नागपूर रेल्वे स्थानकावर जागतिक दर्जाच्या तुलनेची विविध विकास कामे केली जात असल्याचे मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक सुनीलकुमार सूद यांनी गुरुवारी नागपुरात सांगितले. नागपूर-आमला विभागाचे वार्षिक निरीक्षण केल्यानंतर त्यांनी नागपुरात पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, प्रवाशांच्या सोयीसाठी नागपूरहून सुटणाऱ्या गाडय़ांसाठी ‘होमप्लॅटफॉर्म’ तयार करण्यात आला आहे. नागपूर रेल्वे स्थानकावर अत्याधुनिक बेस किचन तयार करण्यात आले आहे. सुरक्षेच्या दृष्टीने प्रवाशांच्या बॅग तपासण्यासाठी स्कॅनर लावण्यात आले आहे. स्वयंचलित जिना सुरू झाला आहे. सीसी टीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. आणखी कॅमेरे व इतर संबंधित उपकरणे लावली जाणार आहेत. नागपूर ते वर्धा तिसरा रेल्वे मार्ग तयार केला जाणार आहे. रेल्वे सुरक्षा दलातील मनुष्यबळ वाढविले जाणार आहे. नागपूर रेल्वेस्थानक ‘वर्ल्ड क्लास’ म्हणून जाहीर झाले असून त्यादृष्टीने ही विविध कामे केली जात आहेत.
नागपूरच्या प्रस्तावित रेल्वे वैद्यकीय महाविद्यालयाचे काम ‘पीपीपी’ तत्त्वानुसार उभारले जाणार आहे. त्यासाठी पायाभूत बाबी असल्या तरी रेल्वेकडे डॉक्टरांची संख्या अपुरी आहे. त्यामुळे आधी डॉक्टरांची संख्या वाढविली जाणार आहे. नागपूरच्या नॅरोगेज फलाटांच्या दयनीय अवस्था त्यांच्या निदर्शनास आणून दिली असता सूद म्हणाले, नॅरोगेजचे मीटरगेजमध्ये परिवर्तन केले जात आहे. त्यामुळे या फलाटांच्या जागी नवे बांधकाम करावे लागणार आहे, असे ते म्हणाले.
आज सकाळी सुनीलकुमार सूद यांनी आमला रेल्वेस्थानकाची पाहणी केली. आमला रेल्वेस्थानक, प्रवासी आरक्षण केंद्र, पादचारी उड्डाण पूल, अपघातग्रस्त मदत गाडी, वैद्यकीय वाहन व इतर कामांची त्यांनी पाहणी केली. जौलखेडा, मुलताई व हतनापूर रेल्वेस्थानका दरम्यान उच्चतम वेगाची चाचणी घेतल्यानंतर चिंचोडा स्थानकाजवळील पुलाची पाहणी केली. घुडनखापा स्थानकावर दैनंदिनी वाहतुकीसंबंधी तांत्रिक कामाची चाचणी घेतली. पांढुर्णा स्थानक, वसाहतीचे निरीक्षण केल्यानंतर राजभाषा प्रदर्शन पाहिले. आग सुरक्षेवरील पथनाटय़ पाहून त्यांनी कौतुक केले. काटोल स्थानकावरील तांत्रिक कामांची पाहणी करून वृक्षारोपण केले. मेटपांजरा व सोनखांब दरम्यान वळणाचे निरीक्षण केले. कळमेश्वर स्थानकावजवळील रेल्वे फाटक व तांत्रिक कामाची पाहणी केली.
दुपारी नागपूरला आल्यानंतर प्रतीक्षालय, बेस किचन, रेल्वे गाडी तसेच स्थानकाची पाहणी केली. गार्ड व चालकांची विचारपूस केली. रेल्वे रुग्णालयातील नवनिर्मित गुंजन सभागृहाचे, नवनिर्मित प्रशासन विभागाचे उद्घाटन केले. रेल्वे संघटनांच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. यादरम्यान, मुंबईच्या अपघाताची माहिती मिळताच तातडीने विमानाने ते मुंबईस रवाना झाले.
या संपूर्ण निरीक्षणादरम्यान मध्य रेल्वेच्या मुख्यालयातील मुख्य जनसंपर्क अधिकारी अतुल राणे तसेच इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.