गुरुवारी सायंकाळी मतदान संपले नि ‘सुटलो बुवा एकदाचे’ असेच शब्द अनेक पोलिसांच्या ओठी आले. गुरुवारचा दिवस मावळला तसा पोलिसांवरील ताणही निवळला.
लोकसभा निवडणुकीचे वेध लागले तेव्हापासूनच पोलिसांवरील ताण वाढायला सुरुवात झाली होती. बदल्या होणार अशी कुणकुण लागली होती. मात्र, त्या होतच नव्हत्या. आज होणार, उद्या होणार असे म्हणता म्हणता त्या झाल्या. मतदानाला आठवडा होता. एका दिवसात नव्या ठिकाणी रुजू होण्याच्या आदेशाने तणावात भर पडली. मनाजोग्या ठिकाणी बदली न होणे हेही त्यापैकी एक कारण होते. निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यानंतर पोलिसांवरील ताण आणखीच वाढला. आचारसंहितेचे पालन, बंदोबस्ताचे प्रमाण वाढले होते. हे करताना दैनंदिन कामेही करावीच लागत होती. समाजकंटकांना शोधा आणि प्रतिबंधात्मक कारवाई करा, अवैध दारूचे अड्डे शोधा वगैरे निवडणुकीमुळे आलेली नवी कामे  सुरू झाली. हे करीत असताना आचारसंहितेचे उल्लंघन कुणी करतोय का, यावर लक्ष ठेवा. हे काम अगदी बारकाईने करावे लागत होते. प्रचार पदयात्रा, मिरवणूक याबरोबरच सभांचा बंदोबस्त. अनेक व्हीआयपींच्या दौऱ्याचाही बंदोबस्त होता. हे करताना कुटुंबाची जबाबदारी होती ती वेगळीच. मात्र, कुटुंबातील सदस्यांचे सहकार्य असल्याने कौटुंबिक भार तेवढा हलका झाला.
ही सर्व कामे करताना रात्रंदिवस एक करावा लागत होता. मंगळवारी शहरात रामनवमी होती. दिवसभर आणि रात्री उशिरापर्यंत शोभायात्रेचा बंदोबस्त.  बुधवारची रात्र जागूनच काढावी लागली. मतदारांना आमिषापोटी अवैध दारू, पैसा आणि इतर वस्तूंचे वाटप केले जाते. त्यावर आळा घालण्याच्या दृष्टीने हयगय चालणार नाही, असे पोलीस आयुक्तांचे आदेश असल्याने अधिकारी असो वा शिपाई, सर्वानाच या दोन्ही रात्री जागून काढाव्या लागल्या. आज मतदानासाठी पोलिसांना कालपासूनच मतदान केंद्रांवर तैनात करण्यात आले होते. मतदानाच्या दिवशी कामचुकारपणा केल्याचे आढळल्यास कारवाईची टांगती तलवार असल्याने आळस झटकून सजग राहावे लागले.
आजही पोलिसांवर दडपण होतेच. शांतता भंग करण्याचा प्रयत्न झाला तरी पुन्हा शांतता प्रस्थापित करण्यासाठी पोलिसांना शक्ती खर्च करावीच लागते. शेवटी पोलीसही माणूसच आहे. अपवाद सोडला तर शहरात शांतताच राहिली. सायंकाळी मतदान आटोपले व सीलबंद मतदान यंत्रे कळमना यार्डात रवाना झाल्यानंतर ‘सुटलो बुवा एकदाचे’ असे शब्द आपसूकच अनेक पोलिसांच्या ओठी आले. गेल्या एक-दीड महिन्यात गुन्ह्य़ांवरही नियंत्रण आले होते. मतदानही शांततेतच पार पाडले. नाही म्हणायला राज्यातील इतर ठिकाणी निवडणूक बंदोबस्तासाठी जावे लागणार असले तरी ते मोजक्याच जणांना. त्यामुळे मतदान संपले नि पोलिसांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. ताण मुक्ततेचा हा क्षण कसा नि कुठे साजरा करायचा, याचे अनेकांनी नियोजन अगोदरच करून ठेवले होते.