरमध्ये ठेवा, कुलपे चांगली लावा, दुकानाच्या शटरला सेंट्रल लॉक लावा, लोखंडी दरवाजा लावा, दागिने घालून घराबाहेर पडू नका आदी अनेक सूचना नागरिकांना देऊन झाल्यात. मात्र, अनेक घटनांचा तपासच लागलेला नाही.
उपलब्ध आकडेवारीनुसार, गेल्या वर्षांत (डिसेंबपर्यंत) खून १०३, खुनाचा प्रयत्न ९२, दरोडे १६, चेन स्नॅचिंग २५६, जबरी चोरी ५०५, घरफोडी १०७४, चोरी २ हजार ९६२, वाहन चोरी १६०४, इतर चोऱ्या १ हजार ३५८ घडल्या. प्रत्यक्षात खून ९२, खुनाचा प्रयत्न ९२, दरोडे १२, चेन स्नॅचिंग ८४, जबरी चोरी २३५, घरफोडी २६३, चोरी ७१२, वाहन चोरी २९६, इतर चोऱ्या ४१६ असे तपासाचे प्रमाण आहे. ही आकडेवारी बरेच काही सांगून जाते.
तपासाची गती पाहून वरिष्ठ पोलीस अधिकारीही चपापले. पोलीस ठाण्याच्या हद्दीत काही पोलीस व गुन्हेगारांचे ‘आर्थिक संबंध’ असल्याची कुणकुण वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कानावर गेली. तपासाचे प्रमाण समाधानकारक नसल्याचे हेसुद्धा एक कारण आहे. शहरातील एका कुख्यात गुन्हेगाराविरुद्ध एमपीडीएची कारवाई झाली. या आदेशाची अंमलबजावणी करण्याआधी त्या गुन्हेगाराला आधीच सचेत करण्यात आल्याची बाब गेल्यावर्षी नागपुरात चव्हाटय़ावर आली होती. अरे त्या आरोपीला पकडणार केव्हा, असा वरिष्ठांनी जाब विचारल्यावर कुठे धावपळ करून त्याला अटक केली गेली. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांपासून ही बाब लपून राहिलेली नाही. शहरात गुन्हे तपासाचे प्रमाण असमाधानकारक असल्याची नाराजी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी व्यक्त केली. प्रत्येक पोलीस ठाण्यात एक स्वतंत्र शोध पथक (डीबी स्क्व्ॉड) असते. त्यात वर्णी लावण्यासाठी प्रयत्न केला जातो. त्यासाठी ‘आर्थिक बोली’ लागते तसेच हे पथक म्हणजे ‘आर्थिक चंदी’ असल्याची चर्चा पोलीस दलात नेहमीच सुरू असते. गुन्ह्य़ाचा तपास लावण्याची सर्वाधिक जबाबदारी या पथकाची असते. तपासाचे प्रमाण वाढवा, अशी तंबीच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यामुळे कामचुकारांचे धाबे दणाणले आहे.

वर्षनिहाय गुन्ह्य़ांचा तपास
२००५ –  ४ हजार ५२४, २००६ –  ४ हजार ५८८, २००७ –  ४ हजार ८१३, २००८ –  ४ हजार ३८३,  २००९ – ४ हजार ६४, २०१० –  ४ हजार १५४, २०११ –  ३ हजार ९२५, २०१२ –  ४ हजार ४०, २०१३ –  ४ हजार ६३०, २०१४ –  ४ हजार ९२४